Wednesday, July 13, 2011

मनसेने बसवले कंत्राटदाराला खड्डय़ात!

खालील लेख लोकसत्ता च्या सौजन्याने ........................


मुंबईतील पूर्व द्रुतगती तसेच पश्चिम द्रुतगतीमार्गावरील जवळपास प्रत्येक उड्डाणपुलावर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले असून त्याचा मोठा फटका मुंबईकरांना बसत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज दादर पश्चिम येथील राम गणेश गडकरी उड्डाण पुलावरच खड्डे बुजविण्याचे कंत्राट घेतलेल्या एका कंत्राटदाराला चांगला चोप देऊन खड्डय़ात बसवून ठेवले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अलीकडेच लालबाग येथील उड्डाणपुलाचे उद्घाटन केल्यानंतर अवघ्या काही दिवसातच या नव्या उड्डाण पुलावर खड्डे पडले. यामुळे प्रचंड टीका झाल्यानंतर खडबडीने जागे झालेल्या मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएच्या या कामाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या चौकशीतून काय निष्पन्न झाले ते अद्यापि जाहीर झाले नसले तरी मुंबईतील जवळपास प्रत्येक उड्डाणपुलावर पावसामुळे मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत. यातील बहुतेक उड्डाण पुलांची कामे एमएमआरडीएने केली असून खड्डे बुजविण्याची जबाबदारी पालिकेच्या माथी मारण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दादरचा राम गणेश गडकरी उड्डाण पूल हा थेट पालिकेच्या केईम रुग्णालयाजवळ जात असून या उड्डाण पुलावरील खड्डे तात्काळ दुरुस्त करावे अशी लेखी विनंती मनसेच्या दादर येथील उपविभागअध्यक्ष अमेय खोपकर यांनी संबंधित कंत्राटदाराकडे गेल्या आठवडय़ात केली होती. मनसेच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार या कंत्राटदाराला एकूण चाळीस उड्डाण पुलावरील खड्डे बुजविण्यासाठी आठ कोटी नव्वद लाखांचे कंत्राट पालिकेने दिले होते. मात्र त्याने मनसेच्या लेखी निवेदनाला दाद न दिल्यामुळे अमेय खोपकर यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी या कंत्राटदाराची गचांडी धरून त्याला गडकरी पुलावर नले. तेथे त्याला भरपूर चोप देण्यात आला तसेच उठाबशाही काढायला लावल्या. यानंतर या कंत्राटदाराला उड्डाणपुलावरील खड्डय़ात बसविण्यात आले. या उड्डाण पुलावर किमान पन्नास खड्डे असल्याचे खोपकर यांनी सांगितले. कंत्राटदाराप्रमाणेच एमएमआरडीए तसेच पालिकेच्या सनदी अधिकाऱ्यांना झटका देण्याची खरी गरज असल्याचे मनसेच्या एका सरचिटणीसाने सांगितले. मोठ मोठी कंत्राटे देताना कामाचा दर्जा तसेच ते योग्य प्रकारे होत आहे अथवा नाही, हे आयएएस अधिकारी कधीतरी पाहणार आहेत की नाही, असा सवालही या सरचिटणीसाने केला. राज्यातील बहुतेक सनदी अधिकारी वेळोवेळी परदेशात जात असतात. तेथील रस्त्यांप्रमाणे किमान पंधरा वर्षे टिकेल, असा एकही रस्ता आजपर्यंत का बांधण्यात आलेला नाही, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. सामान्य रस्ते वेळोवेळी विविध कामांसाठी खणावे लागतात. तशी स्थिती उड्डाणा पुलांची नसते. मात्र त्यावरही खड्डे पडणे ही गंभीर बाब असून केवळ कंत्राटदारालाच नव्हे तर संबंधित विभागाच्या सर्वोच्च अधिकाऱ्याला त्यासाठी जबाबदार धरले पाहिजे असे अमेय खोपकर म्हणाले.

No comments:

Post a Comment