Friday, January 14, 2011

'मौका सभी को मिलता है!'- राज

रेकॉर्ड ब्रेक सभा झाली .........................................

खालील लेख म टा च्या सौजन्याने .................................आर. आर. पाटील आणि अजित पवार, जास्त अंगावर येऊ नका... यायचंच असेल तर एकदा हे पोलीस दल बाजूला सोडून समोरासमोर या... होऊन जाऊ द्या काय ते... असं जाहीर आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज औरंगाबादेतल्या रेकॉर्डब्रेक सभेत दिलं.

मौका सभी को मिलता है... आमची वेळ येईल ना तेव्हा ढुंगणं लपवून फिरत बसाल महाराष्ट्रभर... तुम्हाला करता येऊ शकतं ते मलाही करता येतं... माझा पारा चढवू नका, असा कडक आवाज ही राज यांनी आबा-अजितदादांना दिला. मनसे आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांकडून झालेल्या अमानूष मारहाणीचा ठपका त्यांनी सर्वस्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री आर. आर पाटील यांच्यावर ठेवला. या दोघांपैकी कुणा एकाच्या आदेशाशिवाय हे होऊच शकत नाही, असा थेट आरोप राज यांनी केला. राष्ट्रवादीच्या नेत्यांना सत्तेचा माज आला आहे, संभाजी बी ग्रेड , सी ग्रेड सारख्या संघटना पोसून ते महाराष्ट्राला जातीपातीच्या चिखलात नेत आहेत, अशी सणसणीत चपराकही त्यांनी लगावली.

हर्षवर्धनने पोलिसांवर हात उगारला याचं समर्थन मी करणार नाही, असं सुरुवातीलाच स्पष्ट करून राज यांनी, आधी पोलिसांना चार गोष्टी सुनावल्या आणि नंतर आबा, अजितदादांना फैलावर घेतलं. पोलिसांनी आपला राग व्यक्त करताना कशा लाठ्या मारायच्या याचं भान ठेवणं गरजेचं आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. गुराढोरासारखा मारलाय त्याला...त्याच्या बोटातली सोन्याची अंगठीही तुटली. कुठल्याही आमदाराला कपडे काढून मारायची हिंमत पोलीस स्वतःहून करणार नाहीत. आर. आर. किंवा अजित पवार यांच्या आदेशाशिवाय हे होणार नाही, असा थेट हल्ला त्यांनी चढवला.

हर्षवर्धनला पोलीस स्टेशनला नेलं जातं.. पाऊण तास त्याला तिथे बसवून ठेवतात.. त्यानंतर पोलिसांची फौज येते आणि त्याला बेदम मारते.. हा घटनाक्रम पाहिला तर त्या पाऊण तासात पोलीस वरून येणा-या आदेशाची वाट पाहत होते, हे स्पष्ट आहे, याकडे राज यांनी लक्ष वेधलं. कायदा हातात घेणा-या लोकप्रतिनिधीचे काय होते ते बघा, हे अजितदादांचे विधानही त्याचेच सूचक असल्याचं ते म्हणाले.

खरं कारण वेगळंच !

हर्षवर्धनने पोलिसांच्या ताफ्यात घुसायचा प्रयत्न केला, असं या सगळ्या प्रकरणाचं कारण सांगितलं जातंय. पण ते खरं नाही. तो आमदार आहे, मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो. काय केलं असतं त्यानं ? गुच्छ दिला असता, काहीतरी सूचना केल्या असत्या. तो काय मुख्यमंत्र्यावर हल्ला करणार होता का ? बाकीचे एवढे फुटकळ त्यांच्यामागे फिरत असतात, मग आमदार चालला नसता का ? पण जे झालं ते ठरवून झालं, असं राज यांनी नमूद केलं.

हर्षवर्धनचे वडील काँग्रेसचे आमदार होते, पण हा माझ्याकडे आला त्याचा राग काढला गेला, असं एक कारण राज यांनी सांगितलं. महाराष्ट्रात मनसेचा वेगानं विस्तार होतोय. कल्याण-डोंबिवलीमध्ये आपण यांना मागे टाकलं. हे त्यांना पाहावत नाहीए. मनसे आणि पोलिसांमध्ये संघर्ष लावून देण्याचाच हा प्रयत्न असल्याचंही ते म्हणाले. आपल्या तालुक्यात दारुबंदीची मागणी करण्यासाठी हर्षवर्धन जाधव आर. आर. पाटील यांना भेटायला गेले असताना त्यांना पाटील यांनी अटक करवली होती, याकडेही राज यांनी लक्ष वेधलं.

संभाजी ब्रिगेड बाब्या ...

संभाजी ब्रिगेड ही आर. आर., अजितदादांनी पोसलेली संघटना असल्याचा पुनरुच्चार राज यांनी पुन्हा केला. या संघटनेच्या माध्यमातून, जनतेमध्ये जातीपातींची विषवल्ली पेरून ते राजकारण करत आहेत, असंही त्यांनी सुनावलं. हर्षवर्धन पाटील यांना अमानूष मारहाण करणारे संभाजी ब्रिगेडसारख्या संघटनेवर कुठलीही कारवाई करत नाहीत. शेवटी, आपला तो बाब्या आणि दुस-याचं ते कार्टं, ही टिप्पणीही त्यांनी केली.

शिवनेरी किल्ल्यावर मागे एका कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर उतरलं, तेव्हा संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी त्यावर दगडफेक केली. या हेलिकॉप्टरमध्ये दिलीप वळसे-पाटील होते. त्यांना काही दुखापत झाली असली तर... पण त्यांच्यावर सरकारने कुठलीही कारवाई केली नाही. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या घरावर हल्ला झाला, त्या बदल्यात हल्लेखोर विनायक मेटेंना आमदारकी देण्यात आली. नीलंकठ खाडिलकर यांच्या घरावरही हल्ला होतो, पण कुणावर काहीच कारवाई होत नाही. केसेस टाकल्या जातात, पण कार्यकर्त्यांना लगेच सोडून दिलं जातं, याबद्दल राज यांनी तीव्र संताप व्यक्त केला. भिवंडीत दोन पोलिसांना दगडांनी ठेचून मारलं जातं, तेव्हा सरकार शेपूट घालतं, लेंड्या टाकतं, तिथे कारवाई नाही... शेकडो निष्पापांचे बळी घेणा-या कसाबला भेटायला आबा जातात... त्याला तिथे तुरुंगात पोसायचं आणि दुसरीकडे पोलिसाशी बाचाबाची करणा-या आमदाराला फोडून काढायचं, याला काय म्हणायचं ?, असा सवालही त्यांनी केला.

राष्ट्रवादीला सत्तेचा माज आलाय !

मागे, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार करायला अजित पवार आले होते. त्यावेळी एका शिक्षकाने त्यांना प्रश्न विचारला, तर पोलिसांनी त्याला फोडून काढलं... म्हणजे या राज्यात प्रश्नही विचारायचे नाहीत की काय ? हे कसले कायद्याचे राज्य ?, असा संताप राज यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या लोकांना सत्तेचा माज आलाय, अशी टीकाही त्यांनी केली.

दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरणी फुटकळ नगरसेवक ठराव करतात आणि रातोरात पुतळा हलवला जातो.. तिथे बरं पोलीस संरक्षण मिळतं. मग, असाच बंदोबस्त करून परराज्यातून येणा-यांना हाकलून दाखवा , असं आव्हान राज यांनी दिलं.

इतिहासात दोष असतील, तर ते चळवळीने सोडवा, आंदोलनाने नाही. आत्तापर्यंत आपण शिक्षकाची जात बघून शिकलो का ? डॉ. आंबेडकरांचे शिक्षक ब्राह्मण होते. मग आता हा इतिहासही बदलायचा का ? असा उद्विग्न सवालही राज यांनी केला.

पोलिसांना आवाहन

पोलिसांवर माझा जराही राग नाही, उलट प्रेमच आहे. ते कोणत्या परिस्थितीतून जात असतात याची मला पूर्ण कल्पना आहे. म्हणूनच त्यांच्या घरांचा प्रश्न असो, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा असो, मी प्रत्येक वेळी पुढाकार घेतला आहे. म्हणूनच, राज्य सरकारच्या नादी लागून त्यांनी आमच्यावर काहीही लादू नये, उद्या तुम्ही निलंबित व्हाल, आबा तिथल्या तिथे राहतील, असं कळकळीचं आवाहन राज यांनी केलं. पोलिसांवर कधीही हात उगारू नका, ते संरक्षणासाठी आहेत, बदला घेण्यासाठी नाही, असं त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना निक्षून सांगितलं. मात्र त्याचवेळी, हर्षर्धन जाधव यांना मारहाण करणा-या पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली. मला हा विषय पेटवायचा नव्हता, नाहीतर मी पहिल्याच दिवशी हर्षवर्धनला भेटायला आलो असतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पोलिसांच्या आडून लढू नका !

सरतेशेवटी, आबा आणि अजितदादांना जाहीर आव्हान आणि धमकी द्यायला राज विसरले नाहीत. हिंमत असेल तर पोलीस दल बाजूला सोडून समोरासमोर या, काय व्हायचं ते होऊन जाऊ दे... पोलिसांच्या आडून लढू नका.. कायदा येतो म्हणून सगळ्या गोष्टी आम्ही ऐकायच्या का ?, अशी थप्पडच त्यांनी दोघांना लगावली. बडे बडे शहरोंमे छोटी छोटी बाते होती रहती हैं, असा डायलॉग मारणा-या आबांना राज यांनीसत्या चित्रपटातला एक डायलॉग ऐकवला. तो होता, मौका सभी को मिलता है। ... आज तुमची सत्ता आहे, उद्या आमचीही येईल, तेव्हा ढुंगणं लपवून महाराष्ट्रभर फिरण्याची वेळ येईल, असं त्यांनी बजावलं.

मुख्यमंत्र्यांची खिल्ली
दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे ७० च्या दशकातील व्हिलनप्रमाणे दिसतात, असा टोमणा त्यांनी मारला. तो भला माणूस आहे, वाईट नाहीए, पण त्यांना ओळखतं कोण चेह-याने... त्यांना कशाला हवी सिक्युरिटी. हात जोडून विनंती केली तरी त्यांना कुणी मारणार नाही, असंही राज खोचकपणे म्हणाले.

No comments:

Post a Comment