Friday, July 30, 2010

उलटे चालत मनसे कार्यकर्त्यांची डोंबिवलीत पालिकेवर धडक

सदर वृत्त लोकसत्ता (ठाणे वृतांत) च्या सौजन्याने


डोंबिवलीमधील नागरी सुविधांमध्ये त्वरित सुधारणा न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज महापालिकेच्या विभागीय कार्यालयावर सुरक्षा कडे तोडून धडक मारली. विशेष म्हणजे यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी उलटे चालत येऊन अभिनव पद्धतीने आंदोलन केले.
सकाळी ११ वाजता मानपाडा रस्त्यावरील गावदेवी मंदिरापासून उलट चालण्याच्या मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चामध्ये शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. राजेश कदम, राहुल कामत, अ‍ॅड. सुहास तेलंग, दीपिका पेडणेकर, राजन गावंड, इरफान शेख, शरद गंभीरराव आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले होते.
विभागीय कार्यालयावर मोर्चा प्रवेशद्वाराजवळ अडविण्यात आल्याने मनसे सैनिक संतप्त झाले. त्यावेळी जोरदार झटापट झाली. कार्यकर्त्यांंनी प्रवेशद्वाराला जोर देऊन ते उघडले व शेकडो कार्यकर्ते आवारात घुसले. त्यानंतर आतील लोखंडी दरवाजाही उघडण्यासाठी धडक दिली. यावेळी सुरक्षा कर्मचारी व कार्यकर्त्यांत संघर्षांची चिन्हे होती. यावेळी दोन महिला कार्यकर्त्यांच्या बोटांना किरकोळ दुखापत झाली. अखेर पोलिसांसह राजेश कदम यांनी कार्यकर्त्यांना शांत केले.
प्रभारी उपायुक्त सुभाष भुजबळ मोर्चाला सामोरे गेले, मात्र आम्हाला आयुक्त व शहर अभियंता हवेत, अशी मागणी केली व ते येईपर्यंत मोर्चेकरी ठाण मांडून बसले.
नंतर शहर अभियंता पी.के. उगले आले. त्यांनी आमदार रमेश पाटील, आमदार प्रकाश भोईर आदींशी चर्चा केली. उगले यांना नंतर निवेदन देण्यात आले. यामध्ये शहरातील रस्ते त्वरित दुरुस्त करण्यात यावेत, शास्त्रीनगर रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नेमावेत, डोंबिवलीसाठी अधिकाऱ्यांना प्रशासकीय अधिकार द्यावेत, फेरीवाले हटवावेत आदी मागण्यांचा समावेश आहे.
यानंतर पत्रकारांशी बोलताना उगले यांनी २१ ते २६ जुलै या काळात अतिवृष्टी झाली, तसेच पाणी व सांडपाण्याचे प्रकल्पाचे काम यामुळे रस्ते जास्त खराब झाल्याचे सांगितले. रस्ते देखभाल, दुरुस्तीसाठी सात प्रभागांना प्रत्येकी ४९ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
कल्याण येथील १२ व डोंबिवलीतील २० रस्ते सिमेंट-काँक्रीटचे करण्याचे हाती घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

4 comments:

  1. can this human power be constructively used when the roads are being made?
    use the positive terror to make the contractors build the roads properly.

    ReplyDelete
  2. किरण, तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे .... मनसे नि अशी एखादी यंत्रणा उभारावी कि त्यांनी रस्ते बांधकामावर नजर ठेवली पाहिजे आणि जर का व्यवस्थित काम झालं नाही तर आंदोलन केले पाहिजे .... हे प्रत्यक्षात कसे उतरेल?

    ReplyDelete
  3. (मनसेच्या) मनात असेल तर शक्य आहे. पण त्यासाठी मनसेने बातमीमूल्य/राजकारणमूल्य असलेले(च) विषय स्विकारणे व भाष्ये करणे (मुख्यत्वेकरून शिवसेनेविरुद्ध) सोडावे. यामुळेच मनसेने बर्‍याच लोकांचा विश्वास गमावला आहे. इथे असे समजू नये की शिवसेना चांगली, मुद्दा हा की चिखलात डुक्कराशी खेळुन आपणच घाणेरडे होतो, आणि डुक्कर आनंदी!

    का कठीण आहे? त्यांच्याकडे राजकीय बळ आहे, खबरी आहेत, सगळं काही आहे. मग का नाही होत हा विचाराचा मुद्दा नव्हे काय?

    ReplyDelete
  4. एकीकडे फ़ेरीवाले हटवण्यासाठी आंदोलने करणे आणि दुसरीकडे footpathवर मराठीवर्गासाठी दुकानाला जागा मागणे हा विरोधाभास नाही होत काय?

    ReplyDelete