Monday, January 31, 2011

राज ठाकरे डोंबिवलीत दाखल

खालील बातमी स्टार माझा च्या सौजन्याने ...........................


डोंबिवली भेटीवर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे डोंबिलीत दाखल झाले आहेत. या दौऱ्यासाठी राज ठाकरे चक्क लोकलचा प्रवास करुन ते डोंबिवलीत दाखल झाले आहेत. या भेटीत ते आपल्या २७ नगरसेवकांशी चर्चा करणार आहेत. नगरसेवक विरोधी पक्ष म्हणून व्यवस्थित काम करत आहेत का याचा ते आढाव घेणार आहेत.

या भेटीदरम्यान पक्षातील काही जणांचा ठाकरी शैलीत समाचार घेतला जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्याचप्रमाणे मनसेचे आमदार रमेश पाटील आणि प्रकाश भोईर यांनी कल्याण- डोंबिवलीत काय कामे केली याचाही आढावा घेतला जाणार आहे.

सत्ता जरी मनसेच्या हाती आली नसली तरी मनसेचा वचक राहणार असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होते. तसंच केवळ निवडणुकीपुरतेच नाही तर कल्याण-डोंबिवलीत येत राहणार. सगळ्या गोष्टींवर बारीक लक्ष ठेवणार, असेही राज ठाकरे यांनी निवडणुकीदरम्यान सांगितले होतं. मात्र नोव्हेंबर महिन्यात महापौरपदाची निवडणूक पार पडल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी राज ठाकरे यांनी डोंबिवलीला भेट दिली आहे.

Tuesday, January 25, 2011

भेसळखोरांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्याला जिवंत जाळले

अजित पवार / आर आर आबा ......

आता ह्या भेसळ खोरांना देणार का नाल बंदी ????????

आपला

विनोद

खालील लेख स्टार माझा च्या सौजन्याने ......



स्टार माझा वेब टीम । मनमाड
पेट्रोल आणि डिझेलमधील भेसळ रोखण्यासाठी गेलेल्या नाशिकच्या अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे यांना भेसळखोरांनी पेट्रोल आणि रॉकेल टाकून जिवंत जाळण्याची क्रूर घटना मनमाडपासून जवळच असलेल्या पाणेवाडी परिसरात घडली. य़ात सोनावणे यांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक जिल्ह्यातील मनमाडपासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या पाणेवाडी येथे भारतातील सर्वात मोठे पेट्रोल आणि डिझेलचे साठे आहेत. या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होते. ही भेसळ होत असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे यांना कळाली. आपल्या पथकासह सोनावणे या ठिकाणी गेले. त्यावेळी पेट्रोल-डिझेल माफिया यांच्या बाचाबाची झाली. त्यानंतर भेसळखोरांनी सोनावणे यांच्या अंगावर पेट्रोल आणि डिझेल ओतून त्यांना आग लावली. या आगीत सोनावणे गंभीर जखमी झाले आणि त्यात त्यांचे घटनास्थळी निधन झाले.

ही घटना कळताच पोलिस घटना स्थळी पोहचले. तोपर्यंत सोनावणे भाजून कोळसा झाले होते, असे पोलिसांनी सांगितले. या संदर्भात भेसळ माफिया पोपट नावच्या व्यक्तीवर संशयाची सुई जात असून तो फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या घटनेची चौकशी सुरू केली असून दोषीवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे नाशिकचे जिल्हाधिकारी पी. वेल्लारसू यांनी सांगितले.
राज्यात विशेषतः नाशिक जिल्ह्यात भेसळीचे प्रमाण वाढते आहे. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना मारहाण किंवा त्यांच्यावर हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अशा भेसळखोरांविरोधात मोक्का लावण्यासंदर्भात कारवाई सरकार करेल, असे आश्वासन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे.

सत्कारात दंग! औचित्यभंग!! पंडितजींच्या अंत्यसंस्काराला पुण्याचे पालकमंत्री शक्य असून अनुपस्थित

राष्ट्रवादी ला सत्तेचा माज आला आहे, अजून काय?

खालील लेख लोकमत च्या सौजन्याने ........

पुणे, दि. २४ (प्रतिनिधी) : पंडित भीमसेन जोशी यांच्या निधनाचे वृत्त आज सकाळी साडेआठच्या सुमारास संपूर्ण देशभरात पसरले. त्यानंतर दिल्लीहून परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा, कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येदीयूरप्पा, मुंबईतून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह राज्यातील दुरदूरच्या शहरांमधून भीमसेनजींच्या चाहत्यांनी पुण्याची वाट धरली....मात्र अवघ्या चार तासांच्या अंतरावर असलेल्या कोल्हापूरातून पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना प्रसंगाचे गंभीर औचित्य लक्षात घेता आले नाही. त्यांना पुणे गाठता आले नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल पवार यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन आज दुपारी कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आले होते. वैयक्तिक सत्काराचा हा कार्यक्रम पुढे ढकलण्याचे प्रसंगावधान पवार दाखवू शकले नाहीत. अवघ्या संगीत विश्वाचे आदरस्थान आणि पुण्याचे नागरिक असलेल्या भीमसेनजींना पुण्याचे पालकमंत्री या नात्याने अखेरची मानवंदना देण्यास पवार अनुपस्थित होते. त्याऐवजी त्यांनी कोल्हापूरातून दुरचित्रवाहिन्यांच्या कॅमेरांसमोर लिखित संदेश 'वाचून' दाखवण्याची तसदी घेतली.
एरवी राज्यातील शासकीय बैठकांना उपस्थित राहण्यासाठीसुद्धा खासगी हेलिकॉप्टरचा वापर करणाऱ्या पवार यांना आज कोल्हापूर-पुणे
प्रवासासाठी हेलिकॉप्टर उपलब्ध झाले नाही. पाणीपुरवठा मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने वैकुंठात पंडितजींना श्रद्धांजली अर्पण केली.

Monday, January 24, 2011

स्वरभास्कर मावळला... भीमसेनजी गेले!

स्वर भास्कर भीमसेन जोशी ह्यांचे आज सकाळी पुण्यात निधन झाले ... ते गेले तरी त्यांचे संगीत मात्र अमर राहणार ........

खालील लेख म टा च्या सौजन्याने





हिंदुस्थानी संगीताच्या स्वरप्रभेने सारे विश्व प्रकाशमान करणारा स्वरभास्कर, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे आज , सोमवारी सकाळी पुण्यात निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते. गेले काही ते आजारी असल्याने , त्यांच्यावर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

काही दिवसांपूर्वीच प्रकृती खालावल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या हृदयाचा वेग आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांचे हिमोडायलिसीसही करण्यात येत होते. अखेर सोमवारी सकाळी ८ वाजून पाच मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पाठी मुलगी शुभदा , चित्रकार जयंत आणि गायक श्रीनिवास ही दोन मुले असा परिवार आहे. दुपारी ३ वाजता वैंकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.

तत्पूर्वी त्यांचे पार्थिव पुण्यातील शास्त्री भवनाजवळील कलाश्री या त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात आले आहे. देशभरातील पंडितजींच्या चाहते पुण्याकडे निघाले असून , कलाश्रीजवळ अंत्यदर्शनासाठी गर्दी उसळली आहे.

गेली सात दशके भारतीय संगीतावर अधिराज्य गाजवणा-या भीमसेनजींना भारतरत्नहा देशातील सर्वोच्च सन्मान देऊन गौरविण्यात आले होते. त्याआधी पद्मश्री , संगीत नाटक अकादमी पुरस्कार , पद्मभूषण , राष्ट्रीय संगीत पुरस्कार , पद्मविभूषण तसेच महाराष्ट्रभूषण आदी पुरस्कारांनी त्यांचा बहुमान करण्यात आला होता.

आपल्या दैवी स्वरांनी रसिकांना मंत्रमुंग्ध करणा-या भीमसेनजींनी शास्त्रीय संगीतासोबत अंभग, भजन , ठुमरी , नाट्यगीत, चित्रपटगीत असे संगातीचे विविध प्रकार हाताळले. महाराष्ट्राच्या संतपरंपरेचे सार असलेल्या अभंगरचना पंडितजींच्या स्वरांनी घरोघरी पोहोचल्या.

एका शिक्षकाच्या घरात जन्माला आलेल्या भीमसेन यांचा संगीताकडे असलेला ओढा त्यांच्या वडिलांनना पसंत नसे. भीमसेनांनी वैद्यकीय अथवा अभियांत्रिकी शिक्षण घ्यावे असा त्यांचा आग्रह होता. या मतभेदांमुळे अखेर भीमसेनांनी घर सोडण्याचे आणि त्याकाळी शास्त्रीय संगीतासाठी ख्यातनाम असलेल्या ग्वाल्हेर , लखनौ , रामपूर या शहरांपैकी एका ठिकाणी जाण्याचे ठरविले. त्याप्रमाणे त्यांनी इ.स. १९३३ साली वयाच्या अकराव्या वर्षी घर सोडले आणि ग्वाल्हेरात दाखल झाले.

त्यानंतर त्यांनी खिशात पैसे आणि पोटात अन्न नसूनदेखील गायनाच्या तळमळीपायी उत्तर भारतात अनेक ठिकाणी भटकंती केली. उस्ताद अब्दुल करीम खाँ , वझेबुवा ,केसरबाई केरकर , उस्ताद बिसमिल्ला खाँ , वगैरेंचे गायन-वादन त्यांनी ऐकले.सुरूवातीला ते इनायत खाँ यांचे शिष्य जनाप्पा कुर्तकोटी यांच्याकडे गायन शिकले. त्यानंतर जलंदर येथे पंडित मंगतराम यांच्याकडे , ग्वाल्हेर येथे राजाभय्या पूंछवाले यांच्याकडे गाण्याची दीक्षा घेतली. रामपूर येथे मुश्ताक हुसेन खाँ यांच्याकडे काही काळ शिकले.

अशाप्रकारे काही वर्षे ग्वाल्हेर , लखनऊ , रामपूर येथे व्यतित केल्यानंतर त्यांचा शोध घेत असलेल्या त्यांच्या वडिलांशी भेट झाली आणि भीमसेन पुन्हा घरी परत आले. भीमसेनांचा संगीतासाठीचा तीव्र ओढा पाहून त्यांच्या वडिलांनी भीमसेनांना जवळच असलेल्या कुंदगोळ गावातील रामभाऊ कुंदगोळकर यांच्याकडे घेऊन गेले आणि रामभाऊंनी भीमसेनांना त्यांचे शिष्यत्व दिले. रामभाऊ जे सवाई गंधर्व म्हणून ख्यातनाम आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.

रामभाऊ हे किराणा घराण्याच्या पद्धतीचे गायक होते. त्याकाळातील परंपरेनुसार भीमसेन गुरूगृही राहून कष्टपूर्वक गायनाचे धडे घेतले. रामभाऊ त्यांच्याकडून तोडी ,पुरिया , मुलतानी वगैरे रागांवर रोज सुमारे आठ तास मेहनत करवून घेत. आणि त्यांच्याकडून भीमसेनांनी इ.स. १९३६ ते इ.स. १९४१ पर्यंतच्या काळात शक्यतेवढे ज्ञान आत्मसात केले. रोज सोळा तासांचा रियाज करण्याचा ते स्वतःचा दंडक पाळीत. त्यानंतर गुरू रामभाऊंच्या आज्ञेनुसार भीमसेनांनी त्यांचा निरोप घेतला आणि पुणे येथे आले.

आजही पंडित भीमसेन जोशी त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ दरवर्षी सवाई गंधर्व संगीत महोत्सव पुणे येथे भरवितात. १९५२ साली सुरू झालेल्या या महोत्सवात आजवर देशभरातल्या अनेक गायकांनी आपली कला पेश केली आहे.

Friday, January 14, 2011

नव्या 'राज'कारणाची मांडणी

खालील लेख म टा च्या सौजन्याने .............


संजीव उन्हाळे


मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर तरुणाईच्या उदंड प्रतिसादात झालेल्या रेकॉर्डबेक सभेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फिल्मीस्टाइलीत 'सत्या'मधील 'मौका सभीं को मिलता है' हा डायलॉग गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या कानी घालून एका नवीन राजकीय मोहिमेची सुरुवात केली आहे. ही सभा घेणे ठाकरे यांची राजकीय गरज होती, पण त्यांनी या सभेद्वारे आगामी राजकारणात मनसेचे पाऊल कसे पडेल, हे स्पष्टपणे सूचित केले. नवीन राजकीय समीकरणात मनसेचा थेट विरोध राट्रवादी काँग्रेसला असणार इतक्या कडवटपणे आमदार हर्षवर्धन जाधव यांना झालेल्या मारहाणीचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.

औरंगाबाद शहरातूनच नवीन राजकारणाची सुरुवात होते हा आजवरचा इतिहास आहे. १९८४मध्ये शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेसचे विलिनीकरण औरंगाबादला झाले आणि पवारांच्या सर्व राजकारणाला बळ देण्याचे काम या विभागाने केले. १९८८मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पहिली सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर झाली आणि त्यानंतर मुंबई शहरापुरती मर्यादित असलेली शिवसेना महाराष्ट्रभर पसरून राज्यात सत्तारुढ झाली.

राज ठाकरे यांच्या सभेमध्ये तरुण मोठ्या संख्येने होते. म्हणायला गेले तर ती राज्य पातळीवरची सभा होती. राज यांनी मात्र या सभेचे गांभीर्य मनापासून जपले होते. पांढऱ्या पडद्यावर काळ्या अक्षरात अगदी साधेपणाने 'निषेध सभा' असे लिहिले होते. शहरामध्ये लावण्यात आलेल्या अनेक डिजिटल बॅनर्सवर कोठेही राज ठाकरे यांचा फोटो नव्हता. प्रत्येक ठिकाणी काळे टीशर्ट घालून मनसेचे स्वयंसेवक गदीर्ला आवर घालण्याचा प्रयत्न करीत होते. राजही अगदी साध्या पेहरावात आले. त्यांनी पुण्यापासून कोठेही हारतुरे घेतले नाहीत, व्यासपीठावर सत्कार समारंभ झाले नाहीत आणि हर्षवर्धनच्या मातोश्री तेजस्विनी जाधव यांनी छोटेखानी भाषण केल्यानंतर राज यांनी नेहमीचा कोणताही सोपस्कार न करता भाषणाला सुरुवात केली.

राज ठाकरे यांचे भाषण राजकीय भूमिका स्पष्ट करणारे होते. या भाषणात नेहमीची 'ठाकरी' भाषा नव्हती. काही तरी चिथावणीखोर घोषणाबाजी होईल म्हणून या सभेसाठी आलेल्या अनेकांचा अपेक्षाभंग झाला. पण या निमित्ताने नवीन राजकारणाची मांडणी त्यांनी केल्यामुळे अपेक्षाही वाढल्या. आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पोलिसांवर हात उचलल्याचे आपण समर्थन करणार नाही हे वारंवार स्पष्ट केले. दुसऱ्या बाजूला अनपेक्षितपणे ठाकरे पोलिसांबद्दल अत्यंत कळवळीने बोलले. यामध्ये पोलिसांचा दोष नाही, तर दोष त्या मारवित्या धन्याचा आहे, असे सांगून त्यांनी पोलिसांच्या घराच्या प्रश्नापासून त्यांच्यावर पडणाऱ्या कामाच्या ताणापर्यंत सर्व गोष्टींचा उल्लेख केला. जणू काही पोलीस खाते ही सुद्धा आपली एक मतपेढी आहे, असा त्यांच्या भाषणाचा नूर होता. अगदी शेवटीही पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा, एवढी वाजवी मागणी करून पोलिसांविरोधात प्रतिक्रिया देऊ नका, असे त्यांनी कार्यर्कत्यांना सांगितले.

दादा-आबांवर थेट आरोपखुलताबाद पोलीस ठाण्यात आमदार हर्षवर्धन जाधव यांना पाऊण तास बसवून ठेवण्यात आल्याचा उल्लेख केला. या कालावधीतच आबा आणि दादा यांचे फर्मान सुटले, असे भन्नाट विश्लेषण करून सत्तेतील राष्ट्रवादीच्या नेत्याच्या आदेशाशिवाय अशी मारहाण होऊच शकत नाही, असे सांगितले. अप्रत्यक्षपणे मराठा आमदार सुरक्षित नाही, सरदार असलेल्या एका आमदाराला व्यक्तिगतरित्या मारहाण करण्यात आली हे शल्य त्यांनी लोकांसमोर नेले आणि एखाद्या संशोधकाच्या थाटात शिवनेरी किल्ल्यावर हेलिकॉप्टरवर झालेल्या हल्ल्यापासून अगदी अलीकडच्या दादोजी कोंडदेव पुतळा हटाव प्रकरणापर्यंत संभाजी ब्रिगेडने केलेल्या कारवायांचे दाखले त्यांनी दिले. राष्ट्रवादीनेच या संघटना पोसल्या आहेत असा थेट आरोप त्यांनी केला. आबा आणि अजितदादा यांच्यावर अशा प्रकारचा थेट आरोप करणारी ही पहिलीच सभा आहे. कोण शिक्षक आहे, हे बघून कोणी शिक्षण घेत नाहीत हे साधे तत्त्व मांडताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षक ब्राह्माण होते असा दाखला दिला आणि राज्यामध्ये केवळ जातीपातीचे राजकारण करून दादोजींची नव्हे तर महाराजांची विटंबना आपण करीत आहोत, असे खडे बोल त्यांनी सुनावले. मुख्यमंत्र्यावरील एखाद्या खुसखुशीत विनोदापलीकडे त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले नाही. लोकमनातील राष्ट्रवादी-मनसे हे राजकीय समीकरण ठाकरे यांनी यानिमित्ताने पूर्णपणे पुसून टाकले. पण दुसऱ्या बाजूला काँग्रेसला टीकेचे लक्ष्य बनविले नाही ही गोष्टही राजकीयदृृष्ट्या महत्त्वाची आहे. आतापर्यंतच्या ठाकरे यांच्या भाषणापैकी त्यांचे हे अत्यंत प्रगल्भ भाषण वाटले.

शिवसेनेला हादरा

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये विरोधी पक्ष दुबळा आहे, हे मात्र या निमित्ताने लक्षात आणून दिले. जातीयवादी राजकारण करणारी राष्ट्रवादी आणि दुबळी भाजप-शिवसेना यांची राजकीय पोकळी मनसे भरून काढू शकते, हे दाखवून देण्यासाठी त्यांनी 'मौका सभी कों मिलता हैं' असे सांगून महाराष्ट्राच्या राजकीय अजेंड्यावर मनसेचे स्थान महत्त्वाचे आहे हे दाखवून दिले आहे. आपल्या भाषणामध्ये राज ठाकरे यांनी कोठेही शिवसेनेचा उल्लेख केला नाही. पण त्याच वेळी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या शिवसेनेच्या रेकॉर्डब्रेक सभा झालेल्या ठिकाणी एक रेकॉर्डब्रेक सभा घेऊन शिवसेनेला हादरा दिला आहे. तरुण वर्ग शिवसेनेकडे येत आहे, अशी हाकाटी पिटणाऱ्या शिवसेनेला औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यातील तरुण मोठ्या प्रमाणावर सभेत आणून मनसेने शक्तिप्रदर्शन केले.

अतुल सरपोतदार यांनी या अगोदर संपर्कप्रमुख म्हणून काम केले होते त्या अनुभवाचा फायदा घेऊन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही सभा आयोजित करण्यात आली होती. या अगोदर मुंबई दंगलीनंतर माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी औरंगाबादला येऊनच शरद पवार यांच्या नेतृृत्वावर उघड प्रहार केला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्यपद्घतीवर उघड हल्ला केला. हे साम्य जरी लक्षात घेतले तरी या तरुणाईच्या गदीर्चे मतपेढीमध्ये रुपांतर होईल का हा प्रश्न खरा कळीचा प्रश्न आहे. नेहमीच्या ठाकरी शैलीतील घाणाघाती भाषणापेक्षा प्रगल्भ राजकीय विश्लेषण करणा-या या भाषणामुळे राज ठाकरे यांच्या चाहत्यांचा अपेक्षाभंग तर झाला नाही ना, याचाही शोध घेण्याची गरज आहे.

'मौका सभी को मिलता है!'- राज

रेकॉर्ड ब्रेक सभा झाली .........................................

खालील लेख म टा च्या सौजन्याने .................................







आर. आर. पाटील आणि अजित पवार, जास्त अंगावर येऊ नका... यायचंच असेल तर एकदा हे पोलीस दल बाजूला सोडून समोरासमोर या... होऊन जाऊ द्या काय ते... असं जाहीर आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज औरंगाबादेतल्या रेकॉर्डब्रेक सभेत दिलं.

मौका सभी को मिलता है... आमची वेळ येईल ना तेव्हा ढुंगणं लपवून फिरत बसाल महाराष्ट्रभर... तुम्हाला करता येऊ शकतं ते मलाही करता येतं... माझा पारा चढवू नका, असा कडक आवाज ही राज यांनी आबा-अजितदादांना दिला. मनसे आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांकडून झालेल्या अमानूष मारहाणीचा ठपका त्यांनी सर्वस्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री आर. आर पाटील यांच्यावर ठेवला. या दोघांपैकी कुणा एकाच्या आदेशाशिवाय हे होऊच शकत नाही, असा थेट आरोप राज यांनी केला. राष्ट्रवादीच्या नेत्यांना सत्तेचा माज आला आहे, संभाजी बी ग्रेड , सी ग्रेड सारख्या संघटना पोसून ते महाराष्ट्राला जातीपातीच्या चिखलात नेत आहेत, अशी सणसणीत चपराकही त्यांनी लगावली.

हर्षवर्धनने पोलिसांवर हात उगारला याचं समर्थन मी करणार नाही, असं सुरुवातीलाच स्पष्ट करून राज यांनी, आधी पोलिसांना चार गोष्टी सुनावल्या आणि नंतर आबा, अजितदादांना फैलावर घेतलं. पोलिसांनी आपला राग व्यक्त करताना कशा लाठ्या मारायच्या याचं भान ठेवणं गरजेचं आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. गुराढोरासारखा मारलाय त्याला...त्याच्या बोटातली सोन्याची अंगठीही तुटली. कुठल्याही आमदाराला कपडे काढून मारायची हिंमत पोलीस स्वतःहून करणार नाहीत. आर. आर. किंवा अजित पवार यांच्या आदेशाशिवाय हे होणार नाही, असा थेट हल्ला त्यांनी चढवला.

हर्षवर्धनला पोलीस स्टेशनला नेलं जातं.. पाऊण तास त्याला तिथे बसवून ठेवतात.. त्यानंतर पोलिसांची फौज येते आणि त्याला बेदम मारते.. हा घटनाक्रम पाहिला तर त्या पाऊण तासात पोलीस वरून येणा-या आदेशाची वाट पाहत होते, हे स्पष्ट आहे, याकडे राज यांनी लक्ष वेधलं. कायदा हातात घेणा-या लोकप्रतिनिधीचे काय होते ते बघा, हे अजितदादांचे विधानही त्याचेच सूचक असल्याचं ते म्हणाले.

खरं कारण वेगळंच !

हर्षवर्धनने पोलिसांच्या ताफ्यात घुसायचा प्रयत्न केला, असं या सगळ्या प्रकरणाचं कारण सांगितलं जातंय. पण ते खरं नाही. तो आमदार आहे, मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो. काय केलं असतं त्यानं ? गुच्छ दिला असता, काहीतरी सूचना केल्या असत्या. तो काय मुख्यमंत्र्यावर हल्ला करणार होता का ? बाकीचे एवढे फुटकळ त्यांच्यामागे फिरत असतात, मग आमदार चालला नसता का ? पण जे झालं ते ठरवून झालं, असं राज यांनी नमूद केलं.

हर्षवर्धनचे वडील काँग्रेसचे आमदार होते, पण हा माझ्याकडे आला त्याचा राग काढला गेला, असं एक कारण राज यांनी सांगितलं. महाराष्ट्रात मनसेचा वेगानं विस्तार होतोय. कल्याण-डोंबिवलीमध्ये आपण यांना मागे टाकलं. हे त्यांना पाहावत नाहीए. मनसे आणि पोलिसांमध्ये संघर्ष लावून देण्याचाच हा प्रयत्न असल्याचंही ते म्हणाले. आपल्या तालुक्यात दारुबंदीची मागणी करण्यासाठी हर्षवर्धन जाधव आर. आर. पाटील यांना भेटायला गेले असताना त्यांना पाटील यांनी अटक करवली होती, याकडेही राज यांनी लक्ष वेधलं.

संभाजी ब्रिगेड बाब्या ...

संभाजी ब्रिगेड ही आर. आर., अजितदादांनी पोसलेली संघटना असल्याचा पुनरुच्चार राज यांनी पुन्हा केला. या संघटनेच्या माध्यमातून, जनतेमध्ये जातीपातींची विषवल्ली पेरून ते राजकारण करत आहेत, असंही त्यांनी सुनावलं. हर्षवर्धन पाटील यांना अमानूष मारहाण करणारे संभाजी ब्रिगेडसारख्या संघटनेवर कुठलीही कारवाई करत नाहीत. शेवटी, आपला तो बाब्या आणि दुस-याचं ते कार्टं, ही टिप्पणीही त्यांनी केली.

शिवनेरी किल्ल्यावर मागे एका कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर उतरलं, तेव्हा संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी त्यावर दगडफेक केली. या हेलिकॉप्टरमध्ये दिलीप वळसे-पाटील होते. त्यांना काही दुखापत झाली असली तर... पण त्यांच्यावर सरकारने कुठलीही कारवाई केली नाही. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या घरावर हल्ला झाला, त्या बदल्यात हल्लेखोर विनायक मेटेंना आमदारकी देण्यात आली. नीलंकठ खाडिलकर यांच्या घरावरही हल्ला होतो, पण कुणावर काहीच कारवाई होत नाही. केसेस टाकल्या जातात, पण कार्यकर्त्यांना लगेच सोडून दिलं जातं, याबद्दल राज यांनी तीव्र संताप व्यक्त केला. भिवंडीत दोन पोलिसांना दगडांनी ठेचून मारलं जातं, तेव्हा सरकार शेपूट घालतं, लेंड्या टाकतं, तिथे कारवाई नाही... शेकडो निष्पापांचे बळी घेणा-या कसाबला भेटायला आबा जातात... त्याला तिथे तुरुंगात पोसायचं आणि दुसरीकडे पोलिसाशी बाचाबाची करणा-या आमदाराला फोडून काढायचं, याला काय म्हणायचं ?, असा सवालही त्यांनी केला.

राष्ट्रवादीला सत्तेचा माज आलाय !

मागे, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार करायला अजित पवार आले होते. त्यावेळी एका शिक्षकाने त्यांना प्रश्न विचारला, तर पोलिसांनी त्याला फोडून काढलं... म्हणजे या राज्यात प्रश्नही विचारायचे नाहीत की काय ? हे कसले कायद्याचे राज्य ?, असा संताप राज यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या लोकांना सत्तेचा माज आलाय, अशी टीकाही त्यांनी केली.

दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरणी फुटकळ नगरसेवक ठराव करतात आणि रातोरात पुतळा हलवला जातो.. तिथे बरं पोलीस संरक्षण मिळतं. मग, असाच बंदोबस्त करून परराज्यातून येणा-यांना हाकलून दाखवा , असं आव्हान राज यांनी दिलं.

इतिहासात दोष असतील, तर ते चळवळीने सोडवा, आंदोलनाने नाही. आत्तापर्यंत आपण शिक्षकाची जात बघून शिकलो का ? डॉ. आंबेडकरांचे शिक्षक ब्राह्मण होते. मग आता हा इतिहासही बदलायचा का ? असा उद्विग्न सवालही राज यांनी केला.

पोलिसांना आवाहन

पोलिसांवर माझा जराही राग नाही, उलट प्रेमच आहे. ते कोणत्या परिस्थितीतून जात असतात याची मला पूर्ण कल्पना आहे. म्हणूनच त्यांच्या घरांचा प्रश्न असो, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा असो, मी प्रत्येक वेळी पुढाकार घेतला आहे. म्हणूनच, राज्य सरकारच्या नादी लागून त्यांनी आमच्यावर काहीही लादू नये, उद्या तुम्ही निलंबित व्हाल, आबा तिथल्या तिथे राहतील, असं कळकळीचं आवाहन राज यांनी केलं. पोलिसांवर कधीही हात उगारू नका, ते संरक्षणासाठी आहेत, बदला घेण्यासाठी नाही, असं त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना निक्षून सांगितलं. मात्र त्याचवेळी, हर्षर्धन जाधव यांना मारहाण करणा-या पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली. मला हा विषय पेटवायचा नव्हता, नाहीतर मी पहिल्याच दिवशी हर्षवर्धनला भेटायला आलो असतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पोलिसांच्या आडून लढू नका !

सरतेशेवटी, आबा आणि अजितदादांना जाहीर आव्हान आणि धमकी द्यायला राज विसरले नाहीत. हिंमत असेल तर पोलीस दल बाजूला सोडून समोरासमोर या, काय व्हायचं ते होऊन जाऊ दे... पोलिसांच्या आडून लढू नका.. कायदा येतो म्हणून सगळ्या गोष्टी आम्ही ऐकायच्या का ?, अशी थप्पडच त्यांनी दोघांना लगावली. बडे बडे शहरोंमे छोटी छोटी बाते होती रहती हैं, असा डायलॉग मारणा-या आबांना राज यांनीसत्या चित्रपटातला एक डायलॉग ऐकवला. तो होता, मौका सभी को मिलता है। ... आज तुमची सत्ता आहे, उद्या आमचीही येईल, तेव्हा ढुंगणं लपवून महाराष्ट्रभर फिरण्याची वेळ येईल, असं त्यांनी बजावलं.

मुख्यमंत्र्यांची खिल्ली
दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे ७० च्या दशकातील व्हिलनप्रमाणे दिसतात, असा टोमणा त्यांनी मारला. तो भला माणूस आहे, वाईट नाहीए, पण त्यांना ओळखतं कोण चेह-याने... त्यांना कशाला हवी सिक्युरिटी. हात जोडून विनंती केली तरी त्यांना कुणी मारणार नाही, असंही राज खोचकपणे म्हणाले.

Friday, January 7, 2011

हर्षवर्धन जाधवांना "फटका" आंदोलनाचा

अवैध धंद्यानां लगाम घालायचं काम केलं म्हणून पोलिसांनी आमदार हर्षवर्धन जाधव ह्यांना मारहाण केली आहे. असल्या मस्तवाल पोलिसांना धडा शिकवलाच पाहिजे ......

वाचा खालील स्टार माझा ची बातमी .....



आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांकडून पूर्व वैमनस्यातून मारहाण झाली असल्याचं सांगण्यात येतंय. कारण हर्षवर्धन जाधव यांनी अवैध धंद्याच्या विरोधात आंदोलन उभारलं होतं. हर्षवर्धन जाधवांनी दैनिकात जाहिरात छापून पोलिसांना हे आव्हान दिलं होतं. या बातम्या विविध दैनिकांमध्ये छापूनही आल्या होत्या. ''अवैध धंद्याच्या विरोधात गृहमंत्र्याचं घर गाठलं'', ''दारू विकतोय पोलीस पाटील'' अशा बातम्या प्रकाशित झाल्या होत्या.

पोलिसांच्या आशीर्वादाने चाललेल्या धंद्यांविरोधात हर्षवर्धन जाधवांनी बोट ठेवल्यानं पोलिसांनी त्यांच्याविरोधात खाकीचा गैरवापर केला असल्याचं म्हटलं जातंय. मारहाण ही पूर्व वैमनस्यातून झाली, या मनसे आमदाराच्या विधानाचा हा पुरावाच आहे. गृह मंत्र्यांनी महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेलेल्या आमदार जाधवांना मारहाण केल्याचा घटनेचा रावसाहेब दानवे यांनी निषेध यांनी केला आहे. शेतकऱ्यांसाठीची आंदोलन हाणून पाडली जात असतील तर सामान्य माणसांनी कुणाकडे जायचं असा सवाल विचारला जातोय.

Wednesday, January 5, 2011

कोकणातील जमीन खरेदीवर राज यांचा इशारा

खालील लेख म टा च्या सौजन्याने



कोकण किनारपट्टीवर परप्रांतीय मोठ्या प्रमाणावर जमिनींची खरेदी करीत असून सीआरझेडच्या धोरणात बदल करायला अमराठी बाबू बसलेलेच आहेत. नव्या धोरणाचा फायदा परप्रांतियांना होणार असून हीच मंडळी 'कोण तुम्ही', असा प्रश्न आपल्याला विचारतील, असे सांगत हे सगळे षड्यंत्र सुरू असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.

मराठी व्यापार मित्र मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सीआरझेडच्या धोरणात बदल करण्याबाबत आता सगळीकडेच बोलले जात आहे. धोरणात बदल करणारे अमराठी बाबू आहेत. परप्रांतीय मोठ्या प्रमाणात कोकण किनारपट्टीवर जमिनींची खरेदी करीत आहेत. एकदा का जमीनखरेदीचे काम संपले की सोयीनुसार सीआरझेडच्या धोरणात बदल केले जातील. याचा फायदा तुम्हाला नव्हे तर परप्रांतीयांना होणार आहे. हे एकप्रकारचे षडयंत्रच सुरू आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले. ज्यांच्याकडे कुवत असेल त्यांनी मुंबई-महाराष्ट्रात जमीन खरेदी करून फायदा उचलायला हवा, असा सल्लाही त्यांनी दिला.

भविष्यातील संघर्षाची नांदी

राज ठाकरे यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनीही अलीकडेच सीआरझेडच्या धोरणाविषयी भाष्य केले होते.

सीआरझेडच्या धोरणामुळे अविकसित राहिलेल्या कोळीवाड्यांच्या जमिनी स्थानिकांच्या नावावर केल्यास त्यांच्या निवा-याचा प्रश्न सुटेल, असे शरद पवार म्हणाले होते. तर सीआरझेड कायद्यामुळे पर्यटन विभागाच्या अनेक योजनांमध्ये अडथळे येत असून हेच कायदे जर शिवाजी महाराजांच्या काळात असते तर एकही किल्ला बांधता आला नसता, असे भुजबळ म्हणाले होते. सीआरझेड कायद्याविषयी सर्वच प्रमुख नेते भाष्य करू लागल्याने नजिकच्या काळात या कायद्यावरून गदारोळ माजण्याची चिन्हे दिसत आहेत.

Tuesday, January 4, 2011

राज साहेबांचे नूतन वर्षानिमित्त आवाहन .....


राज साहेबांनी नूतन वर्षापासून वाढदिवसांचे / अभिनंदनाचे होर्डिंग लावण्यास बंदी आणली आहे ... एक स्तुत्य आवाहन ..... नवीन कामाचे अथवा समाजपयोगी होर्डिंग मात्र आपण लाऊ शकता .....

सादर करीत आहे राज साहेबांचे पत्र जसच्या तसं .....




बेशिस्त रिक्षांविरुद्ध मनसेचा एल्गार - कल्याण

खालील लेख म टा च्या सौजन्याने ..........................................



मनमानीपणा करत प्रवाशांना वेठीला धरणाऱ्या मुजोर रिक्षाचालकांविरोधात मनसैनिकांनी सोमवारी संध्याकाळी आंदोलनाचा पवित्रा घेतला. कल्याणमधील रिक्षा प्रवाशांच्या विविध मागण्यांकडे वाहतूक प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एसीपी ऑफिसवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चा काढल्यानंतरही रिक्षाचालकांकडून प्रवाशांना मिळणाऱ्या वर्तणुकीत बदल न झाल्यास आंदोलनाची धार वाढविण्याचा इशारा मनसेचे आमदार प्रकाश भोईर यांनी दिला आहे.

रिक्षाचालकांबाबत कल्याणकरांच्या अनेक तक्रारी सोडविण्यात ट्रॅफिक पोलीस कमालीचे अपयशी ठरले आहेत. त्यामुळे मनसेचे स्थानिक आमदार प्रकाश भोईर यांनी त्याविरोधात सोमवारी संध्याकाळी एसीपी ऑफिसवर मोर्चा काढला. मोहिंदरसिंग काबुलसिंग शाळेपासून मोर्चाला सुरुवात झाली. टॅफिक शाखेचे एसीपी गजानन जुईकर यांना मनसेतफेर् विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. प्रवाशांच्या इच्छित स्थळी वाहतूक करण्याची सक्ती, मीटरसक्ती, दरपत्रक रिक्षा प्रवाशांना दिसेल अशा ठिकाणी लावण्यात यावे, खडकपाडा परिसरात जादा रिक्षा उपलब्ध करून द्याव्यात, कल्याण स्टेशन परिसरात प्रवाशांना रांगेत रिक्षा मिळतील, अशी व्यवस्था उभारा आदी मागण्या प्रकाश भोईर यांनी केल्या. मोर्चात जिल्हाध्यक्ष काका मांडले, सरचिटणीस इरफान शेख आदी सहभागी झाले होते.

एसीपी म्हणतात, कारवाई सुरूच!

टॅफिक पोलीस रिक्षाचालकांवर कारवाई करत नसल्याचा आरोप होत असला तरी एसीपी जुईकर यांनी तो खोडून काढला. मागील वर्षभरात १३ हजारांहून अधिक रिक्षाचालकांवर कारवाई झाली असून त्यांच्याकडून तब्बल १४ लाख रुपयांचा दंड वसूल झाला आहे, अशी आश्चर्यकारक आकडेवारीच त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसमोर ठेवली. तसेच, महापालिकेकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने स्टेशन परिसरात आणखी प्रभावी कारवाई करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. रिक्षाचालकांनी नियमभंग केल्यास प्रवाशांनी त्याविरोधात लेखी तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. विशेष म्हणजे स्टेशन परिसरात सोमवारपासून १ अधिकारी व ६ कर्मचारी सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत दोन शिफ्टमध्ये नेमण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.