Tuesday, July 26, 2011

पाहुण्याची वाट कशाला पाहता?- राज

खालील लेख म टा च्या सौजन्याने ........................



नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या सोयी-सुविधांचे उद्घाटन करण्यासाठी प्रमुख पाहुण्याची वाट पाहात थांबू नका, काम पूर्ण झाल्यावर त्याचे उद्घाटन करा आणि मोकळे व्हा, असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नगरसेवकांना दिला.

पुणे महापालिकेतर्फे प्रभाग क्र. ६३ वनाज कंपनी भागात नव्याने विकसित करण्यात आलेल्या कै. सचिन बाळासाहेब आंग्रे उद्यानाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला महापौर मोहनसिंग राजपाल, मनसेचे पालिकेतील गटनेते रवींद्र धंगेकर, नगरसेवक किशोर शिंदे, मनसेचे शहराध्यक्ष प्रकाश ढोरे आदी उपस्थित होते.

' पुणे शहराच्या गरजा वाढत आहेत. याचे भान सर्व पक्षांनी ठेवायला हवे. शहरातील नागरिकांना मैदाने, बागा आदी सुविधा मिळाल्या नाहीत तर वाढत्या लोकसंख्येबरोबर येथील रोगराईही वाढेल. त्यामुळे नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी नगरसेवकांची आहे. पालिकेकडून नागरिकांसाठी उभारण्यात येणा-या सुविधांच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुण्याची प्रतीक्षा न करता त्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करा,' असे ठाकरे यावेळी म्हणाले.

' महापालिकेच्या राखीव असणाऱ्या जागांवर बागा, मैदाने करा. नागरिक सर्व प्रकारचे कर भरता आहेत, त्यांच्या मोबदल्यात त्यांना शुल्लक गोष्टी मिळत नसतील तर ती सत्ता चाटायची आहे का? निवडणूक लढवून उपयोग काय?,'असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

पुण्या-मुंबईत बिल्डर मोठ्या सोसायट्या उभ्या करताना त्याठिकाणी बाग, स्विमिंग पूल, जॉगिंग टॅक या सुविधा देऊ असे सांगतात. वास्तविक पाहाता या सुविधा महापालिकेने द्यायला हव्यात मात्र, ते बिल्डरला विकावे लागत आहे. पुणे आता मोठे शहर होत आहे. अनेक भागातले लोक पुण्यात राहायला येत आहेत. लोकसंख्या आणि वाढत्या रोगराईमुळे हॉस्पिटल हा धंदा म्हणून पुढे येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

मराठी मातीत मिसळा....

महापौरासारखी मराठी मातीत मिसळणारी माणसे हवीत. जी माणसे मराठी संस्कृती समजून घेत नाहीत त्या माणसांना कुठे लाथ मारायची हे माहीत असल्याचे राज ठाकरे यावेळी म्हणाले.

No comments:

Post a Comment