Monday, July 12, 2010

महाराष्ट्राच्या पाठीत असंख्यवेळा खंजीर

म टा च्या सौजन्याने .......



सीमाप्रश्न असो वा पाणीप्रश्न. राज्यातील खासदार नेहमीच महाराष्ट्राच्या प्रश्नाकडे पाठ फिरवत दिल्लीमध्ये वैयक्तिक तोडपाणी करण्यात मग्न असतात. राज्याचे प्रश्न हाताबाहेर गेल्यावर मात्र पाठीत खंजीर खुपसल्याचा आव आणतात. त्यांच्या या बेफिकिरीपणामुळे एवढ्यांदा खंजीर खुपसले गेले आहेत की महाराष्ट्राच्या पाठीवर असंख्य भोके पडली आहेत, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील खासदारांचा सीमाप्रप्रश्नी समाचार घेतला.

महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कर्मचारी सेनेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्राचे ४८ खासदार असून ही ताकद फार मोठी आहे. हे खासदार त्यांच्या पक्षाची लेबले बाजूला सारून सीमाप्रश्नावर एकदाही एकत्र आलेले नाहीत. महाराष्ट्राचे प्रश्न मार्गी लावण्याऐवजी वैयक्तिक तोडपाणी करण्यात तसेच सुतगिरण्या मिळविण्यात त्यांना स्वारस्य आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीमध्येही एकी नाही. त्यांच्या राजकीय ढोंगामुळे तिथल्या मराठी माणसाला मात्र नाहक सहन करावे लागते, असे राज म्हणाले.

कर्नाटकात सत्ता असताना भाजप शांत का?

कानडी अत्याचार सुरू असताना भाजपचे खासदार काहीच बोलत नाहीत. तिथे भाजपची सत्ता असताना महाराष्ट्रातील भाजपचे नेते एकनाथ खडसे केंदातील मंत्र्याचा राजीनामे घेण्याची विधाने करीत आहेत. भाजपची कर्नाटकात सत्ता असताना महाराष्ट्र इथे टाहो फोडतोय. रेल्वे भरतीची परीक्षा मराठीतून घेण्याचा प्रश्न असो वा इतर प्रश्न असोत, त्या त्या वेळीच सावध राहूनच ते मागीर् लावायला हवेत, असे ते म्हणाले.

शरद पवार, नारायण राणेंवरही टीका...

शरद पवारांना अंधारात ठेऊन सीमाप्रश्नी प्रतिज्ञापत्र सादर केल्याचे राष्ट्रवादीचे नेते सांगत आहेत. आता पवार क्रिकेटच्या उजेडात बसले असल्याने इकडे अंधार असणारच. क्रिकेटच्या फ्लडलाईटस्मुळे त्यांच्या डोळ्यापुढे अंधारी येणारच, असा टोला राज यांनी लगावला. नारायण राणे यांनाही राज यांनी चिमटा काढला. केंदाने कोकण रेल्वेच्या प्रश्नावर आश्वासन दिल्यावर नारायण राणे आणि सेनेनेही आंदोलन मागे घेतले. केंदाकडून एवढे दिवस फटके खाल्ल्यानंतरही त्यांच्या आश्वासनावर हे कसे काय विश्वास ठेवतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.


3 comments:

  1. सेंट्रल प्रोव्हेन्सेस चा बराचसा भाग घेतला होता संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत. पण एकदा तो भाग ( गडचिरोली, भामरागढ, चिखलदरा , बुलढाणा) महाराष्ट्रात आल्यावर त्याच्याकडे पध्दतशिर दुर्लक्ष केले गेले. केवळ सत्तेच्या राजकारणाचा हा खेळ आहे. त्या भागाबद्दल कोणालाही काहीच घेणं नाही, फक्त राजकीय फायदा पदरी पाडून ध्यायचा म्हणून हे चाललंय सगळं.

    गेले दहा पंधरा दिवस खूप बिझी होतो, दहा दिवस तर नेट वर आलो पण नव्हतो. :)

    ReplyDelete
  2. अगदी असाच प्रकार बेळगांवच्या बाबतीतही होऊ नये एवढीच इच्छा.

    ReplyDelete
  3. मला बेळगाव मधील मराठी जनतेचा आक्रोश समझू शकतो ... पण खरं म्हणजे महाराष्ट्रात आल्यावर त्यांना सांस्कृतिक पाठिंब्या शिवाय अजून काय मिळणार आहे... तुमचं म्हणनं खरं आहे, अजून असा बराचसा भाग महाराष्ट्रात आहे जेथे सरकार कुठल्याही प्रकारचे डेवलपमेंट प्रोजेक्ट राबवत नाही आहे .... दोन्ही राज्यांनी सामोपचाराने हा प्रश्न सोडवला पाहिजे ... वाईट ह्या गोष्टीचे वाटते कि कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे आणि ते असल्या पद्धतीची जुलूम जबरदस्ती करीत आहे .....मला तर ह्या प्रश्नावर काय भूमिका घ्यावी (वैयक्तिक) ते देखील कळत नाही ...

    ReplyDelete