Monday, August 23, 2010

मनसेनी मोडली रिक्षांची मुजोरी

खालील वृत्त म टा च्या सौजन्याने .....


म. टा. प्रतिनिधी

भाडे नाकारून प्रवाशांना वेठीला धरणाऱ्या रिक्षाचालकांची दंडेली मोडून काढण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर २४ तास उलटत नाहीत तोच ठाण्यात मनसैनिकांनी मुजोर रिक्षाचालकांना धडा शिकवला. मनसैनिकांनी ठाण्यात रस्त्यावर उतरत वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या आंदोलनात भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांना चांगलाच चोप दिला.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मागील आठवड्यात मुंबईत वाहतूक शाखेचे सहआयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेऊन प्रवाशांना नाडणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाईची मागणी केली होती. मुंबईप्रमाणेच ठाण्यातही रिक्षाचालकांची दादागिरी प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेेचे ठाणे उपशहरप्रमुख राजेश मोरे व सरचिटणीस सुरेश कोलते यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी शुक्रवारी संध्याकाळी अचानक रिक्षाचालकांविरोधात आंदोलन पुकारले.

मनसैनिकांनी आंदोलन केले, त्यावेळी स्टेशन परिसरातील रिक्षा स्टॅण्डवर शेकडो प्रवासी रांगेत तिष्ठत असताना काही रिक्षाचालक रिक्षा मध्येच उभी करून भटकत होते. तर काही रिक्षाचालक नेहमीप्रमाणे भाडे नाकारताना आढळून आले. अशा रिक्षाचालकांना मनसैनिकांनी चोप दिला. त्यानंतर गावदेवी, तलावपाळी, जांभळी नाका परिसरातही मनसैनिकांनी आंदोलन केले. यापुढेही रिक्षाचालकांची मुजोरी कायम राहिल्यास अचानक आंदोलन करण्याचा इशारा राजेश मोरे यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment