Thursday, April 29, 2010

मनसेतर्फे विभूतींचा महागौरव!

म टा च्या सौजन्याने


म. टा. खास प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मनसेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या खाद्यमहोत्सवात ३० एप्रिलला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचा आढावा घेणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे अशा महान विभूतींचा गौरवही होणार आहे.

मनसेने अंधेरी स्पोटर्स कॉम्प्लेक्स येथे आयोजित केलेल्या खाद्यमहोत्वाची २९ एप्रिलला सांगता होत असून ३० एप्रिल रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासाचा आढावा घेणारा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करून महाराष्ट्राचे आणि भारताचे नाव जगभरात उंचावणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे.

गौरवमूतीर्ंमध्ये रवी शास्त्री, दिलीप वेंगसरकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, साहित्यिक शं. ना. नवरे, अभिनेते अशोक सराफ, ज्येष्ठ गायिका किशोरी अमोणकर, सुमन कल्याणपूर, ज्येष्ठ पत्रकार निळकंठ खाडिलकर, केसरी टूर्सचे केसरी पाटील, एन्टरटेन्मेन्ट उद्योगातील अग्रणी संजय गायकवाड आदींचा समावेश आहे.
................

आतषबाजी

मनसेच्यावतीने ३० एप्रिल रोजी रात्री बारा वाजता मुंबईसह पुणे, नाशिक या शहरांमध्ये आतषबाजी करून सुवर्णमहोत्त्सवी वर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे. हा सुवर्णमहोत्सव दिवाळीप्रमाणे साजरा करावा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावतीने करण्यात आले आहे.


Friday, April 23, 2010

आयपीएलची पाळेमुळे खणाः राज

म टा च्या सौजन्याने



मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई

आयपीएलमध्ये जो काही भ्रष्टाचार झाला आहे. ते खणण्याचे काम सुरू झाले आहे. असे खणत असताना जर मध्ये कुठे पाइपलाइन आली तर ते काम थांबवू नका, या भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोदून काढा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत केली.

मनसेच्या वतीने खाद्य मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्याच्या उद्घाटनाच्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली. आयपीएलमध्ये भ्रष्टाचार होतो आहे म्हणून आयपीएल बंद करणे किंवा क्रिकेट बंद करणे हा उपाय होणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करून बड्या माशांनाही जाळ्यात अडविण्यात यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

राज्य सरकारने आयपीएलला करमणूक कर रद्द का केला असा सवाल उपस्थित करत राज म्हणाले, असा कर रद्द करायला हे कोणी सांगितले. ते काय ललित मोदींनी सांगितले नाही. यात पवार यांचीही भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. हा प्रकार उघडकीस आला नाही तोपर्यंत शरद पवार याच ललित मोदीचे गोडवे गात होते. परंतु आता या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही असे ते म्हणतात. याचा काय अर्थ होतो. ललित मोदी या व्यक्तीवर अमेरिकेत अमंली पदार्थांच्या तस्करीचा गुन्हा दाखल आहे. अशा व्यक्तीबद्दल पवारांना माहित नाही. अशाच पार्श्वभूमीची माणसं यांच्या भोवती कसे जमतात असा सवालही त्यांनी यावेळी केला. प्रफुल पटेल आणि पवार यांच्या राजीनाम्याने काही होणार नाही. केंद्र सरकारने स्वच्छता करायची असेल तर ती मुळापासून करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मला राहून राहून एक प्रश्न पडतो आहे. पवार साहेब म्हणतात की आयपीएलशी माझा काही संबंध नाही. मग राज्य सरकारने आयपीएलवरील करमणूक कर कोणाच्या आदेशावरून रद्द केला. याचे मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्र्यांनी राज्याच्या जनतेला द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

प्रकाश झोतात सामने, राज्यात लोडशेडिंग
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात आयपीएलचे सामने झाले. त्यातील बहुतांशी हे प्रकाश झोतात झाले. महाराष्ट्रातील अनेक भागात आज लोडशेडिंग होत असताना महाराष्ट्राच्या सरकारने असे सामने खेळवून त्यांना करमणूक कर का लावला नाही, असा प्रश्न निर्माण होतो आहे.

थरूर अफेअर्स मिनिस्टर
थरून हा माणूस एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर नव्हता तर तो अफेअर्स मिनिस्टर होता. रोज उठून नवा वाद, त्यामुळे तो गेला ते बरं झालं. अति हुशार विक्षिप्त माणसं असतात ना त्यातील हा प्रकार आहे.

लता दिदी राजकीय शिबिरात गाणार नाही
लता दिदी यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे, पण या कोणत्याही पक्षाच्या शिबिरात गाणार नसून त्या १ मे म्हणजे महाराष्ट्रदिनाच्या कार्यक्रमात गाणार आहेत. त्या माझ्या कार्यक्रमातच आल्या होत्या.

कशातही महाराजांचा झटका
कोणालाही महाराजांच्या नावाचा झटका आला तर ते महाराजांबद्दलचे प्रेम होत नाही. त्या झटक्याला आम्ही विरोध केला तर मग आम्ही महाराजांना विरोध करतोय असे ते म्हणतात. माझा पक्ष महाराजांना विऱोध करे असे स्वप्नातही शक्य आहे का, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

शिवाजी पार्कच्या कामात लोकांना विश्वासात घ्यावे
शिवाजी पार्क येथे होणा-या कामाबद्दल तेथील नागरिकांना विश्वासात घेवून काम करणे गरजेचे आहे.

मनसेतून त्यांनी खुशाल बाहेर जावे
मनसेमधून कोणी बाहेर पडणार असल्याची मला आताच माहिती मिळाली. त्यांना जर जायचं तर त्यांनी खुशाल जावं, असे राजन राजे यांचे नाव न घेता त्यांनी सांगितले.

Monday, April 19, 2010

महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना

परवा स्टार माझा वर परळी वैजनाथ वरून पुण्याला जाणाऱ्या जोडप्याला लुटणारी व गाडीत असलेल्या महिलेवर बलात्काराची बातमी पाहिली आणि तळपायाची आग मस्तकात गेली. काय चाललाय काय महाराष्ट्रात आणि विशेषता पुण्यात, गुन्हेगार मोकाट सुटले आहेत आणि त्यांना पोलिसांचे काहीही भयं राहिले नाही असच एकंदरीत चित्र आहे.

आमचे आर आर आबा तर ह्याला सोडणार नाही त्याला सोडणार नाही अश्या फुशारक्या मारत राहतात पण त्यांचा आणि पोलिस यंत्रणेचा ह्या असल्या गुंडावर वचकच नाही राहिला कारण हेच गुंड ह्या राजकारण्यांना निवडणुकीत मदत करतात आणि मग पूर्ण प्रशासनाला वेठीस धरतात.

पुण्याचे आयुक्त तर अजून वरचढ, त्यांच्या म्हणण्या प्रमाणे अश्या घटना घडत असतात आणि त्या घडतात म्हणून कायदा व्यवस्था धोक्यात आहे अस काही समजण्याची गरज नाही. जर हाच प्रसंग त्यांच्या वर किवा त्यांच्या जवळपास च्या नातेवाईकावर आला तर ते हेच बोलतील का?

परळी वैजनाथ ची घटना हि महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे आणि सरकारने त्यावर त्वरित कारवाई करावी व गुन्हेगारांना शिक्षा होईल ह्याची काळजी घ्यावी म्हणजे झालं.

विनोद


Wednesday, April 14, 2010

शिवसेना-भाजपमध्ये ‘ऑल इज नॉट वेल!’

लोकसत्ता च्या सौजन्याने

ठाणे/खास प्रतिनिधी

आमदार एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या जिल्हा संपर्कप्रमुखपदी प्रमोशन मिळाल्यानंतर दिवंगत आनंद दिघे यांच्या प्रमाणेच संघटनेवर त्यांची मजबूत पकड राहील, ही अपेक्षा फोल ठरत चालली आहे. दुसरीकडे मित्रपक्ष असलेल्या भाजपमध्येही आता जातीयवाद उफाळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. २०१४ मधील निवडणुका जिंकण्यासाठी दलित व मुस्लिमांना पक्षाकडे आकर्षित करण्याची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष करीत असताना पालिका वा संघटनेतील महत्त्वाच्या पदांवर ब्राह्मण नेत्यांना बसवून जिल्ह्याचे नेते आपल्याच वरिष्ठांच्या योजनांना सुरुंग लावण्याचे काम करीत आहेत. यामुळे एकंदरीतच सेना व भाजपमध्ये ‘ऑल इज नॉट वेल’ अशी अवस्था झाली आहे.
विधानसभा निवडणुका झाल्यानंतर पहिल्याच अधिवेशनास एकनाथ शिंदे, राजन विचारे व प्रताप सरनाईक हे तिघेही एकाच मोटारीतून जाऊ लागल्याने गटातटात विखुरलेले शिवसैनिकही सुखावले, पण या ‘त्रिमूर्ती’चा हा एकत्रित प्रवास फार काळ टिकला नाही. ‘एकता एक्स्प्रेस’ लगेच शंटिंग यार्डात स्थिरावली.
वास्तविक तीन आमदारांनी एकत्रित शहराचे प्रश्न मांडले तर ते सुटण्यास निश्चितच मदत होईल, पण प्रत्येक जण आपला स्वतंत्र अजेंडा राबवीत आहे. वाढदिवशी शक्तिप्रदर्शन करणे व कार्यकारीप्रमुख उद्धव ठाकरे यांना कार्यक्रमासाठी आणून ‘मातोश्री’वर कोणाचे वजन जास्त आहे, हे दाखविण्याची स्पर्धाच जणू सेनेत लागली आहे.
दिघे यांच्याप्रमाणे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना मिळाले असले, तरी सर्वाना बरोबर घेऊन जाण्याऐवजी गटबाजीचे राजकारण त्यांनी चालू ठेवले आहे. परिणामी भिवंडी, पालघर, अंबरनाथ, डोंबिवली येथील अनेक पदाधिकाऱ्यांनी सेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. साईनाथ पवार, उदय बंधू पाटील, प्रा. रवी पाटील यांच्यासारखे पदाधिकारी गमावणे सेनेला भविष्यात महागात पडू शकते.
खासदार संजय राऊत व दगडू सकपाळ यांच्याबरोबरच शिंदे यांच्यावरही नवी मुंबईची जबाबदारी टाकण्यात आली, पण शिंदे यांना नवी मुंबईची वाट बिकट वाटत असल्याने ते अंबरनाथ व बदलापूरकडेच लक्ष देत राहिले . तेथेही युती फिस्कटल्याने त्याचा फटका दोघांनाही बसला. अंबरनाथमध्ये आघाडीचा नगराध्यक्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत.
दिवंगत आनंद दिघे कुणालाही सहज उपलब्ध होत असत, पण शिंदे यांच्या दरबारात मात्र ठराविक भाग्यवंतांनाच स्थान मिळत असल्याच्या तक्रारी येत आहेत. सरनाईक, विचारे मोबाइलवर तरी सहज उपलब्ध असतात, पण शिंदे यांचा मोबाईल ज्या स्वीय सचिवाकडे असतो तो फोन केला की ‘साहेब मीटिंगमध्ये आहेत’ असे सांगत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना जावे तरी कुणाकडे हा प्रश्न सतावीत आहे. सेनेच्या तीनही आमदारांमध्ये सुसूत्रता नसल्याने सर्वसामान्य शिवसैनिक मात्र अस्वस्थ आहे. यातूनच ठाणे महापालिका पोटनिवडणुकीत सेनेला फटका बसला. सेनेची जागा राष्ट्रवादीने हिरावून घेतली. सरनाईक यांनी चूक मान्य करून पराभवाची जबाबदारी स्वीकारली तरी अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत.
पूर्वीच्या महापौर निष्क्रिय होत्या, असी ओरड चालू असे. नवे महापौर अशोक वैती यांनी पहिल्याच मुलाखतीत शहराचा चेहरा मोहरा बदलण्याची घोषणा केली होती. पण सॅटिस परिसर, गोखले रोड, राम मारुती रोड, तलावपाळी यासारख्या रस्त्यांवरील मुजोर फेरीवाले कुणालाच जुमानत नाहीत.
महापौरांनी या परप्रांतीय फेरीवाल्याचा कायमचा बंदोबस्त केला तरी ठाणेकर त्यांना धन्यवाद देतील. सध्या ‘प्रश्न तुमचे, उत्तर महापौरांचे’ यासारख्या सवंग व कालबाह्य उपक्रमात महापौर वेळ घालवत आहेत. त्या अेवजी प्रभाग अध्यक्ष, प्रभाग अधिकारी यांना सोबत घेऊन ‘महापौर तुमच्या प्रभागात’ सारख्या योजना राबविल्या तर ‘ऑन द स्पॉट’ निर्णय होऊन जनतेला दिलासा मिळेल. अधिकाऱ्यांनाही वचक राहील, असे शहरवासियांचे म्हणणे आहे. ‘ह’ प्रभाग अधिकाऱ्यांना तुमच्या सूचनेकडे लक्ष देण्यास सांगितले आहे, तुमच्या प्रभागात कचरा साठणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांस दिले आहेत, अशी गुळगुळीत व सरकारीछाप उत्तरे देऊन जनतेला मूर्ख बनवता येणार नाही, हे महापौरांनी ध्यानी ठेवले तरी खूप झाले. आता महापौरांना ‘स्कोडा ’ चे वेध लागले आहेत. बरे झाले भाजपनेच त्यांच्या या हट्टाला ब्रेक लावला. शिंदे यांनी वेळीच याकडे लक्ष न दिल्यास पालिका निवडणुकीपर्यंत परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती आहे.
तीनही पालिकांच्या निवडणुकीत भाजपलाही चांगलाच दणका बसला. नवी मुंबईत हावरेंची हवा चालली नाही. राम पातकर यांच्या कार्यामुळे बदलापूरमध्ये युतीला सत्ता मिळणार आहे. मात्र दुसरीकडे, भाजपचे आमदार संजय केळकर, संघटनमंत्री राजेश देशमुख यांच्यावरही बहुजन समाजातील कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी व नवे प्रदेशाध्यक्ष सुधीर मनगुंटीवार हे दलित व मुस्लिमांना पक्षात आणून त्यांचे गैरसमज दूर करण्याची भाषा करीत आहेत. २०१४ मध्ये केंद्रात व राज्यात सत्तेवर येण्याची स्वप्ने रंगवीत आहेत. येथे मात्र स्थायी समिती व परिवहन समिती सभापतीपद, शहर अध्यक्षपद ब्राह्मण नेत्यांकडे जाणीवपूर्वक दिले गेले. ज्यांना ही पदे मिळाली ते त्यासाठी लायक असतीलही, पण पक्ष वाढविताना सर्वाचा विचार होणे गरजेचे आहे, असे काही कार्यकर्त्यांनी बोलून दाखविले.
‘ब्राह्मणांचा पक्ष’ ही ओळख पुसून टाकण्यासाठी केंद्रीय व राज्य पातळीवर प्रयत्न होताना ठाण्यात मात्र पक्षाचे नेते वेगळीच भूमिका घेत आहेत, याला काय म्हणणार?

अंबरनाथमध्ये मनसेची सत्त्वपरीक्षा ; बदलापुरात म्हात्रेंची अडचण

लोकसत्ता च्या सौजन्याने


ठाणे/प्रतिनिधी ,बुधवार, १४ एप्रिल २०१०
अंबरनाथ आणि बदलापूरच्या नगरपालिका निवडणुका अखेर पार पडल्या. आता साऱ्यांचे लक्ष १० मे रोजी होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे लागले आहे. अंबरनाथला कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने मनसे, तसेच अपक्षांची भूमिका पालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार हे ठरविणार आहे. बदलापूरमध्ये ३४ जागांपैकी शिवसेना - १२, भाजप- सात यांचे संख्याबळ १९ होते, तर राष्ट्रवादी काँग्रेस - १०, काँग्रेस - एक, मनसे - तीन आणि अपक्ष - एक असे मिळून १५ संख्याबळ होते. या आकडेवारीमुळे बदलापुरात पुन्हा युतीची सत्ता येणार हे वरवर निश्चित दिसत असले तरी तिथे वामन म्हात्रेंना नगराध्यक्षपद देण्यास या दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांचा विरोध आहे. या मुद्दय़ावर युतीची गणिते बिघडली तर राष्ट्रवादी (१०) भाजप (७) आणि कॉंग्रेस तसेच अपक्ष प्रत्येकी एक असेही एक एकोणीसचे गणित येथील राजकीय वर्तुळात मांडले जात आहे. युतीच्या सत्तेत आपण नगराध्यक्षपदाचे दावेदार असणार का, या प्रश्नावर वामन म्हात्रे यांनी मात्र पक्ष देईल तो आदेश प्रमाण मानू असे ‘वृत्तान्त'शी बोलताना सांगितले, तर नगराध्यक्ष राम पातकर यांनी युतीशिवाय सत्तेसाठी मांडल्या जाणाऱ्या वेगळ्या समीकरणाची शक्यता स्पष्टपणे नाकारली.
अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी (९), रिपाइं (८), कॉंग्रेस (३) असे २० नगरसेवकांचे संख्याबळ आहे. त्यांना बहुमतासाठी सहा इतर नगरसेवकांचे समर्थन आवश्यक आहे. आठ अपक्ष नगरसेवक निवडून आले असले तरी त्यातील चार नगरसेवक शिवसेना समर्थक आहेत. येथे मनसेची भूमिका निर्णायक मानली जात असली तरी त्यांची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर' अशीच आहे. कारण युती अथवा आघाडी कोणत्याही एकास पाठिंबा देणे त्यांच्यासाठी पुढे होऊ घातलेल्या कल्याण-डोंबिवली तसेच मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकीला सामोरे जाताना गैरसोयीचे ठरणारे आहे. हा पुढील राजकीय प्रवास विचारात घेऊन मनसे तटस्थ राहिली तर येथील सत्तेचा पेच अधिकच बिकट होईल. भाजपचे एक मत मिळाले तरीही सेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी नऊ मतांची आवश्यकता लागणार आहे आणि सर्वच अपक्षांचा पाठिंबा गृहीत धरला तरी त्यांना एक मत कमी पडत आहे. अशा परिस्थितीत येथे नगराध्यक्षपद तसेच सत्तेसाठी मोठय़ा प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. येथे राष्ट्रवादीचे विद्यमान शहराध्यक्ष सदा पाटील नगराध्यक्षपदाचे दावेदार मानले जातात. थोडक्यात, युती आणि आघाडीच्या रस्सीखेचीत मनसेला सत्वपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. मनसेच्या मतविभाजनाचा कॉंग्रेस आघाडीला फायदा होतो, असा आरोप वर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीपासून शिवसेना करीत आली आहे.
लोकसभा तसेच सहा महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीतील आकडेवारी त्यासाठी उदाहरणादाखल दिली जाते. आता प्रत्यक्ष वेळ आल्यावर राज ठाकरे कोणता निर्णय घेतात, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली

आज १४ एप्रिल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती त्यानिमित्ताने "मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा" तर्फे ह्या महा मानवास भावपूर्ण आदरांजली



Tuesday, April 13, 2010

गड राखले; कारभाराचे काय?

मनसे ला बदलापूर व अंबरनाथ येथे जरूर यश मिळाले आहे ज्यामध्ये बदलापूर येथून ३ नगरसेवक तर अंबरनाथ मधून ६ नगरसेवक निवडून आलेले आहेत. महत्वाचं म्हणजे बदलापूर मध्ये राज साहेबांनी काही लोकांच्या दादागिरी ला भीक न घालता कटू निर्णय घेतले आणि शिव सेनेने अपरिहार्य कारणाने अश्या लोकांना जवळ केले. त्यांना अश्या तडजोडीतून नजीकच्या काळात फायदा होईल पण भविष्य काळात अशी लोक डोई जड होतील ह्या बद्दल शंका नाही. असो आमच्या तीन सीट आल्या त्याबद्दल आम्ही खुश आहोत. बदलापूर कर आणि अंबरनाथ करांचे त्याबद्दल धन्यवाद

नवी मुंबईत आणि औरंगाबाद मध्ये मनसे ला यश मिळू शकल नाही आणि माझी खात्री आहे की राज साहेब तेथील संघटना वाढीकडे भरीव लक्ष घालतील.

तुम्ही जर कधी ह्या निवडणुका जवळून बघितल्या असतील तर एक गोष्ट लक्षात येते की ह्या निवडणुका खरं म्हणजे पैसे खर्च करून विकत घेण्या सारख्या झालेल्या आहेत, त्याच कारण आहे महापालिकेत येत असलेला अमाप पैसा आणि नगरसेवकांना त्या मधील मिळणारा वाटा. माझ्या माहिती प्रमाणे प्रत्येक वार्डमध्ये १५ ते २५ लाख रुपये खर्च केले गेले. काही ठिकाणी तर हि रक्कम ५० लाखाच्या घरात गेली. ज्या कोणी लोकांनी पैसे घेऊन आपल मत दिले असेल त्यांना कळणार नाही की ते आपल्या शहराला बकाल करण्यात हात भार लावत आहेत. काय खरं कि नाही? तुमचं काय मत आहे, कळवावे

आजच सकाळी म टा मध्ये खालील लेख वाचला आणि तो सदर करीत आहे तुमच्या साठी


महाराष्ट्रातील नवी मुंबई व औरंगाबाद या दोन महापालिका तसेच अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर आणि विदर्भातील मोवाड या तीन नगरपालिकांमधील निवडणुकांचे निकाल जाहीर

झाले असून प्रथमदर्शनी तरी नागरिकांनी आपल्या विद्यमान सत्ताधाऱ्यांच्याच बाजूने कौल दिल्याचे दिसत आहे. पण या निकालांनी खऱ्या अर्थाने चपराक मिळाली आहे, ती काँगेसला! मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी औरंगाबाद महापालिकेतील शिवसेनेची गेल्या दोन दशकांची सत्ता मोडून काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या प्रदीप जयस्वाल यांच्या शहर विकास आघाडीला राज्यातील सत्ताधारी आघाडीने आपलेसे करून त्यांना १६ जागाही सोडल्या होत्या. तरीही औरंगाबादच्या वतनावर चव्हाणांना कब्जा करता आला नाही तो नाहीच; उलट गेल्यावेळेपेक्षा काँगेसच्या जागाही कमी झाल्या आहेत! हे अपयश मोठे आहे आणि मुख्यमंत्र्यांबरोबरच औरंगाबादची सूत्रे हाती असलेल्या चार मंत्र्यांनाही ती जबाबदारी टाळता येणार नाही. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार नावाच्या मंत्र्याने आपल्याच पक्षाच्या कार्यर्कत्यास जाहीर मारहाण केली होती आणि तरीही त्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यास मुख्यमंत्री वा काँगेस संघटना धजावली नव्हती. औरंगाबादेतील कौल हा एका अर्थाने सरकारपक्षाच्या या वागण्याविरोधातील कौल आहे. पण त्याचवेळी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या युतीलाही गेल्या वेळेप्रमाणेच याहीवेळी स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. खरे तर गेल्या वेळी २६ जागा जिंकणाऱ्या शिवसेनेचे यावेळी ३० नगरसेवक निवडून आले आहेत; पण त्याचवेळी भाजपची सदस्यसंख्या सहाने कमी होऊन १५वर आली आहे. स्पष्ट बहुमतासाठी युतीला पाच नगरसेवकांची गरज आहे. ते कुठूनही मिळवता येतील आणि अखेर सत्ता युतीचीच येईल; पण कायम अपक्ष वा अन्य छोट्या पक्षांच्या कुबड्या घेऊन युतीला कारभार करावा लागणार आहे. त्याचबरोबर या निवडणुकीची सारी सूत्रे हातात असलेले शिवसेनेचे माजी खासदार चंदकांत खैरे यांचे चिरंजीव हृषिकेश आणि खैरे यांनीच उमेदवारी दिलेले त्यांचे वाहनचालक या दोहोंच्या पदरी पराभव आल्याने घराणेशाहीचे राजकारण एका विशिष्ट मर्यादेपलीकडे आपण खपवून घेणार नसल्याचेही मतदारांनी दाखवून दिले आहे. हा औरंगाबादवरच्या खैरे यांच्या सुभेदारीला मोठाच धक्का आहे. पण औरंगाबादेतील वतनदारीला मतदार धक्का देत असतानाच, नवी मुंबईतील गणेश नाईक यांचे साम्राज्य मात्र अबाधित राहील, याची काळजी नवी मुंबईकरांनी घेतली आहे. नाईक यांचे हे यश विशेष लक्षणीय अशा अर्थाने आहे की एकीकडे औरंगाबाद, अंबरनाथ आणि बदलापूर-कुळगाव या तीन पालिकांमध्ये राज्याची धुरा सांभाळणाऱ्या दोन्ही काँगेस आघाडी करून रिंगणात उतरलेल्या असतानाच, केवळ नवी मुंबईत मात्र नाईक यांच्याच आग्रहामुळे आघाडी झालेली नव्हती. त्यामुळेच तेथे राष्ट्रवादीच्या विरोधात काँगेसचे उमेदवार सर्वच्या सर्व म्हणजे ८९ मतदारसंघांत मैदानात उतरले होते. तरीही नाईकांनी एकहाती ५५ जागा जिंकून राष्ट्रवादी काँगेसचा हा गड कायम राखला आहे. शिवाय, विलासराव देशमुख व अशोक चव्हाण यांचे डावे उजवे हात समजले जाणारे नामदेव भगत आणि रमाकांत म्हात्रे हे दोघेही पराभूत होतील, याची जातीने काळजी घेतली आहे. औरंगाबाद, अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर या पालिकांपेक्षा नवी मुंबईशी असलेले मुंबईकरांचे नाते हे केवळ भौगोलिकदृष्ट्याच जवळिकेचे नव्हे तर भावनिक पातळीवरचेही आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीतील यशापयशाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांनी तेथे सारी ताकद पणास लावली होती. शिवसेनेला १६ जागा तरी मिळाल्या; पण राज ठाकरे यांच्या सभांना भरभरून गदीर् करणाऱ्या नवी मुंबईकरांनी मनसेच्या वाट्याला मात्र एकही जागा येणार नाही, अशी व्यवस्था केली! पण त्याचवेळी अंबरनाथ-बदलापूर पट्ट्यात मात्र 'मनसे'ने आपले नऊ उमेदवार निवडून आणले आहेत. अंबरनाथमधील सहा मनसे नगरसेवकांनीच शिवसेना-भाजप युतीच्या हातात थेट सत्ता येणार नाही, अशी व्यवस्था केली आहे. याचवेळी तिकडे दूरवरच्या मोवाडसारख्या छोट्या गावातील मतदारांचा कौल हा काँगेसच्या नामुष्कीत भरच घालणारा आहे. १७ सदस्यांच्या या पालिकेत, राष्ट्रवादीला १० जागा मिळत असताना, काँगेसच्या वाट्याला आलेल्या जागा आहेत शून्य! महापालिका आणि नगरपालिका यांच्या निवडणुका या स्थानिक प्रश्ानवरच लढवल्या जात असतात आणि त्याचा राज्याच्या राजकारणावर काही प्रभाव पडत नाही, असे आता काँगेसवाले सांगतीलही. पण त्यामुळे मतदारांनी दिलेल्या कौलाचे महत्त्व कमी होणारे नाही. त्यामुळेच आता सर्वच पक्ष या पालिकांत 'राजकारण आणि अर्थकारण' बाजूला ठेवून शहर विकासाची कामे जातीने हाती घेतील, तर ते अधिक बरे होईल.

Friday, April 9, 2010

म टा फोटो गॅलरी - त्वरित बंद करा

आजच यशवंत चा लेख वाचला .... हि म टा फोयो गॅलरी हा खरोखरच घृणास्पद प्रकार आहे आणि तो त्वरित थांबला पाहिजे. मी म टा चा इमेल आय डी शोधण्याचा प्रयत्न केला पण सापडला नाही. त्यांचा mtonline@indiatimes.co.in इमेल आय डी बरोबर नाही आणि माझा इमेल परत आला. काय करावे काही कळत नाही. तुम्हाला काही कल्पना असेल तर कळवावे.

म टा ला सर्वानी निषेधाचा इमेल पाठवायला हवा, नाही काय?

विनोद

Monday, April 5, 2010

प्रेरक कहाणी

म टा मध्ये संजय झेंडे नि लिहिलेला एक चांगला लेख वाचला .... सादर करीत आहे तुमच्या साठी

हा लेख खालील लिंक वर देखील मिळू शकेल


खरोखरच काही वेळेला सामान्य लोक किती असामान्य काम करून जातात हेच चैत्राम पवार ह्यांनी दाखवून दिले आहे. अर्थात त्यांना सामान्य म्हणायच का हा प्रश्नच आहे. पुढील वेळी धुळ्याला गेलो कि नक्की जाईन बारीपाड‍याला

म टा च्या सौजन्याने

बारीपाडा. २० वर्षांपूर्वी ते एक ओसाड गाव होतं. आज मात्र ते आदर्श गाव ठरलं आहे. हे कसं झालं, त्याचाच वेध...

धुळे जिल्ह्यातील बारीपाडा हे ७५० लोकवस्तीचे आदिवासी गाव सध्या आधुनिक पर्यटनस्थळ म्हणून आकारास येत आहे. महिन्यात साधारणपणे १०० ते १५० पाहुणे या गावात येतात. यामध्ये देशातील निरनिराळ्या प्रांतांबरोबरच परदेशातून येणाऱ्या नागरिकांचाही समावेश असतो. लवकरच या ठिकाणी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील भेट देणार आहेत. अर्थात बारीपाडा हे काही सातपुड्यातील तोरणमाळसारखे थंड हवेचे ठिकाण नाही किंवा त्याठिकाणी एखादे प्राचीन शिल्प अथवा मंदिरही नाही. तरीदेखील बारीपाड्यास भेट देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवसे वाढते आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बारीपाडा हे आदर्श खेड्याचे एक मॉडेल आहे.

सन १९९१मध्ये कुऱ्हाडबंदीचा कायदा बारीपाड्यात कठोरपणे अमलात आणण्यास सुरुवात झाली. त्यामुळे परिसरातील ११०० हेक्टरवरील जंगल अबाधित राखणे शक्य झाले. या मूलभूत प्रयोगामुळेच बारीपाड्याची वाटचाल आज स्वयंपूर्ण खेड्याच्या दिशेने सुरू आहे. जंगल आणि जल संवर्धनासाठी लोकसहभागतून राबविण्यात आलेले विविध प्रयोग, पाण्याच्या पातळीत झालेली वाढ त्याअनुषंगाने शेतीत झालेले परिवर्तन, ग्रामस्थांच्या राहणीमानात झालेले बदल आणि गावात शिक्षण, आरोग्य आणि ऊर्जा याविषयी निर्माण झालेली जागरुकता या एकाच ठिकाणी अभावानेच आढळणाऱ्या बाबी पाहण्यासाठी बारीपाड्यामध्ये वर्दळ वाढते आहे. वाढलेली वर्दळ कॅश करण्याची संधी बारीपाड्यातील बचत गटांनी घेतली आहे. येणाऱ्या पाहुण्यांसाठी जेवण बनविणे, बारीपाड्याच्या गुऱ्हाळात तयार होणारा पौष्टिक गुळ तसेच बासमतीच्या पंक्तीत बसणारा बारीपाड्याची नवी ओळख झालेला तांदूळ पॅकिंग करून विकणे हा नवीन उद्योग पाहुण्यांच्या वाढत्या संख्येमुळे भरभराटीस येत आहे. बारीपाड्यातील अनेक वस्तूंनी आठवडे बाजाराची कक्षा ओलांडून मोठ्या शहरांमधील सुपरशॉपीमध्ये स्थान मिळविले आहे. गेल्या वषीर् नऊ टन सेंदीय तांदूळ विकण्यात आला.

धुळे शहरापासून सुमारे १०० किमी अंतरावर साक्री तालुक्यातील पिंपळनेरपासून २५ किमीवर बारीपाडा आहे. बारीपाड्यास स्वतंत्र ग्रामपंचायत नाही. मांजरी ग्रामपंचायतीच्या पाच पाड्यांपैकी एक पाडा असे सध्या बारीपाड्याचे शासन दरबारी अस्तित्व आहे. नैऋत्येकडे गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यातील आहवा तालुक्याची सीमा तर दक्षिणेस नाशिक जिल्हा. जवळच असलेल्या शेंदवड-मांजरी डोंगरात धुळे जिल्ह्याची जीवारेखा असलेल्या पांझरा नदीचे उगमस्थान. या निसर्गरम्य परिसरात असलेलं बारीपाडा.२० वर्षांपूवीर् एक ओसाड गाव होतं. सर्रास वृक्षतोडीमुळे जलचक्र बिघडलेलं. पाण्याची पातळी खालावलेली आणि पावसावर अवलंबून असलेली शेती पाण्याअभावी विस्कळित झालेली. गावातील राबणारे हात रोजीरोटीच्या शोधात बाहेर पडलेले. व्यसनाधिनता, कौटुंबिक कलह आणि जन्मोजन्मीचे दारिद्य. या दुष्टच्रकातून गावाला बाहेर काढायचं कसं हा मनाला घोर लावणारा प्रश्न एम.कॉम.पर्यंतचं शिक्षण घेऊन गावात परतलेल्या चैत्राम देवचंद पवार या तरुणास अस्वस्थ करीत असे. साक्री तालुक्यातील मालपूर-कासारे गावात पाहिलेल्या वृक्ष पालखी सोहळ्यातून प्रेरणा घेऊन चैत्रामने कुऱ्हाडबंदीचा कायदा ग्रामस्थांसाठी अमलात आणण्याचा निर्धार केला. जंगल तोडणाऱ्यास दंड असा नियम झाला. त्यामुळे अनेक समस्या, अडचणी, भांडणे असे टप्पे पार करीत या कायद्यामुळे जंगलतोडीवर निर्बंध आले. त्याच बरोबरीने दरवषीर् सामूहिकपणे वृक्षलागवडीचे प्रयोग होऊ लागले. पिंपळनेर परिसरातील वार्सा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून आदिवासींसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचं पूर्णवेळ काम करणाऱ्या डॉ.आनंद फाटक यांची चैत्राम आणि सवगंड्यांची भेट झाली; संवाद वाढला आणि बारीपाड्याच्या उत्थानाचे नवे पर्व सुरू झाले. डॉ. फाटक यांनी बारीपाड्यातील उत्साही तरुणांची सहल राळेगणसिद्धी, पाबल (जि.नगर) येथे नेली. तेथील प्रयोगांची पाहणी करण्यात आली. अण्णा हजारेंशी चर्चा झाली. तेव्हापासून बारीपाडा ग्रामविकास संकल्पनांची अंमलबजावणी करणारी प्रयोगशाळाच ठरली. जनसेवा फाउंडेशन, वनवासी कल्याण आश्रम या संस्थांची जोड मिळाली.

कुऱ्हाडबंदीचे सकारात्मक परिणाम तीन-चार वर्षांत दिसू लागले. जंगल सांभाळल्यामुळे पाणी अडविले गेले, जमिनीची धूप थांबली. ग्रामस्थांनी सुमारे ३५० दगडी बांध बांधले, पांझर तलावाची ऊंची वाढविली. त्यामुळे पाण्याची पातळी वाढली. बारीपाड्याच्या ग्रामस्थांना तीन किमी अंतरावरून पाणी आणावे लागत असे. आज परिसरातील पाच पाड्यांचा पाणीपुरवठा बारीपाड्यातून होतो. स्वत:ची शेती पाण्याअभावी विस्कळित झाल्याने बाहेरगावी मजुरीसाठी जाणारा शेतकरी बारीपाड्यात थांबू लागला. तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी या परंपरागत पिकांबरोबरच ऊस, कांदा, बटाटा, लसूण, सोयाबीनसारख्या नगदी पिकांचे उत्पादन शेतकरी घेऊ लागला. स्थलांतराचे प्रमाण घटले. परिसरातील पाड्यांमधील मजूर मजुरीसाठी पाड्यास येऊ लागले. विविध बचत गट, समित्यांमार्फत आरोग्य, शिक्षण, ऊर्जाविषयक जागृती यावर भर देण्यात आला. कुपोषणाचे प्रमाण घटले, वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व पटले. पाल्यांना किमान चवथीपर्यंत शिकवावे अन्यथा दंड भरावा, शाळेत नियमित न येणाऱ्या शिक्षकांचीही दंडापासून सुटका झाली नाही. विजेच्या तारांवर आकडे टाकणाऱ्यांचे मन वळविण्यात आले. मीटरसाठी आग्रह करण्यात आला. गोबर गॅस प्लॅन्ट, शोष खड्यांच्या निर्मितीमुळे गटार विरहित गाव या विविध प्रयोगांमुळे बारीपाडा चचेर्त आले. अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरले. परदेशात कौतुक झाले.

ऑस्ट्रेलियातून आलेल्या शैलेश शुक्ला या तरुणाने आपला पीएच.डी. प्रबंध बारीपाडा केंदबिंदू ठेवून लिहिला. आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी वास्तव्य केले. अनेक मान्यवर, जलतज्ज्ञ बारीपाड्यात येऊन गेले. त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा, मार्गदर्शक सूचनांचा लाभ बारीपाड्यने करून घेतला. त्याचाच एक भाग म्हणजे बारीपाड्याच्या जंगलात पिकणाऱ्या नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या वनभाज्यांचे प्रदर्शन भरविण्याचा प्रयोग सुरू झाला. दरवषीर् ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये वनभाज्यांचे प्रदर्शन भरते. गेल्यावषीर् आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनात विविध ७० वनभाज्यांपासून ६८५ प्रकारच्या चविष्ट भाज्या तयार करण्यात आल्या. या प्रयोगातनूच पुढे दुर्मिळ वनौषधींच्या संवर्धनाचा विषय समोर आला. परिसरातील वैदंूचे संमेलन आयोजित करण्याचा परिपाठ सुरू झाला. त्यांच्या परंपरागत ज्ञानाचा लाभ करून घेत वनऔषधींचा दस्तावेज तयार करण्याचा उपक्रम सुरू आहे. वनौषधींचे पृथ:करण व अधिक संशोधन यासाठी काही संस्थांची मदत घेण्यात येत आहे. मधुमक्षिका पालन, महू फुलांपासून तेल काढणे इत्यादी उत्पन्नाच्या साधनांची जोड मिळाल्याने गावातील बचत गट समृद्ध झाले. बारीपाड्यास भेट देणारा प्रत्येकजण गुरू असतो, या भावनेने पाहुण्यांकडे पाहणाऱ्या चैत्राम पवारच्या बारीपाड्यास जिज्ञासूंनी एकदा भेट देण्याची, सन २०२०मध्ये अपेक्षित समर्थ भारतातील एक समर्थ खेडे प्रत्यक्ष पाहण्याची संधी घ्यावी आणि ग्रामस्थांना कौतुकाची थाप देण्यास हरकत नाही.