Thursday, August 11, 2011

शिवसेनेला घोर लावणारे राजकारण!

प्रताप आसबे चां म टा मधील लेख

दिनांक - ९ ऑगस्ट २०११

भाजपमध्ये आजवर अध्यक्ष नितीन गडकरी हेच प्रामुख्याने मनसेला जवळ करणारे होते. आता नरेंद्र मोदींची त्यात भर पडल्याने भाजपमध्ये मनसेचा पाठिंबा वाढणार. आता भाजपमध्ये मनसेची स्वीकारार्हता वाढलीय हे निर्विवाद. राजकारणात ती वाढणे, अन्य पक्ष व शक्तिशाली नेत्यांशी मैत्री होणे, हे भविष्यात लाभदायक असते. कारण वेळ येते तेव्हा राजकारणात नवी समीकरणे मांडता येतात. राज ठाकरे यांच्या गुजरात दौऱ्याचे हे असे अनेक अर्थ आहेत...

.......................

मुंबई महापालिकेच्या निवडणुका सात-आठ महिन्यांवर आल्या असताना खड्ड्यांमुळे शिवसेनेच्या मार्गात बरेच खाचखळगे निर्माण झाले आहेत. रोज टीकेचा भडीमार चालला आहे. अब्रूचे पंचनामे चालू आहेत. महापालिकेच्या कारभाराचे धिंडवडे निघत असताना परवा तर धारावीजवळ आख्खा ट्रक आणि त्याच्या पाठोपाठ टेम्पो खड्ड्यात अक्षरश: उताणा झाला. दोन-तीन वर्षांपूर्वी महालक्ष्मीच्या सातरस्ता चौकात पसरलेल्या ट्रकची पुनरावृत्ती धारावीत पाहायला मिळाली. तेव्हा फाटलेल्या आकाशाला कुठे कुठे ठिगळ लावायचे या चिंतेने सेनानेते कावरेबावरे झाले आहेत. तशात नालेसफाईची सीआरडी चौकशी करण्याचे आश्वासन सरकारने विधिमंडळात दिले. त्यामुळे तर सेनेची आणखीच पंचाईत झाली. हीच शिवसेना अवघ्या काही महिन्यांपूवीर् वाघासारख्या डरकाळ्या फोडताना सरकारला कापरे भरत होते. मग तो जैतापूरच्या अणुऊर्जा प्रकल्पाचा प्रश्न असो की इतर कोणता. सेना दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत होती. पण त्याच सेनेला आता मुंबई महापालिकेतील गलथान कारभारामुळे हुडहुडी भरायला लागली आहे. ऐन मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ही हुडहुडी महागात पडू शकते.

सेनेची अशी अवस्था झालेली असताना मनसेवाले रोज काही ना काही कुरापती काढत आहेत. तशात सेनेचे जानी दुष्मन राज ठाकरे सेनेच्याच सोयऱ्यांकडे गुजरातेत यथेच्छ पाहुणचार झोडत आहेत. 'विकासाचे मॉडेल' म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या गुजरातची पाहणी करण्यासाठी कुठल्यातरी मागासलेल्या नव्हे तर विकसित महाराष्ट्रातील 'ग्लॅमरस' नेता येतोय आणि आपल्याला तो 'रोल मॉडेल' म्हणून पाहतोय म्हटल्यानंतर मुख्यमंत्री नरेंद मोदी यांच्या अंगावर नक्कीच मूठभर मांस चढले तर नवल नाही! त्यामुळे मोदी यांनी राज यांना 'स्टेट गेस्ट'चा दर्जा देऊन त्यांच्या स्वागतासाठी लाल गालिचाही अंथरला. शाही पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी स्वत: जातीने उपस्थित राहिले. मग काय? त्यांचे ते पंचतारांकित आगतस्वागत. उभयतांनी केलेली परस्परांची कोडकौतुकं. त्याची रसभरित वर्णनं छायाचित्रांसह दिमाखात छापून येत आहेत. मागेपुढे अधिकाऱ्यांच्या ताफ्यात गॉगलधारी राज एकापाठोपाठ एक विकासकामांना भेटी देऊन माहिती घेत आहेत. मुक्तकंठाने मोदी आणि गुजरातचे कौतुक करत आहेत. त्यात पुन्हा गेल्या काही वर्षांतल्या राज्यर्कत्यांनी वाट लावली असली तरी अजून महाराष्ट्र पहिल्याच क्रमांकावर असल्याचा 'मराठी बाणा'ही न विसरता दाखवत आहेत. त्यामुळे मीडियाने त्यांची तोंडफाट स्तुती चालविली आहे. जाताना आठवणीने मीडियातील मराठी टक्का बरोबर नेलेला असावा. किंवा कदाचित छत्रपती शिवरायांच्या सुरतेच्या मोहिमेनंतर प्रथमच कुणी मराठी नेता गुजरातवर चाल करून जातोय, असा साक्षात्कार झाल्याने आख्खा मीडियाच त्यांच्यामागे धावत सुटला असेल.

राज यांना महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर न्यायचे आहे. त्याची ब्लू प्रिंट ते देणार आहेत. त्यासाठी त्यांनी थेट गुजरातकडे धाव घेतली. कदाचित् त्यांच्या मते इथे काहीच घडत नसावे. त्यामुळे महाराष्ट्रात काय आहे, हे पाहण्याची त्यांनी तसदी घेतली नसावी. देशाच्या उत्पादनापैकी एक तृतिआंश साखरेचे उत्पादन इथे होत असले तरी साखर कारखाने हे मुळी पैसे खाण्यासाठीच काढलेले आहेत. राज्यातल्या दोन जिल्ह्यातला कांदा देशभर आणि परदेशातही जातो. इथल्या माळावरची दाक्षे, डाळिंब, सीताफळे युरोपाच्या बाजारात जातात. कोकणातील हापूस जगभरातील आंब्यांचा शहेनशाह झाला आहे. टेबल ग्रेपऐवजी वाईन फायद्याची ठरते म्हणून वायनरी सुरू झाल्यात. पण गुजरातच्या वाळवंटात इराकच्या जगप्रसिद्ध 'हनी बॉल' खजुराचे आणि युरोपातल्या ऑलिव्हचे उत्पादन व्हायला लागले, याचे अप्रूप असू शकते. खरे म्हणजे, नितीशकुमारांनी बिहारमध्ये विकासाची अशीच घोडदौड चालविली आहे. पण राज यांना तिथे जाणे कठीण आहे. काही का असेना पण विकासाचा ध्यास घेऊन कुणी कुठे पाहणीसाठी जात असेल तर स्वागतच करायला हवे.

गुजरात दौऱ्यामुळे आपण भाषेच्या पलीकडे जाऊन विकासाला प्राधान्य देऊ पाहतो, असा एक संदेश त्यांनी महाराष्ट्रातील मतदारांनाही दिला आहे. त्यातून आपण सबंध राज्याच्या हिताचा विचार करतो, असे ते म्हणू शकतील. उद्या सत्तेवर आल्यानंतर ते काय वेगळे करणार, हा प्रश्नच आहे. पण आज सत्तेत नसल्यामुळे मोठ्यामोठ्या गोष्टी करता येतात. लोकही हुरळून जातात. केवळ भाषेचा विचार करणारा पक्ष आता विकासाचा विचार करायला लागला, याचेही अप्रूप वाटू शकते. अशा आशाळभूतांच्या दृष्टिकोनाचा लाभ मनसेला मिळू शकतो.

या दौऱ्याचे राजकीय परिणाम यथावकाश स्पष्ट होतील. परराज्यातील नेता गुजरातकडे विकसित राज्य म्हणून पाहतो. आपल्या राज्याचा तसाच विकास करू इच्छितो. यामुळे गुजराती भाषिकांचा अहंभाव सुखावला असणार. यातून मुंबई, महाराष्ट्रातील गुजराती भाषिकांची सहानुभूती राज आणि मनसेला मिळेल. भाषिक अस्मितेचे राजकारण करून उत्तर भारतीयांच्या विरोधात रान पेटवणारा नेता गुजरात आणि गुजराती समाजाला शत्रू तर सोडाच पण मित्र समजतो. यामुळे गुजराती भाषिकांना आनंदाचे भरते आले नसेल तरच आश्वर्य. मुंबई-महाराष्ट्रातील गुजराती समाज प्रामुख्याने भाजपबरोबर आणि युतीसोबत आहे. सेनेतून फुटून राज यांनी मनसे काढल्याने तसेच त्यांनी परप्रांतियांना लक्ष्य केल्याने हा समाज त्यांच्याकडे थोडा संशयानेच पाहात होता. पण तो संशयही आता दूर होईल. थोडक्यात, भाजपनंतर केवळ सेनेवर विश्वास ठेवणारा हा समाज मनसेशी संबंध ठेवू लागेल. कालांतराने उभयतांतील संबंध अधिक जिवंत होऊ शकतील. युतीची मोठी मतपेढी मराठी आणि गुजराथी भाषिकांमध्ये आहे. मनसेने मराठीत घुसखोरी करून आपला वाटा घेतला. आता ते गुजराती भाषिकांमध्येही घुसखोरी करू लागतील. उद्या मनसे आणि सेना यांच्या निवडणूक संघर्षात मनसेच्या उमेदवाराचे पारडे जड तुलेनेने जड असेल तर सेनेलाच मत दिले पाहिजे, असे दडपण गुजराथी समाजावर राहणार नाही. हा समाज व्यापारी वृत्तीचा असून आजवर त्याला जसे सेनेचे संरक्षण मिळाले तसे उद्या मनसेचे मिळू लागेल. मराठी आणि गुजराती समाजात स्वतंत्र मतपेढी तयार केल्यानंतर हिंदुत्वाची मतपेढी तेवढी मनसेपासून दूर असेल, असा त्याचा अर्थ आहे. अर्थात, राज व मनसे यांचे राजकारण धर्मनिरपेक्षतेचे नाही. हिंदुत्व जाहीर स्वीकारले नसले तरी त्यांचे कूळ त्याच प्रवाहातले आहे. त्यामुळे जेव्हा वेळ येईल तेव्हा ते जहाल हिंदुत्वाची भूमिकाही घेताना दिसतील. थोडक्यात, जिथे जिथे तुम्ही, तिथे आम्ही, अशी मनसेची पावलं पडत राहणार. आख्ख्या हिंदुत्वाच्या व्होटबँकेत ते सराईतपणे वावरणार. साहजिकच मनसेला कशाला बाजूला ठेवता, असे सेनेवरील दडपण वाढत जाणार.

भाजपमध्ये आजवर गडकरी हेच प्रामुख्याने मनसेला जवळ करणारे होते. आता मोदींची त्यात भर पडल्याने भाजपमध्ये मनसेचा पाठिंबा वाढणार. पण आजचा विचार केला तर पक्ष म्हणून भाजपमध्ये मनसेची 'अॅक्सेप्टिबिलिटी' वाढलीय हे निविर्वाद. राजकारणात अशी स्वीकारार्हता वाढणे, अन्य पक्ष व शक्तिशाली नेत्यांशी मैत्री होणे, हे भविष्यात लाभदायक असते. कारण वेळ येते तेव्हा राजकारणात नवी समीकरणे मांडता येतात. भाजपचा फायदा असा की, सेना आणि मनसे हे दोन्ही पर्याय त्यांच्यापुढे असणार. वेळ येईल तेव्हा कोणता पाठिंबा स्वीकारायचा हे ते ठरवू शकतील. दरम्यान पडद्यामागे समझोते करायला तर कसलीच अडचण नसेल. या सगळ्याचा परिणाम म्हणजे सेनेचा दबाव, दडपण आणि मित्रपक्षाशी सौदा करण्याची क्षमता कमी होणार. किमान आम्ही म्हणू तीच पूर्वदिशा, हे सेनेचे सध्याचे स्थान राहणार नाही, यात शंका नाही.

सेना, मनसे आणि भाजप यांची पावले उद्याच्या राजकारणात कशी आणि कोणत्या दिशेने पडणार, हे यातून स्पष्ट होते. पण राजनी गतिमान विकास हवा असेल तर आघाड्यांचे राजकारण हा त्यातला महत्त्वाचा अडसर असल्याचे म्हटले आहे. इतकेच नव्हे, तर आघाड्यांचे राजकारण अपरिहार्य आहे, ही मानसिकताच काढून टाकली पाहिजे, असे म्हटले आहे. गुजरातमध्ये मोदींचा शब्द चालतो, हे त्यांना दिसले असणार. महाराष्ट्रालाही विकासाच्या महामार्गावर भरधाव जायचे असेल तर मोदींप्रमाणे आपल्याकडे मतदारांनी सर्वंकष सत्ता सोपविली पाहिजे, असेही त्यांना सूचित करायचे असावे. राज यांना सध्या एकटेच जायचे आहे. राज्यातील दोन परस्परविरोधी आघाड्यांत त्यांना स्थान नाही. त्यामुळे ते आघाडीच्या राजकारणाच्या विरोधात हल्लाबोल करू शकतात. आघाड्यांच्या राजकारणामुळे महाराष्ट्र विकासाकडे न जाता मागासच राहील, अशी टीका करू शकतात. खरे म्हणजे, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना या सगळ्यांनाच स्वबळावर सर्र्वंकष सत्ता हवी आहे. पण ती मिळत नसल्याने नाइलाजाने त्यांना आघाडी आणि युतीचे राजकारण करावे लागते. भविष्यात मनसेलाही तेच करावे लागेल. पण सध्या ती संधी नसल्याने आघाडीच्या राजकारणावर तुटून पडणे हे राजकीयदृष्ट्या त्यांच्या फायद्याचे आहे. त्यातून खरोखरच आघाडीचे पर्व नष्ट करण्यात यश आले तर त्यांना युगपुरुषच म्हणावे लागेल. सेनेवाले खाचखळग्यात ठेचकाळत असताना मनसेने मात्र एका वेगळ्या पातळीवर दमदार पावले टाकत सेनावाल्यांचा घोर आणखी वाढवला. राजकारण चुकीचे की बरोबर, ही चर्चा अनेकदा निरर्थक ठरते. मात्र, कोण किती सफाईदार राजकारण करतो, यावर यशापयश अवलंबून असते, हे सेनानेत्यांनीही कधीतरी समजून घेतले पाहिजे.

No comments:

Post a Comment