Wednesday, August 18, 2010

रिक्षा-टॅक्सीचालकांची मुजोरी मोडा!

म टा च्या सौजन्याने


मुंबईतल्या रिक्षा आणि टॅक्सीचालकांची मग्रुरी मोडून काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता मैदानात उतरलेत. मनमानी करत, भाडी नाकारणा-या रिक्षा-टॅक्सीचालकांची तक्रार करण्यासाठी अधिकारी नियुक्त करा आणि त्यांचे संपर्क क्रमांक प्रत्येक स्टँडवर लावा, अशी सूचना त्यांनी आज वाहतूक सहआयुक्तांची भेट घेऊन केली.

मुंबईतल्या अनेक रिक्षा-टॅक्सीवाल्यांकडे लायसन्स नसतं. अशा चालकांचा फोटो, पत्ता आणि मोबाइल नंबर टॅक्सीच्या मागे लावणं बंधनकारक करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

नही चलेगा , असं उत्तर अत्यंत आगाऊपणे देऊन रिक्षा-टॅक्सीवाले भाडं नाकारतात. जवळचं अंतर असेल तर त्यांची मुजोरी संतापजनक असते. त्यांच्या या मनमानीच्या निषेधार्थ मुंबईत नुकतंच मीटर जॅम आंदोलन झालं आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, रिक्षा-टॅक्सीचालकांच्या विरोधातील जनमानसाच्या भावना लक्षात घेऊन या आंदोलनात राज ठाकरे यांनी उडी घेतली. वाहतूक सहआयुक्त विवेक फणसळकर यांना भेटून त्यांनी वेगवेगळ्या सूचना केल्या.

वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून रिक्षा-टॅक्सीचालक बिनधास्तपणे वाहनं चालवत असतात. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होतो, अपघाताचीही भीती असते. अशा चालकांवर जरब बसेल अशी कठोर कारवाई व्हायला हवी, अशी अपेक्षा राज यांनी व्यक्त केली. भाडे नाकारण्याचे प्रकार तर सर्रास होतात. त्याला आळा घालण्यासाठी वाहतूक शाखेनं तक्रार निवारण कक्ष सुरू करावा, तिथला संपर्क क्रमांक सर्व रिक्षा-टॅक्सी स्टँडवर आणि प्रमुख रस्त्यांवर लावावा, तिथे प्रवाशांच्या तक्रारी नोंदवून घेता येतील आणि दोषी चालकांवर कारवाई करता येईल, याकडे राज यांनी लक्ष वेधलं.

येत्या काही दिवसांत या सूचनांवर अमलबजावणी करण्याचं आश्वासन यावेळी फणसळकर यांनी दिलं आहे.

No comments:

Post a Comment