मित्रानो,
कल्याण मधील गणेश घाट म्हणजे आपण निवडून दिलेले लोक प्रतिनिधी आपल्या सुख सोयींची कशी वाट लावतात त्याचा एक उत्कृष्ट नमूना आहे। सादर करीत आहे तुमच्या साठी म टा मधील गणेश घाटावरील बातमी ... वाचा आणि पेटून उठा .... काय? आणि हो, काळ्या तलावाचे सुशोभिकरनाचे काय चालले आहे? सांगावे ...
विनोद शिरसाठ
- म. टा. प्रतिनिधी
कल्याण शहराला विस्तीर्ण खाडीकिनारा लाभलेला असला तरी या किनाऱ्यालगत चौपाटी विकसित करण्यात पालिकेला अपयश आले आहे. त्यातच येथील दुर्गाडी गणेशघाटाची अवस्थाही ओसाड वाळवंटासारखी झाली आहे. तुटलेली खेळणी, बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही, पिण्याचे पाणी व प्रसाधनगृहाची वानवा असलेला दुर्गाडी गणेशघाट आता फेरीवाल्यांच्या विळख्यात सापडला आहे. त्यामुळे रमणीय गणेशघाट साकारून उत्तम दर्जाचे पर्यटनस्थळ बनवण्याच्या घोषणेचे काय झाले, अशी विचारणा विरोधी पक्षनेते सचिन पोटे यांनी केली आहे. कल्याण शहरात मनोरंजनांच्या साधनांची कमतरता असताना केडीएमसीने उद्याने आणि मैदानांचाही बळी घेण्याचे सत्र सुरू केले आहे. त्यातच खाडीकिनारी असलेला गणेशघाटही ओसाड असल्याने कल्याणकरांनी चार घटका मौजमजा करण्यासाठी जायचे कोठे, असा प्रश्न निर्माण होतो. वास्तविक मागील महापालिका निवडणुकीआधी पत्रकार परिषदेत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी महापालिकेत सेना-भाजपची सत्ता आली तर दुर्गाडी गणेशघाट रमणीय पर्यटनस्थळ म्हणून विकसित केला जाईल, असे आश्वासन दिले होते. या परिसराचे सध्याचे स्वरूप पाहता या आश्वासनाप्रमाणे काहीच झाल्याचे दिसत नाही. सोमवारी पालिकेतील विरोधी पक्षनेते सचिन पोटे यांनी गणेशघाट परिसराची पत्रकारांसोबत पाहणी केली. लहान मुलांना खेळता यावे, यासाठी तिथे बसवण्यात आलेली चार-दोन खेळणीही तुटली आहेत. तसेच, मुलांना खेळताना दुखापत होऊ नये यासाठी तिथे वाळू असावी लागते. पण वाळू तर सोडाच, तेथील पृष्ठभाग ओबडधोबड झाला असल्याने मुलांना दुखापत होण्याचे प्रमाण वाढले आहे. गणेशघाटावर कारंजे बसवण्यासाठी जागा सोडण्यात आली असली तरी कारंजे उभारण्यास केव्हा मुहूर्त सापडणार, हे अद्याप स्पष्ट नाही. तसेच, सुरक्षेसाठी बसवण्यात आलेला कठडा काही ठिकाणी तुटल्यामुळे धोका निर्माण झाला आहे. शेजारीच असलेल्या कचऱ्याच्या डोंगरातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे गणेशघाटावर येणाऱ्या लोकांना धड बसता येत नाही. या परिसरात कोठेही साधी पिण्याच्या पाण्याची सोय नाही. लहान मुले व ज्येष्ठांसाठी प्रसाधनगृहाची सोय नसल्याने त्यांची कुचंबणा होत आहे. अशा निसर्गत: सुंदर परिसराला आणखी शोभा येईल, असे दिवे बसवण्याऐवजी एरवी रस्त्यांवर दिसणारेच सरळधोपट दिवे बसवून पालिका मोकळी झाली आहे. हद्द म्हणजे तिथे होणाऱ्या बोटिंगसाठी पालिकेची परवानगी घेण्यात आलेली नाही, शिवाय बोटिंग करताना एखादा अपघात झाला. तर रहिवाशांचा जीव वाचवण्यासाठी सुरक्षा यंत्रणा अस्तित्वात नाही. तरीही महापालिकेने याची दखल घेतलेली नाही. हे सगळे कमी आहे की काय, म्हणून फेरीवाल्यांनी या परिसराला विळखा घातला आहे. या दूरवस्थेकडे सचिन पोटे यांनी लक्ष वेधले आहे. पालिकेने या परिसराचे सुशोभिकरण करण्यासह शिव आरमार स्मारकाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली. फेरीवाल्यांच्या हैदोसामुळे या परिसराला बकालपणा आला असून येत्या १० दिवसांत येथील फेरीवाले हटवण्यात आले नाहीत तर युथ काँगेसचे कार्यकतेर् रस्त्यावर उतरून फेरीवाले हटवतील, असा इशारा त्यांनी पालिका आयुक्तांना दिला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment