- म. टा. प्रतिनिधी
मॉलमधील 'एक्सपायरी डेट' उलटलेला माल कवडीमोलाने विकत घेऊन तो खुल्या बाजारात बिनबोभाटपणे विकणारे रॅकेट मनसेच्या कार्यर्कत्यांनी उघडकीस आणले आहे. भिवंडी येथील एका गोदामामध्ये हा माल ठेवल्याची खबर लागल्यानंतर मनसेच्या कार्यर्कत्यांनी तिथे छापा टाकला. सुरुवातीला नारपोली पोलिसांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करून मनसेच्याच कार्यर्कत्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल केले. परंतु, मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी दबाव आणल्यानंतर ही वादग्रस्त गोदामे सिल करण्यात आली आहेत. दापोड्यातील मे. युनिव्हर्सल प्रोजेक्ट्स ओधोकृपा या गोदामामध्ये मुदत संपलेल्या मालाची विक्री होत असल्याची माहिती मनसेचे कार्यकतेर् उदय पाटील, सचिन शेट्टी, किरण शेट्टी आणि मधुकर भोईर यांना मिळाली होती. त्या गोदामावर नारपोली पोलिसांनी छापा टाकून कारवाई करावी, अशी मागणी या कार्यर्कत्यांनी केली होती. परंतु, पोलिसांनी कारवाईस नकार दिल्यानंतर या कार्यर्कत्यांनीच त्या गोदामावर छापा टाकला. तिथे सॉस, चॉकलेट, ज्युस, लोणचे, पीठ, रवा, इडलीचे पीठ, साबण, शॅम्पू, दुधाची उत्पादने अशा खाण्यापिण्याच्या वस्तूंसह अन्य उत्पादानांचा प्रचंड मोठा साठा होता. हा सर्व माल 'एक्स्पायरी डेट' उलटलेला असल्याचे मनसेच्या नेत्यांचे म्हणणे आहे. हा प्रकार आमच्या अखत्यारीत येत नसल्याचे नारपोली पोलिस स्टेशनचे अधिकारी विलास सानप यांनी सांगितल्यानंतर तहसिलदार कार्यालयातील पुरवठा विभागाचे अधिकारी कारेकरे यांच्याकडे तक्रार करण्यात आली. परंतु, त्यांनीही अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे तक्रार करण्याची सूचना केली. या वादग्रस्त गोदामाचा मालक राजेश चंदकांत ठक्कर आणि नीलेश चंदकांत ठक्कर यांना वाचविण्यासाठी पोलीस जीवाचा अटापिटा करत होते, असा आरोप मनसेचे नेते राजन राजे यांनी केला आहे. त्याशिवाय नारपोली पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या या मनसेच्या चार पदाधिकाऱ्यांनाच खंडणीच्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्नही पोलिसांनी केला. परंतु, हे प्रकरण नारपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील असतानाही या चार पदाधिकाऱ्यांना शांतीनगर पोलीस स्टेशनात बसवून ठेवण्यात आले होते. 'यावेळी पोलिसांनी आम्हाला धक्काबुक्की करून मोबाइल जप्त केले', असा आरोपही सचिन शेट्टी यांनी केला आहे. या प्रकारामुळे संतापलेल्या मनसेच्या कार्यर्कत्यांनी पोलिसांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर या वादग्रस्त गोदामावरील कारवाई सुरू झाली आहे. या गोदामाला सील ठोकण्यात आले आहे. 'पोलिसांकडे आमचे हप्ते बांधलेले आहेत. त्यामुळे आमच्यावर कुणीही कारवाई करू शकत नाही, असे बिनधोकपणे सांगणाऱ्या ठक्कर बंधू यांनी मला मारण्याची धमकीही दिली', असे या प्रकरणाच्या पंचनाम्यातील साक्षीदार आणि मनसेचे पदाधिकारी विक्रांत कणिर्क यांनी सांगितले. तशी लेखी तक्रारही कणिर्क यांनी केली आहे. मुदत उलटलेला माल पुन्हा बाजारात विकून लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. पोलिसांच्या संगनमताने हा सर्व प्रकार सुरू असून त्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचे मनसेच्या नेत्यांचे म्हणणे आहे. 'या प्रकरणातील दोषींवर कारवाई झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही', असा इशारा राजन राजे यांनी दिली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment