Thursday, August 19, 2010

कायदा मोडणा-यांना मोडतो - राज

म टा च्या सौजन्याने


* मुजोर टॅक्सी-रिक्षाचालकांना राज यांचा इशारा

म. टा. खास प्रतिनिधी

टॅक्सी-रिक्षावाले भाडे नाकारून कायदा मोडतात. आम्ही कायदा मोडत नाही. आम्ही कायदा मोडणा-यांना मोडतो. त्यामुळे रिक्षा टॅक्सीवाल्यांनी शिस्तीत कायदा पाळायला शिका, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी दिला.

मुंबईसह महाराष्ट्रातल्या प्रमुख मोठ्या शहरातील टॅक्सी-रिक्षाचालकांच्या अरेरावीच्या विरोधात मनसचे अध्यक्ष राज ठाकरे व आमदार बाळा नांदगावकर यांनी वाहतूक शाखेचे सहपोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली. मुंबईतील खड्डे, कायदा मोडण्याची प्रवृत्ती, वाहतुकीतील बेशिस्तपणा अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मुंबईत भाडे नाकारण्याचे प्रकार सर्रास घडतात. पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे टॅक्सी-रिक्षा स्टँडवर वाहतूक शाखेच्या संबंधित अधिकाऱ्याचे नाव व मोबाइल क्रमांकांचे फलक लावावेत. त्यामुळ भाडे नाकारले तर प्रवासी थेट संबंधित अधिकाऱ्याला फोन करून तक्रार करतील. फणसकर यांनी ही सूचना मान्य केल्याचे राज म्हणाले.
..................

'टोल'करी खड्ड्यांची जबाबदारीही घ्यावी

भाडे नाकारून टॅक्सी-रिक्षावाले कायदा मोडतात. आम्ही कायदा मोडत नाही कायदा मोडणाऱ्यांना मोडतो. मग आम्ही कायदा मोडतो म्हणून बोलू नका, असे राज म्हणाले. चेंबूर, मानखुर्द, वडाळा येथे मालवाहू ट्रक-ट्रेलर वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करतात. लेनची शिस्त पाळत नाहीत. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. शहरात येताना टोल वसूल करणाऱ्यांनी फक्त टोल वसूल करू नये, तर रस्त्यांवरील खड्ड्यांचीही जबाबदारी घ्यावी. बोगस टॅक्सी-रिक्षांवर कारवाईची मागणी केल्याचे ते म्हणाले.

भीती वाटेल असा दंड हवा

एकाच परमिटवर चार-पाच टॅक्सी व रिक्षा रस्त्यावर धावत आहेत. त्यांच्याकडे पक्के वाहन परवाने नाहीत. त्यांचे परमिट व फोटो टॅक्सी-रिक्षावर लावा. सिग्नलचे नियम पाळले जात नाहीत. कायद्याचा धाक वाहनचालकांना राहिलेला नाही. वाहनचालकांना भीती वाटेल, अशी दंडाची रक्कम व कारवाई करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या शिष्टमंडळात आमदार नितीन सरदेसाई, अतुल सरपोतदार, बंटी म्हशीलकर, मनोज हाटे यांचा समावेश होता.

No comments:

Post a Comment