Tuesday, July 12, 2011

कल्याण-डोंबिवलीतील हे खड्डय़ांतील रस्ते

खालील लेख लोकसत्ता च्या सौजन्याने .....भगवान मंडलिक - मंगळवार, १२ जुलै २०११
bhagwan.mandlik@expressindia.com
महापालिका निवडणुकांच्या तोंडावर कल्याण-डोंबिवली परिसरातील रस्त्यांना ‘सिंगापूर टच’ देण्याच्या वल्गना करत कोटय़वधी रुपयांचा खर्च करणाऱ्या महापालिकेतील अभियांत्रिकी विभागाचे पितळ आता उघडे पडू लागले असून अवघ्या दोन वर्षांपूर्वी तयार केलेले चकाचक रस्ते यावर्षी पहिल्याच पावसात शरपंजरी पडल्याचे चित्र दिसू लागले आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विकास योजनेच्या माध्यमातून साधारण दोन वर्षांपूर्वी महापालिकेने डोंबिवली स्थानक, मानपाडा, मुरबाड रोड भागांत रस्त्यांना नवा मुलामा चढविण्याचा प्रयत्न केला. याच रस्त्यांच्या जोरावर अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून थेट देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पुरस्कारही पदरात पाडून घेतला. प्रत्यक्षात जे रस्ते पाहून या पुरस्काराकरिता शिफारस करण्यात आली, त्यापैकी बहुतांश रस्त्यांची वर्षभरातच खराब अवस्था झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राष्ट्रपतींच्या हस्ते मोठय़ा ऐटीत पुरस्कार स्वीकारणाऱ्या महापौर आणि आयुक्तांवर सध्या नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.
२००९-१० या काळात कल्याण-डोंबिवली पालिकेने चांगले रस्ते केल्याबद्दल पालिकेला अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा ‘नागररत्न’ पुरस्कार राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते नुकताच मिळाला. हा काळ साधारपणे महापालिका निवडणुकीचा होता. शहरातील रस्ते चहूबाजूंनी पोखरले गेल्याने सत्ताधारी चांगलेच अडचणीत सापडले होते. याच काळात जवाहरलाल नेहरू अभियानाचा ‘ताजा’ पैसा उपलब्ध होत असल्याने माजी आयुक्त गोविंद राठोड यांच्या पुढाकाराने शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांना नवा मुलामा चढविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
निवडणुका तोंडावर आल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार एकनाथ िशदे यांनीही याकामी पुढाकार घेतला. यासाठी खास विदेशी तंत्रज्ञानाचा उपयोग करत नवे रस्ते तयार करण्याचे नक्की करण्यात आले. शहरातील दोन-चार रस्ते देखावा म्हणून चांगले करण्यात आले. निवडणुकांच्या तोंडावर रात्रीचा दिवस करून कल्याण-डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरातील रस्ते सिंगापूर धर्तीचे करण्यात आले. याच रस्त्यांच्या आधारे अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून पुरस्कारासाठी शिफारसही करण्यात आली आणि पुढे तो पटकाविण्यात आला. प्रत्यक्षात हा पुरस्कार ज्या रस्त्यांच्या आधारे मिळाला आहे, तेथील सध्याची परिस्थिती अत्यंत भीषण बनली असून बहुतांश या सर्व रस्त्यांची आता वाताहत झाली आहे.
पालिकेतील एका अधिकाऱ्याचे सध्या ‘आयएएस नॉमिनेशन’ मंत्रालयात प्रलंबित आहे. हा अधिकारी राष्ट्रपतींच्या मूळ मतदारसंघाच्या आसपासचा आहे. बढतीच्या या फाईलला एक ‘झालर’ म्हणून या पुरस्काराचा वापर करण्याचा प्रयत्नही जोमाने सुरू असल्याची चर्चा आहे. चार महिन्यांपूर्वी ६४ कोटी खर्च करून शहरातील रस्त्यांची पावसाळ्यापूर्वी योग्य डागडुजी करण्याचा एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला. महापौर वैजयंती गुजर यांनी रस्त्यांची सध्याची अवस्था पाहून पावसाळ्यात डांबरीकरणाची कामे करू नयेत, असे आदेश दिले आहेत. या पाश्र्वभूमीवर उत्तम रस्त्यांसाठी महापौर-आयुक्तांनी स्वीकारलेला पुरस्कार हास्यास्पद ठरू लागला आहे.
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विकास योजनेच्या माध्यमातून साधारण दोन वर्षांपूर्वी महापालिकेने डोंबिवली स्थानक, मानपाडा, मुरबाड रोड भागांत रस्त्यांना नवा मुलामा चढविण्याचा प्रयत्न केला. याच रस्त्यांच्या जोरावर अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून थेट देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पुरस्कारही पदरात पाडून घेतला. प्रत्यक्षात जे रस्ते पाहून या पुरस्काराकरिता शिफारस करण्यात आली, त्यापैकी बहुतांश रस्त्यांची वर्षभरातच खराब अवस्था झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
खराब असलेले रस्ते
कल्याण पूर्वेतील चिंचपाडा, कोळसेवाडी, काटेमानिवली रस्ता, मुरबाड रोड, पत्रीपूल ते दुर्गाडी पूल, संतोषी माता रोड, नांदिवली रोड, आयरे रोड, गरीबाचावाडा, महाराष्ट्रनगर, नवापाडा, गणेशनगर, मोठागाव, मानपाडा रोड.
नागरिक काय म्हणतात
भाऊ साठे - पुरस्कार देण्यापूर्वी पुरस्कार जाहीर करणारी निवड समिती कधी कल्याण-डोंबिवलीत आली होती का? या समितीने आता या शहरांमध्ये यावे. रस्त्यांच्या वाईट परिस्थितीमुळे घराबाहेर पडणे नको वाटते. अशी परिस्थिती असताना पालिकेला स्वच्छ सुंदर रस्त्यांसाठी पुरस्कार शासन देणार असेल तर त्या पुरस्काराची, देणाऱ्याची ती क्रूर थट्टा आहे. राष्ट्रपतींचा हा अवमान आहे. जनता या रस्त्यांमुळे त्रस्त झाली आहे. लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम या पुरस्काराने केले आहे.

सतिश पाठक - शालेय शिक्षणातील लातूर पॅटर्न नागररत्न पुरस्कारात आणून राजकारणी मंडळीही भ्रष्ट मार्गाचा अवलंब करू शकतात हे एकवार पुन्हा सिद्ध झाले. न केलेल्या कामाचे कौतुक राष्ट्रपतींकडून करून घेऊन त्याच्या हसतमुखाच्या छब्या या करदात्या जनतेच्या जिव्हारी लागल्या आहेत. खडी, खड्डे, डबकी यांच्यामधून कल्याण-डोंबिवलीतील जनता चाचपडत चालत आहे आणि महापौर, आयुक्त निलाजरेपणे हसतमुखाने राष्ट्रपतींना अंधारात ठेवून न केलेल्या कामाचे कौतुक म्हणून पुरस्कार स्वीकारतात. यासारखी निषेधार्ह गोष्ट नाही.

डॉ. आनंद हर्डिकर -
कल्याण-डोंबिवली ही शहरे आहेत की डोंगर पठारावरील आदिवासी पाडे आहेत. आता आदिवासी पाडेही चकाचक रस्त्यांनी जोडले गेले आहेत. मग महासत्तेच्या उंबरठय़ावर असलेली कल्याण-डोंबिवली शहरे जगाच्या पलीकडे जाऊन खड्डयात का पडली आहेत? सर्वत्र खड्डय़ांचे थैमान असताना महापौर, आयुक्त पंधरा लाख जनतेला फसवून मोठय़ा कौतुकाने चांगल्या रस्ते कामाचे पुरस्कार स्वीकारतात हे पाहिल्यानंतर कपाळावर हात मारून घेण्याव्यतिरिक्त सामान्य माणूस काहीच करू शकत नाही.

दिलीप काणे - गेल्या वीस दिवसांपूर्वी पालिकेत जे सुनील जोशी प्रकरण घडले. त्या प्रकरणात पालिकेतील सत्ताधारी, सर्व पक्षांचे पदाधिकारी यांची लाज निघून गेली. ती आता परत मिळणे कठीण झाले. मग जोशी प्रकरणात जी माया ज्यांना मिळाली त्यांनी ती माया पुरस्कार देणाऱ्या संस्थेला देऊन नागररत्न पुरस्कार पालिकेने मिळवला असावा. कारण या पुरस्काराच्या निमित्ताने पालिकेची गेलेली लाज पुन्हा परत मिळेल असे शासक, प्रशासकांना वाटले असावे. चांगल्या माणसांना, व्यक्तींना कधीच पुरस्कार मिळत नाही. भ्रष्ट मार्गानेच बहुतांश पुरस्कार दिले जातात. त्यातील एक प्रकार कल्याण-डोंबिवली पालिकेतील चतुरस्र बुद्धीच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी केला असावा.

साधना जोशी - अग्नीने सीतामाईला जसे पोटात घेतले तसे हे खड्डे कोणाला अपघात, इजा करण्यापूर्वीच आम्हाला पोटात घेतील तर ते बरे होईल, असे हल्ली वाटतंय. कागदपत्रांवर खोटय़ानाटय़ा रेघोटय़ा ओढून त्या आधारे राष्ट्रपती पुरस्कार देणार असतील आणि मतदार जनता त्याच रस्त्यांवरून ठेचकळत, रडतखडत चालणार असेल तर त्या पुरस्काराचा तो घोर अपमान आहे. राष्ट्रपतींचा शासनानेच केलेला अवमान आहे. पक्षांचे जाहिरनामे बघून मतदार मतदान करतो आणि असे खोटे पुरस्कार माथी मारून घेतो. याचेच दर्शन या नागररत्न पुरस्काराने घडविले आहे. म्हणजे दोघेही कोणाच्या तरी हातातले बाहुले आहेत हेच स्पष्ट होते.

No comments:

Post a Comment