Tuesday, December 15, 2009

पाणीपट्टी वसुलीतील ४५ लाखांचा अपहार - ठाण्यात समांतर पाणीपुरवठा योजना

मित्रानो, लोकसत्तेत काल खालील लेख वाचला आणि म्हटलं तुमच्या बरोबर शेयर करुया। ठाण्यात म्हणे समान्तर पाणी पुरवठा योजना चालू होती ज्यामधे कही राजकर्न्यांचा समावेश आहे। असल्या राजकीय नेत्यानां कड़क शिक्षा झाली पाहिजे, नाही काय? तुमचे काय मत आहे ?

हा लेख लोकसत्ता ह्या वृत्त पत्रातून घेतला आहे

दिलीप शिंदे , ठाणे, १४ डिसेंबर/प्रतिनिधी
पाणी टंचाई निर्माण झाली असतानाही ठाण्यातील रुपादेवी उत्कर्ष मंडळाने गेली सहा वर्षे चक्क 'समांतर पाणीपुरवठा योजना' राबवून ठाणे महापालिकेच्या नावे पाणी देयकापोटी वसूल केलेल्या सुमारे ४५ लाख रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. या घोटाळ्यातील रक्कमेचा भरणा शिवसेनासंबंधीत असलेल्या मॉ रुपादेवी नागरी सहकारी पतसंस्थेत झाल्यामुळे संबंधीत दोषींवर कारवाई करण्यास पालिका प्रशासन टाळाटाळ करीत आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात पाणी टंचाई असताना ‘निर्मल जल अभियान’ या नावाखाली समांतर पाणीपुरवठा योजना राबवून इंदिरानगरच्या रुपादेवी टेकडीवरील ५०० कुटुंबियांना महिनाला ७.२९ दशलक्ष लिटर पाणी पुरविला जातो. रुपादेवी पाडा येथील जलकुंभाखालील पंपातून हा अनधिकृतरित्या पाणी पुरवठा होतो. महापालिकेच्या मालकीची असलेली कुपनलिका, इलेक्ट्रिक पंप व पंपाची टाकी, सिन्टेक्सची टाकी यांचा वापर करून रुपादेवी उत्कर्ष मंडळ समांतर पाणीपुरवठा योजना राबविली आहे. प्रत्येक झोपडीधारकाला नळजोडणी देताना त्यांच्याकडून अनामत रक्कमेपोटी प्रत्येकी दीड हजार रुपये वसूल केले आहे. अशा एकूण ५०० नळजोडण्या करण्यात आलेल्या आहेत. हे पाणी मात्र पालिकेने टाकलेल्या जलवाहिनीतून देण्यात आलेले आहे. मुबलक पाणी मिळत असल्याने दरमहा ५० रुपयांची पाणीपट्टी त्यांच्याकडून वसूल करण्यात आलेली आहे. ही सर्व वसुली मॉ रुपादेवी नागरी सहकारी पतसंस्थेतून होत असून त्याची रितसर पावती देखील ग्राहकांना देण्यात आलेल्या आहेत. त्या पावत्यांवर बिल क्रमांक, ग्राहक क्रमांक टाकण्यात आल्याने नागरिकांना या फसवणुकीची भणकदेखील लागली नाही. अशी ही समांतर पाणी पुरवठा योजना २००४ पासून कार्यान्वित असून महापालिकेच्या नावाखाली या मंडळाने आतापर्यंत ४५ लाख रुपये वसूल केलेले आहे.
दुदैवाने मंडळाच्या एका नोटिसीनंतर हा घोटाळा उजेडात आला. मंडळाची ‘कुपनलिका पाणीपुरवठा योजना’ ही ठाणे महापालिकेला हस्तांतरित करण्यासंबंधी रुपादेवी उत्कर्ष मंडळाने ग्राहकांना नोटीस बजावली आणि नळजोडण्या अधिकृत करण्यासंबंधी दोन हजार रुपयांची मागणी केली. प्रथम दीड हजार रुपये मोजल्यानंतर पुन्हा दोन हजार रुपये कशासाठी याबाबत ग्राहकांनी चौकशी सुरू केल्यानंतर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विश्र्वास भसे यांनी केलेल्या चौकशीत समांतर पाणीपुरवठा योजनेचा घोटाळ्याची तीव्रता लक्षात आली. पाणी, वीजपुरवठा, जलवाहिनी आदी सर्व महापालिकेचे असताना रुपादेवी मंडळाने अनधिकृतरीत्या नळजोडण्या देऊन त्यांच्याकडून वसूल केलेली ४५ लाख रुपयांची पाणीपट्टी गिळंकृत केल्याचे स्पष्ट झाले आहे. या आर्थिक गुन्ह्याबाबत प्रशासनाकडून तात्काळ पोलीस तक्रार होणे अपेक्षित असताना पालिकेने वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारले आहे. वास्तविक या प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून करण्याची सूचना भिसे यांनी आयुक्तांना सादर केलेल्या अहवालात केलेली आहे. मात्र हा घोटाळा करणारे मंडळ शिवसेना नगरसेविकेशी संबंधिगत असून तिचे पती हे सेनेचे पदाधिकारी होते. त्यामुळे कारवाई झाल्यास नगरसेविकादेखील अडचणीत येण्याची शक्यता असल्याने कारवाई होत नसल्याची चर्चा रुपादेवी पाडय़ातील फसवणूक झालेल्या ग्राहकांमध्ये सुरू आहे.

No comments:

Post a Comment