Friday, August 12, 2011

'पंतप्रधान' मोदींना 'मनसे' पाठिंबा!

खालील लेख म टा च्या सौजन्याने ...............


गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासारखा नेता पंतप्रधानपदासाठी आदर्श उमेदवार असल्याचं स्पष्ट मत मोदी मॅजिक नं मोहून गेलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. केंद्रात भाजपची सत्ता आली आणि त्याचं नेतृत्त्व मोदी करणार असतील तर आपला पक्ष त्यांना निश्चितच पाठिंबा देईल, असंही त्यांनी जाहीर केलं.

गुजरातच्या विकासाचं रहस्य जाणून घेण्यासाठी राज ठाकरे गेले दहा दिवस गुजरात दौ-यावर होते. त्यावेळी नरेंद्र मोदींच्या कामाचा झपाटा याचि डोळा अनुभवल्यानं ते मोदी मॅजिक वर एकदम फिदा होऊन गेलेत. नरेंद्र मोदींना भेटून गुजरात दौ-याची सांगता करताना राज यांनी मोदींवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला.

नरेंद्र मोदींसारख्या प्रभावी आणि कार्यक्षम नेत्याची आज केंद्रात खरी गरज आहे. देशाच्या पंतप्रधानपदासाठी ते अत्यंत योग्य उमेदवार आहेत, अशी दाद राज यांनी दिली आहे. परंतु, गुजरातची घडी व्यवस्थित बसवल्यानंतरच त्यांनी केंद्रात जावं, असंही राज यांना वाटतंय. भविष्यात केंद्रामध्ये भाजपचं सरकार आलं, त्याचं नेतृत्त्व मोदी करणार असतील आणि त्यावेळी मनसेचे खासदार निवडून आले असतील तर आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा देऊ, अशी घोषणाही राज यांनी करून टाकली आहे.

टार्गेट परप्रांतीय !’

परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून गुजरातमधील पत्रकारांनी राज यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु राज त्यांना पुरून उरले. परप्रांतियांच्या विरोधात बोलणारा मी एकटा नाही. शीला दीक्षित, पी. चिदंबरम यांनीही परप्रातियांना लक्ष्य केलंय. आसाममध्ये तर बिहारी मजुराची हत्या करण्यात आली होती. असं असताना, फक्त माझ्यावरच टीका का केली जाते ?, असा प्रतिप्रश्न त्यांनी पत्रकारांना केला. परप्रातियांच्या लोंढ्यांमुळे महाराष्ट्राची काय अवस्था झाली आहे हे तुम्ही मुंबईत येऊन पाहा, तेव्हाच माझी भूमिका तुमच्या लक्षात येईल, असंही त्यांनी नमूद केलं.

मनसे महाराष्ट्रातच !

गुजरातच्या प्रेमात पडलेल्या राज ठाकरेंची मनसे इथे येऊन निवडणुका लढवणार का, या प्रश्नाचं थेट उत्तर राज यांनी दिलं. माझ्या पक्षाचं नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. त्यामुळे महाराष्ट्र हीच आमच्या पक्षाची सीमा आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

गुजरात दौरा अद्भुत आणि डोळे उघडणारा होता, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली. गुजरातमधले रस्ते आपल्याला सगळ्यात आवडल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं. भविष्यात पुन्हा आपण इथे येऊन वेगवेगळ्या प्रकल्पांचा अभ्यास करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.

अण्णांना पाठिंबा

लोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी १६ ऑगस्टपासून उपोषण करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार राज यांनी केला. अण्णांच्या काही मागण्या एडिट होऊ शकतात, पण डिलिट होऊ शकत नाहीत, असं ते म्हणाले.

No comments:

Post a Comment