Monday, August 16, 2010

दोन फुल एक हाफ

खालील लेख हा लोकसत्ता च्या लोकरंग ह्या पुरवणीतून घेतला आहे ......

विनोद



दोन फुल

‘तवंग कुठे आहे?’
‘साहेब, तो बघा तवंग. दिसला का?’
‘नाही दिसला बुवा. तुम्ही कुठे पाहता आहात तेच कळत नाही मला!’
‘डावीकडे बघा साहेब, मग जरासं उजवीकडे. हं, आता दिसला? तो जो काळपट रंगाचा पट्टा दिसतो ना, तोच तवंग आहे. दिसला?’
‘थांबा, थांबा. जरा नीट बघू द्या. हे हेलिकॉप्टर फार हलतं बुवा, त्यामुळं त्रास होतो. कुठं म्हणता? डावीकडे? अच्छा. थांबा थांबा, दिसला मला तवंग. अरे बापरे! केवढा मोठा काळा पट्टा आहे तवंगाचा! आणि त्या तवंगाच्या अगदी बाजूलाच ताजमहाल हॉटेल आहे. ते तेल हॉटेलमध्येही जाऊ शकतं..!’
‘ताजमहालच्या बाजूला? साहेब, तुम्ही नेमकं काय बघता आहात? अहो साहेब, जो काळपट पट्टा तुम्ही पाहिला ना, तो तवंग नव्हे, रस्ता आहे तो. इकडे या बाजूला बघा.’
‘अच्छा- रस्ता होता का तो? मला वाटलं, तवंग आहे. कधी पाहिला नाही ना यापूर्वी; त्यामुळं माहिती नाही नेमका कसा दिसतो ते.’
‘काही काळजी करू नका साहेब, मी दाखवतो तुम्हाला तवंग. तुम्हाला ते एका बाजूला कलंडलेलं जहाज दिसलं का?’
‘जहाज..? हो, दिसलं आत्ता. ते कलंडलेलं असूनही केवढय़ा वेगानं जात आहे.. कमाल आहे!’
‘वेगानं जात आहे? मला काही कळतच नाही साहेब, तुम्ही कुठलं जहाज बघता आहात? मी म्हणतो ते जहाज एकाच जागी थांबलेलं आहे कलंडून!’
‘मग एकाच जागी थांबलेलं जहाज मला कशाला दाखवता?’
‘साहेब, आपण तवंग बघायला आलो आहोत ना?’
‘म्हणून तर म्हणतोय- तवंग दाखवा, जहाज कशाला दाखवता? एक तर या पंख्याचा आवाज एवढा आहे की काही नीट ऐकायला येत नाही. एवढय़ा उत्साहानं आलो तवंग बघायला- आणि तवंगच दिसत नाही.’
‘साहेब, असे निराश नका होऊ. दिसेल तवंग. आधी मला सांगा- कलंडलेलं जहाज दिसलं का?’
‘अहो, तुम्ही मला सारखं सारखं जहाज पाहायला का सांगता? आधी मला तवंग दाखवा, मग मी ते कलंडलेलं जहाज पाहीन.’
‘सॉरी, सीएम साहेब. मला वाटत होतं की, जहाज दिसलं की तवंग पाहणं सोपं जाईल. बट इट्स ओके. आपण आधी तवंग पाहू, नंतर जहाज पाहू कलंडलेलं.’
‘ठीक आहे. सांगा- कुठं पाहू? डावीकडे की उजवीकडे?’
‘उजवीकडे पाहा साहेब.’
‘पण तुम्ही मघाशी डावीकडे म्हणाला होता ना? तुम्हाला तरी नक्की दिसला आहे ना तवंग? की उगाचच आपलं डावीकडे, उजवीकडे बघायला सांगता आहात?’
‘सर, आपलं हेलिकॉप्टर मूिव्हग आहे, त्यामुळं आपली पोझिशन चेंज होते सारखी, त्यामुळं तवंगाची पोझिशनही चेंज होते.’
‘बरं ठीक आहे. उजवीकडे बघतो.’
‘नो सर, आता अगेन डावीकडे सर. सॉरी सर!’
’ ’

‘साहेब, फोन आहे.’
‘अरे, नको फोन देऊ आत्ताच. मला नीट तवंग तरी बघू दे! कोण आहे फोनवर?’
‘मॅडम आहेत साहेब?’
‘मॅडम? त्या आल्या भारतात परत? दे बाबा, फोन दे. तवंग नंतर पाहता येईल. तो कुठं जातो?’
‘त्या मॅडम नाही साहेब, घरच्या मॅडम आहेत.’
‘बरं, तरी दे. घरच्या आहेत म्हणून काय झालं, मॅडमच आहेत ना? हॅलो.. बोल गं. अगं, हेलिकॉप्टरमध्ये आहे मी. तवंग बघायला आलो आहे.’
‘..’
‘तवंग, तवंग.. अगं, तू बातम्या बघत नाहीस का..? तर तो जो तवंग आहे ना पसरलेला समुद्रावर, तो बघायला आलोय.’
‘..’
‘जहाज? कलंडलेलं? तुलापण जहाज माहिती आहे का कलंडलेलं? बरं बरं, बघतो. हो. जेवायला बंगल्यावरच आहे आज. बरं, चल बाय. मी आता तवंग बघतो.’
‘तर. साहेब, आता आपण जरा कमी उंचीवर आलो आहोत. तो बघा- तिकडे डावीकडे.. समुद्राच्या पाण्यावर जी मोठी काळपट लेअर आली आहे ती..’
‘ती लेअर जाऊ दे, मला आधी ते कलंडलेलं जहाज दाखव. बायको म्हणत होती आत्ता की ते सॉलिड कलंडलं आहे म्हणून!’
‘सर, मी तुम्हाला तेच म्हणत होतो. तुमच्या साईटला एकदा ते कलंडलेलं जहाज लोकेट झालं ना, की मग तवंग चटकन् दिसेल. नाऊ, सी टू युवर लेफ्ट..’
‘अरे, माझी मान दुखायला लागली आहे, लेफ्ट-राइट पाहून. हा तवंग आहे कुठं? एक तर इथून सगळी जहाजं मला सारखीच दिसताहेत. त्यात कलंडलेलं जहाज कसं शोधायचं आता? मला सांगा- ते कुठल्या बाजूला कलंडलेलं आहे?
‘सर, आत्ता ते डाव्या बाजूला कलंडलेलं आहे. पण बाय द टाइम तुम्ही ते बघाल, तेव्हा मे बी ते उजवीकडे कलंडलेलं असेल.’
‘म्हणजे ते पाण्यात सारखं डुचमळत आहे का?’
‘नो सर, आपण हवेत डुचमळत आहोत. सॉरी सर. आता जरासं मागं वळून बघावं लागेल.. ऑर वेट फॉर टू मिनिट!’
‘आता हे तवंग- तवंग खूप झालं. तुम्ही सगळ्यांनी पाहिला ना तवंग? तुम्हाला सगळ्यांना दिसला ना तवंग? मग चला, हेलिकॉप्टर घ्या खाली!’
हेलिकॉप्टर खाली आलं- तर खाली उपमुख्यमंत्री उभे. मुख्यमंत्री म्हणाले,‘हे कसे काय माझ्या स्वागतासाठी आले?’ तर तेवढय़ात अधिकारी म्हणाला, ‘त्यांनाही हेलिकॉप्टरमधून तवंग पाहायचा आहे साहेब.’
मुख्यमंत्री उतरले. उपमुख्यमंत्री चढले. जाता जाता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना म्हणाले, ‘कलंडलेलं जहाज दिसतं का बघा आधी.’ उपमुख्यमंत्री म्हणाले, ‘ते मी साहेबांशी बोलतो.’

एक हाफ

मुख्यमंत्री बंगल्यावर येऊन जेवायला बसले. त्यांच्या बायकोनं भाजीच्या पातेल्यावरचं झाकण उघडलं आणि ओरडल्या, ‘सखूबाई, अहो, किती तेल घातलंय भाजीत! तवंग केवढा आलाय बघा तेलाचा!’ आणि मुख्यमंत्र्यांनी तटरक्षक दलाच्या त्या अधिकाऱ्याला फोन लावला.. ‘दिसला बरं का मला तवंग!’ त्यावेळी तो अधिकारी भुजबळांना तवंग दाखविण्याचा कसोशीनं प्रयत्न करत होता. घरी गेल्यावर सीएमना तवंग कसा दिसला, ते मात्र त्याला कळलं नाही!

No comments:

Post a Comment