Wednesday, July 20, 2011

विभाग अधिकाऱ्याला मनसे नगरसेवकांनी नाल्यात बुचकळले

खालील बातमी लोकसत्ता च्या सौजन्याने ....



कल्याण परिसरातील नालेसफाईच्या पहाणीसाठी निघालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनी आज उद्धट वर्तन करणारे महापालिकेचे विभाग अधिकारी काशीनाथ पडवळ यांना थेट नाल्यातील सांडपाण्यात बुचकळून बाहेर काढल्याने महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली. ‘माझी आता बदली झाली आहे, त्यामुळे एक पेग मारुन येतो’, असे उद्गार काढल्यानेच पडवळ यांना नाल्यात ढकलल्याची सारवासारव या घटनेनंतर मनसेच्या नगरसेवकांना करावी लागली. दरम्यान, महापालिका वतुळात मात्र या घटनेचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विशेष म्हणजे, यावेळी संतापलेल्या मनसे नगरसेवकांनी आरोग्य निरीक्षक प्रशांत पुरी यांच्यावरही दांडगाई करत त्यांनाही गटाराच्या चेंबरमध्ये फावडे घेउन गाळ साफ करण्यासाठी उतरवून दांडगाईचे प्रदर्शन घडविले.
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या वैशाली दरेकर-राणे, मनसेचे गटनेते नरेंद्र गुप्ते व महापालिकेतील पक्षाचे अन्य नगरसेवक ‘ब’ प्रभागात सकाळपासून नाले सफाईची पाहणी करीत होते. ‘ब’ प्रभागात अनेक ठिकाणी नाले, गटारे तुंबले असल्याचे व जागोजागी पाणी साचल्याचे पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे संतापलेल्या दरेकर आणि गुप्ते यांनी मोबाईल करून प्रभाग अधिकारी पडवळ यांना घटनास्थळी बोलविले. पाऊण तासानंतर पडवळ व त्यांचे साथीदार घटनास्थळी आले. नालेसफाई झाली नाही, सर्वत्र पाणी तुंबले आहे, तुम्ही काय करता अशी प्रश्नांची सरबत्ती मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पडवळ यांच्यावर केली. मात्र, पडवळ यांनी तो विषय हसण्यावारी नेऊन ‘आता कुठे पाऊस पडतो आहे. माझी बदली झाली आहे. एक पेक मारून आता झोपणार अशी’ असे वक्तव्य केल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. या वक्तव्यामुळे संतापलेल्या मनसे नगरसेवकांनी पडवळ यांना थेट नाल्यातच ढकलले. नाल्यातील सांडपाण्यात बुचकळून पडवळ यांना बाहेर काढले.
पडवळ यांना हिसका दाखविल्यानंतर सहाय्यक आरोग्य निरीक्षक पुरी याला गटारातील चेंबरमध्ये उतरविण्यात आले. तेथील गाळ उपसण्यास पुरी यांना भाग पाडण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी वैशाली दरेकर यांच्याशी संपर्क साधला असता पडवळ यांना नाल्यात बुचकळून बाहेर काढण्यात आलेले नाही, अशी माहिती दिली. लहानसे गटार होते, त्यात त्यांना ढकलण्यात आले. या गटारात त्यांचा पाय अडकला, असे दरेकर म्हणाल्या. पडवळ यांनीही नाल्यात बुचकळल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे.

3 comments:

  1. अरे बाहेर कशाला काढले त्याला. बुडवूनच मारले पाहिजे होते.

    ReplyDelete
  2. असे प्रकार करून राजसाहेब फुकटचे शत्रू निर्माण करत आहेत.

    ReplyDelete
  3. शरयू, जर अधिकारी काम करत नसतील तर त्यांना वठणीवर आणावच लागेल ..... सामान्य लोकांसाठी काम करत असताना असल्या मुजोर अधिकाऱ्यांशी शत्रुत्व पत्कराव लागलं तरी बेहत्तर ....

    ReplyDelete