Friday, July 1, 2011

कळवा हॉस्पिटलवर मनसेची धडक

खालील लेख म टा च्या सौजन्याने ...................




औषधांचा काळाबाजार, पेशंटची हेळसांड, स्वच्छतेचे तीन तेरा, निष्काळजी डॉक्टर आणि डोळ्यांवर कातडे ओढून बसलेले प्रशासन अशा अनंत व्याधींमुळे ठाणे महापालिकेचे कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल अखेरच्या घटका मोजत आहे. या बेजबाबदार कारभाराचा निषेध करण्यासाठी मनसेने गुरुवारी हॉस्पिटलवर धडक मोर्चा नेला. पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. आर. टी. केंदे आणि डीन डॉ. मेत्रा यांच्या बेजबाबदार कारभारामुळेच हॉस्पिटलची आरोग्यव्यवस्था कोलमडली असून त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणीदेखील या वेळी करण्यात आली.

या हॉस्पिटलमध्ये पेशंटना योग्य आरोग्यसुविधा मिळाव्यात, यासाठी मनसेचे पदाधिकारी गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा करीत आहेत. त्याबाबतची निवेदनेदेखील संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. मात्र प्रशासन कुठल्याही प्रकारची हालचाल करीत नसल्याने मोर्चा काढून येथील गैरकारभार चव्हाट्यावर आणल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

सुमारे २० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या हॉस्पिटलच्या ओपीडीत दररोज एक हजार पेशंट येतात. मात्र त्यांच्यावरील उपचारांसाठी पुरेशा प्रमाणात डॉक्टर, सिस्टर, वॉडबॉय यांची नेमणूक झालेली नाही. येथील डॉक्टर बेकायदा खासगी प्रॅक्टिस करतात. अतिदक्षता विभाग आणि आणि ऑपरेशन थिएटरची संख्या वाढविण्याची गरज असतानाही त्याकडे लक्ष दिले जात नाही. पुरेसे भूलतज्ज्ञच उपलब्ध नसल्याने ऑपरेशनसाठी आलेल्या पेशंटचा खोळंबा होतो. दोन वर्षांपूवीर् घोषणा झाल्यानंतरही हॉस्पिटलमध्ये २४ तास पोस्टमाटेर्मची व्यवस्था आजतागायत सुरू झालेली नाही. अनेकदा मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापकांकडून पोस्टमाटेर्म केले जाते. मृतदेह ठेवण्यासाठी पुरेशा शवपेट्याही हॉस्पिटलमध्ये नसल्याची धक्कादायक माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

वीजबचतीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून हॉस्पिटलमध्ये सोलार यंत्रणा बसविण्यात आली होती. मात्र ती यंत्रणाच चोरीला गेली असून त्यातही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. मनोरुग्णांवरील उपचारांसाठी आलेले काही लाख रुपयांचे अनुदान इमारतींच्या नूतनिकरणासाठी वापरण्यात आले. या हॉस्पिटलच्या श्री साई सिध्दी सिटी स्कॅन सेंटरमध्ये ६०० रुपये अशा सवलतीच्या दरात स्कॅनिंग अपेक्षित असताना पेशंटकडून १२०० ते २००० रुपये उकळले जातात. त्याबाबतच्या असंख्य तक्रारी केल्यानंतरही कारवाई होत नाही. टेंडरच्या वादातून हॉस्पिटलचे मेडिकल गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. हॉस्पिटलच्या काही कर्मचाऱ्यांवर राजकीय वरदहस्त असल्याने ते घरबसल्या पगार घेत आहेत. येथील लिफ्ट बंद पडलेली असतानाही तिच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. पेशंटना डिस्चार्ज देताना पुढील महिन्याभराची औषधे देणे अपेक्षित असताना केवळ आठवड्याभराचीच औषधे दिली जातात. अशा असंख्य गैरप्रकारांकडे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले आहे.

मनसेचे ठाणे जिल्हा प्रवक्ते आणि सरचिटणीस राजन गावंड, मनोहर सुखदरे, संजय देशमुख, राजेश मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकतेर् या मोर्चात सहभागी झाले होते. मनसेच्या शिष्ठमंडळाने तक्रारी आणि मागण्यांचे निवेदन उपायुक्त के. डी. निपुतेर् यांना सादर केले असून येत्या आठ दिवसांत दोषी अधिकाऱ्यांची हकालपट्टी न झाल्यास त्यांना 'मनसे स्टाइल' धडा शिकविण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.

No comments:

Post a Comment