ब्लॅक लिस्टेड कंत्राटदारांना कंत्राट दिल्याने मनसेकडून आंदोलन
ब्लॅक लिस्टेड कंत्राटदारांना कंत्राट दिल्याने मनसेकडून आंदोलन
मुंबई महापालिकेने ब्लॅक लिस्टेड ठेकेदारांना पुन्हा रस्त्यांचं कंत्राट दिलंय. रस्त्यांच्या ५५० कोटींच्या कामाला प्रस्तावाला स्थायी समितीनं मंजुरी दिलीय. यामुळे ठेकेदारांची दिवाळी झालीय तर मुंबईतील रस्त्यांचं मात्र दिवाळं निघालंय.

ब्लॅक लिस्टेड ठेकेदारांना पुन्हा कंत्राट दिल्याच्या निषेधार्थ मनसेच्या १ तर काँग्रेसच्या ७ सदस्यांनी सभात्याग केलाय.

मुंबई महापालिकेत रस्त्यांची निकृष्ट कामं आणि त्यामुळे पडणाऱ्या खड्ड्यांवरून वाद सुरू असतांना, मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा ब्लॅक लिस्टेड कंत्राटदारांना रस्त्याचं कंत्राट दिलंय.

रस्त्यांना फार कमी काळात खड्डे पडल्याने पुढील वर्षांचा निधी या वर्षासाठी वापरण्याची नामुष्की ओढवली आहे. हा प्रस्ताव मंजूर केल्याच्या निषेधार्थ मनसे आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रस्तावाची होळी केली आहे.

रेलकॉन, प्रकाश इंजिनिअर्स, महावीर इंजिनिअर्स, वलेजा इंजिनिअर्स, के.आर. इंजिनिअर्स यांना हे कंत्राट देण्यातस आलंय. या कंपन्यांना यापूर्वी ब्लॅक लिस्टेड करण्यात आल्या होत्या.

तरीही शिवसेनेने यांच्यावर मेहेरबान होऊन पुन्हा यांना रस्त्याचं कंत्राट दिल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय.