Monday, January 24, 2011

स्वरभास्कर मावळला... भीमसेनजी गेले!

स्वर भास्कर भीमसेन जोशी ह्यांचे आज सकाळी पुण्यात निधन झाले ... ते गेले तरी त्यांचे संगीत मात्र अमर राहणार ........

खालील लेख म टा च्या सौजन्याने





हिंदुस्थानी संगीताच्या स्वरप्रभेने सारे विश्व प्रकाशमान करणारा स्वरभास्कर, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे आज , सोमवारी सकाळी पुण्यात निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते. गेले काही ते आजारी असल्याने , त्यांच्यावर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

काही दिवसांपूर्वीच प्रकृती खालावल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या हृदयाचा वेग आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांचे हिमोडायलिसीसही करण्यात येत होते. अखेर सोमवारी सकाळी ८ वाजून पाच मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पाठी मुलगी शुभदा , चित्रकार जयंत आणि गायक श्रीनिवास ही दोन मुले असा परिवार आहे. दुपारी ३ वाजता वैंकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.

तत्पूर्वी त्यांचे पार्थिव पुण्यातील शास्त्री भवनाजवळील कलाश्री या त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात आले आहे. देशभरातील पंडितजींच्या चाहते पुण्याकडे निघाले असून , कलाश्रीजवळ अंत्यदर्शनासाठी गर्दी उसळली आहे.

गेली सात दशके भारतीय संगीतावर अधिराज्य गाजवणा-या भीमसेनजींना भारतरत्नहा देशातील सर्वोच्च सन्मान देऊन गौरविण्यात आले होते. त्याआधी पद्मश्री , संगीत नाटक अकादमी पुरस्कार , पद्मभूषण , राष्ट्रीय संगीत पुरस्कार , पद्मविभूषण तसेच महाराष्ट्रभूषण आदी पुरस्कारांनी त्यांचा बहुमान करण्यात आला होता.

आपल्या दैवी स्वरांनी रसिकांना मंत्रमुंग्ध करणा-या भीमसेनजींनी शास्त्रीय संगीतासोबत अंभग, भजन , ठुमरी , नाट्यगीत, चित्रपटगीत असे संगातीचे विविध प्रकार हाताळले. महाराष्ट्राच्या संतपरंपरेचे सार असलेल्या अभंगरचना पंडितजींच्या स्वरांनी घरोघरी पोहोचल्या.

एका शिक्षकाच्या घरात जन्माला आलेल्या भीमसेन यांचा संगीताकडे असलेला ओढा त्यांच्या वडिलांनना पसंत नसे. भीमसेनांनी वैद्यकीय अथवा अभियांत्रिकी शिक्षण घ्यावे असा त्यांचा आग्रह होता. या मतभेदांमुळे अखेर भीमसेनांनी घर सोडण्याचे आणि त्याकाळी शास्त्रीय संगीतासाठी ख्यातनाम असलेल्या ग्वाल्हेर , लखनौ , रामपूर या शहरांपैकी एका ठिकाणी जाण्याचे ठरविले. त्याप्रमाणे त्यांनी इ.स. १९३३ साली वयाच्या अकराव्या वर्षी घर सोडले आणि ग्वाल्हेरात दाखल झाले.

त्यानंतर त्यांनी खिशात पैसे आणि पोटात अन्न नसूनदेखील गायनाच्या तळमळीपायी उत्तर भारतात अनेक ठिकाणी भटकंती केली. उस्ताद अब्दुल करीम खाँ , वझेबुवा ,केसरबाई केरकर , उस्ताद बिसमिल्ला खाँ , वगैरेंचे गायन-वादन त्यांनी ऐकले.सुरूवातीला ते इनायत खाँ यांचे शिष्य जनाप्पा कुर्तकोटी यांच्याकडे गायन शिकले. त्यानंतर जलंदर येथे पंडित मंगतराम यांच्याकडे , ग्वाल्हेर येथे राजाभय्या पूंछवाले यांच्याकडे गाण्याची दीक्षा घेतली. रामपूर येथे मुश्ताक हुसेन खाँ यांच्याकडे काही काळ शिकले.

अशाप्रकारे काही वर्षे ग्वाल्हेर , लखनऊ , रामपूर येथे व्यतित केल्यानंतर त्यांचा शोध घेत असलेल्या त्यांच्या वडिलांशी भेट झाली आणि भीमसेन पुन्हा घरी परत आले. भीमसेनांचा संगीतासाठीचा तीव्र ओढा पाहून त्यांच्या वडिलांनी भीमसेनांना जवळच असलेल्या कुंदगोळ गावातील रामभाऊ कुंदगोळकर यांच्याकडे घेऊन गेले आणि रामभाऊंनी भीमसेनांना त्यांचे शिष्यत्व दिले. रामभाऊ जे सवाई गंधर्व म्हणून ख्यातनाम आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.

रामभाऊ हे किराणा घराण्याच्या पद्धतीचे गायक होते. त्याकाळातील परंपरेनुसार भीमसेन गुरूगृही राहून कष्टपूर्वक गायनाचे धडे घेतले. रामभाऊ त्यांच्याकडून तोडी ,पुरिया , मुलतानी वगैरे रागांवर रोज सुमारे आठ तास मेहनत करवून घेत. आणि त्यांच्याकडून भीमसेनांनी इ.स. १९३६ ते इ.स. १९४१ पर्यंतच्या काळात शक्यतेवढे ज्ञान आत्मसात केले. रोज सोळा तासांचा रियाज करण्याचा ते स्वतःचा दंडक पाळीत. त्यानंतर गुरू रामभाऊंच्या आज्ञेनुसार भीमसेनांनी त्यांचा निरोप घेतला आणि पुणे येथे आले.

आजही पंडित भीमसेन जोशी त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ दरवर्षी सवाई गंधर्व संगीत महोत्सव पुणे येथे भरवितात. १९५२ साली सुरू झालेल्या या महोत्सवात आजवर देशभरातल्या अनेक गायकांनी आपली कला पेश केली आहे.

No comments:

Post a Comment