Thursday, December 3, 2009

लढाई जिंकली; युद्धाचं काय?

मित्रानो, महाराष्ट्र टाइम्स मधे प्रकाश अकोलकारांचा एक चांगला लेख आला आहे वाचून कसा वाटला ते सांगा ?

मुंबई महापालिकेत बहुमत असताना महापौर पदावर जर शिवसेनेची नगरसेविका निवडून आली तर त्यात एवढं आनंदित व्हायला काय झालं? कळत नाही ? तुमचं काय मत आहे?


3 Dec 2009, 0425 hrs IST

म. टा.

प्रकाश अकोलकर

महापौरपदाची लढाई शिवसेने जिंकली खरी; पण पुढचे युद्ध हे अधिक घमासान असणार। त्यामुळेच गेले काही दिवस पॅव्हेलियनमध्ये असलेल्या बाळासाहेबांनी पुन्हा पॅड्स बांधून मैदानात उतरायचं ठरवलं असेल का?

मुंबई महानगरीचे महापौरपद हासील करून शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतरची एक प्रतिष्ठेची लढत जिंकली आहे। महापौरपदी शिवसेनेच्या श्रद्धा जाधव निवडून येत असल्याची चिन्हे दिसू लागताच, बोरीबंदर येथील महापालिका मुख्यालयाच्या परिसरात शिवसैनिकांनी जो काही जल्लोष सुरू केला, त्यास तोड नव्हती! त्याचे कारणही स्वाभाविक होते. दोनच महिन्यांपूवीर् पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारमोहिमेत 'आता सत्ता आलीच!' असे वातावरण शिवसेनेने उभे केले होते. शिवसेना हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून येईल आणि युतीची सत्ता येईल, असा अर्थ त्यात अनुस्युत होता. मतमोजणीच्या पूर्वसंध्येला तर म्हणे शिवसेनेत मंत्रिमंडळाची यादी करण्याचे काम सुरू होते. आत्मविश्वास इतक्या टोकाला गेला होता. प्रत्यक्षात शिवसेनेच्या पदरी फार मोठा पराभव आला. शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली गेली आणि आमदारही जेमतेम ४४ निवडून आले होतेे.

त्यापाठोपाठ मुंबईचे महापौरपदही हातातून गेले असते, तर संघटनेची पारच रया गेली असती। खांब आधीच कलथून गेला होता आणि अभेद्य, अभेद्य म्हणून डंका वाजवलेली भिंतही खचत चालली होती। त्या पार्श्वभूमीवर महापौरपदाची निवडणूक भलतीच प्रतिष्ठेची करण्यात आली होती. शिवाय, खचलेलं मन इतकं संशयग्रस्त झालं होतं की खरं म्हणजे विजय फारसा दुर्लभ नसतानाही नगरसेवकांना डांबून ठेवण्यापर्यंत मजल गेली होती. आपल्याच संघटनेतील कोणता नगरसेवक ऐनवेळी काय करेल, या भीतीपोटी पोटात गोळा आला होता. पण मुळात हात वर करून नव्हे तर चक्क हातात माईक घेऊन नाव सांगण्याची पद्धत मतदानाच्या वेळी अंमलात आली, तेव्हाच निकाल स्पष्ट झाला होता. शिवाय, समाजवादी पाटीर् आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही शिवसेनेला काँगेसला इतक्या उघडपणे मतदान करू शकणार नव्हतीच. तरीही आपल्याच कार्यर्कत्यांवर विश्वास उडून गेल्यामुळे कमालीची खबरदारी घेण्यात आली होती. त्याचे फळ पदरात पडलेही; पण त्यामुळेच आताही विश्वास ठेवावा की ठेवू नये असे वाटत असलेल्या कार्यर्कत्यांना सोबत घेऊन मोठे युद्ध लढायचे आहे. त्यात काय होणार, हा खरा प्रश्ान् आहे.

हे युद्ध आणखी अडीच वर्षांनी रंगणार आहे आणि त्याचे कुरुक्षेत्रही मुंबई हेच आहे। शिवसेनेसाठी राज्याच्या सत्तेपेक्षाही महत्त्वाची आणि अर्थपूर्ण असलेली मुंबई महापालिका हे या युद्धातील प्रमुख लक्ष्य असणार आहे. मुंबई महापालिकेची सत्ता गेली की शिवसेना कशी सैरभैर होऊन जाते, हे गेल्या चार दशकांत अनेकदा बघायला मिळालं आहे. १९७८च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा पुरा खातमा झाला, तेव्हा तर दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरे यांनीच भर शिवाजी पार्कवर आपल्या पदाचा राजीनामा कसा देऊ केला, ते जुने निष्ठावंत अजूनही सांगतात. त्यामुळेच शिवसेनेचं आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचंही राजकीय अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल, तर त्यासाठी मुंबई महापालिका नावाची सोन्याची कोंबडी हातातून जाता कामा नये, हे स्वत: बाळासाहेबही जाणून आहेत. दर पंधरा दिवसांनी शिवसेनाभवनात येऊन शिवसैनिकांशी संवाद साधण्याचा निर्णय त्यांनी त्यामुळेच तर घेतला नसेल ना?

पण ही लढाई सोपी नाही। लोकसभा निवडणुकीत मुंबईतली एकही जागा शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या युतीच्या हातात जाऊ नये, यासाठी 'मनसे'ने आखलेल्या राजकीय डावपेचांना १०० टक्के यश लाभलं आणि पाठोपाठच्या चार महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईवर 'मनसे'चं अधिराज्य स्थापन झाल्याचं बघायला मिळालं. शिवसेनेपेक्षा 'मनसे'चे दोन का होईना अधिक आमदार निवडून आलेच; शिवाय सेनाभवनपासून टिळक ब्रिजमागेर् परळ, लालबाग, भायखळा, गिरगाव, वरळी, प्रभादेवी आणि परत सेनाभवन या हमखास हुकमी पट्ट्यात सेनेचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही. शिवाय, 'मनसे'ला मुंबईत मतंही घसघशीत म्हणजे २३ टक्के मिळाली, तर शिवसेनेला मतदान झालं १८ टक्के. पण त्याहीपेक्षा आणखी एक तपशील हा सेनेच्या पोटात खरोखरच गोळा आणणारा आहे. मुंबईतील महापालिकेच्या थोड्याथोडक्या नव्हे तर ६८ मतदारसंघांत 'मनसे'नं आघाडी घेतली आहे.

खरं तर चित्र स्पष्ट आहे. महापौरपद कायम राखण्यात सेनेनं यश मिळवलं, तोच मुहूर्त साधून 'मनसे' अधिक आक्रमक झालीय. शिवाय, आपलं लक्ष्य आता शिवसेनेचे 'शेंबडे' आमदार असतील, हेही स्वत: राज यांनी आपल्या भाषणातून सांगून टाकलंय! आपला हाच बाणा 'मनसे'नं कायम राखला, तर पुढच्या दोन वर्षांनंतर 'मुंबई कोणाची?' हा प्रश्ान् खरं तर विचारायलाही लागू नये. महापौरपदाची एक लढाई जिंकली असली, तरी पुढचं युद्ध किती घमासान असणार आहे, त्याची चुणूक दाखवायला एवढा तपशील पुरेसा आहे. त्यामुळेच बाळासाहेबांनी वयाची ऐंशी ओलांडल्यावरही सेकंड इनिंग्जमधील फलंदाजीसाठी पुन्हा पॅड्स बांधले आहेत, हे सांगायचीही गरज नाही. मुळात राज यांच्या अतिआक्रमक बाण्याला आणि मुख्य म्हणजे त्यांच्या करिष्म्याला उद्धव तोंड देण्यास कमी पडत आहेत, हे लक्षात केव्हाच येऊन चुकलं होतं. त्यामुळेच विधानसभेच्या लढाईतच बाळासाहेब टीव्हीवरनं जास्तीतजास्त प्रमाणात बघायला मिळतील, यासाठी प्रयत्नांची शिकस्त करण्यात आली होती. बाळासाहेबांनीही होता होईल, तेवढी फटकेबाजी केलीच. पण त्यानं काम भागलं नाही. म्हणून आता बाळासाहेबांनीच टीव्हीवरून कॉमंेट्री करण्याऐवजी प्रत्यक्षात पॅड्स बांधून मैदानात उतरायचं ठरवलेलं दिसतंय. आता मधली काही वर्षं पॅड्स उतरवून पॅव्हेलियनमध्ये बसलेले बाळासाहेब या युद्धात काही अनोखे रंग कसे भरतात, ते बघायचं!

No comments:

Post a Comment