Monday, July 12, 2010

मनसेच्या चार आमदारांचे निलंबन रद्द

म टा च्या सौजन्याने


मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
12 Jul 2010, 1445 hrs IST

अबू आझमी यांना आमदारकीची शपथ घेताना मारहाण करुन विधानसभेत राडा केल्यामुळे पहिल्या अधिवेशनापासूनच निलंबित झालेल्या मनसेच्या चार आमदारांवरील निलंबन रद्द करण्यात आले आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारास मतदान केल्यामुळेच मनसे हे बक्षिस मिळाल्याची चर्चा यामुळे जोर धरू लागलीय.

नवनियुक्त आमदारांनी मराठीतून शपथ घ्यावी, असे आवाहन मनसेने सर्व आमदारांना केले होते. या आवाहनला जाहीरपणे वाटाण्याच्या अक्षता लावत अबू आझमी यांनी हिंदीतून आमदारकीची शपथ घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी मनसेच्या शिशिर शिंदे, राम कदम, रमेश वाजंळे आणि वसंत गिते या चार आमदारांनी अबू आझमी यांना शपथ घेण्यापासून रोखले. माईक खेचून घेतला, आझमी यांना शपथ घेण्याच्या स्टेजवरुन खाली खेचून थोबाडीत मारण्यात आली. या घटनेनंतर मनसेच्या आक्रमक झालेल्या आमदारांनी आझमी यांचा जाहीर निषेध करत घोषणाबाजी केली होती. या प्रकरणी मनसे आमदार शिशिर शिंदे, राम कदम, रमेश वाजंळे आणि वसंत गिते यांना चार वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते. त्यांना विधानसभेत येण्यास तसेच सभागृहाच्या कामकाजात भाग घेण्यास मनाई करण्यात आली होती.

तेरा आमदार निवडून आले असताना चार प्रमुख आमदारांवर कारवाई झाल्यामुळे मनसेला विधानसभेत मोठा फटका बसला होता. ही कारवाई रद्द व्हावी आणि निलंबित आमदारांना पुन्हा कामकाजात भाग घेता यावा, यासाठी मनसेचे पडद्याआडून प्रयत्न सुरू होते. अखेर विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने ही संधी मनसेने साधली. राज ठाकरे यांनी जाहीरपणे निलंबन रद्द व्हावे यासाठी काँग्रेसला निवडणुकीत पाठिंबा दिल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर आज (सोमवारी) मनसेच्या आमदारांवरील निलंबन रद्द करण्यात आले.

निलंबन रद्द करण्याच्या ठरावाला सुरुवातीला आक्षेप घेणा-या भाजपने नंतर यु टर्न घेतला आणि निलंबन रद्द झालेल्या मनसे आमदारांच्या स्वागताची भूमिका घेतली.

याआधी सोमवारी सकाळी राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचे पहिले सत्र सुरू होताच विरोधक आक्रमक झाले होते. लेनचे वादग्रस्त पुस्तक या मुद्द्यावर सरकारविरोधी घोषणा देत विरधकांनी सभागृह दणाणून सोडले. अखेर आधी दहा मिनिटांसाठी आणि पुन्हा गोंधळ सुरू झाल्यामुळे दुपारी एक वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले होते. दुपारी काम सुरू झाल्यावर मनसेच्या आमदारांचे निलंबन मागे घेण्याचा ठराव सादर झाला आणि थोड्याच वेळात मंजूर झाला.

दरम्यान, निलंबन रद्द झाल्यामुळे मनसेचे अनेक दिवसांपासून विधानसभेबाहेर असलेले, चार आमदार मंगळवारपासून कामकाजात सहभागी होणार आहेत.

3 comments:

 1. राज ठाकरेंनी केलेली शरदरावांच्या बरोबरची मांडवली काही फारशी पचनी पडली नाही.राजकारणातही वैचारिक शुचिता पाळायलाच हवी असे वाटते.

  ReplyDelete
 2. महेंद्रजी बऱ्याच दिवसानंतर आपली प्रतिक्रिया बघून आनंद झाला.
  राजकारणात तडजोडी ह्या आल्याच .... खुद्द शिवाजी महाराजांनी स्वराज्य टिकवण्यासाठी कधी आदिलशाहीशी तर कधी मोगलांशी तडजोडी केल्या आहेत ...... त्यात माझ्या मते गैर काही नाही .... आमदारांनी विधानसभेत सामान्य जनतेचे प्रश्न मांडावेत आणि ते करण्या करिता निलंबन मागे जाने जरुरी होते आणि आपले विरोधी पक्ष आमच्या साठी आवाज उठवतील ह्याची सुतराम शक्यता नव्हती तेव्हा हे पाउल उचलणे गरजेच होतं .... असो, आता ह्यांनी विधानं सभेत सरकारी पक्षाचे तीन तेरा वाजवणे गरजेच आहे.

  ReplyDelete
 3. लोकशाहीचा - लोकमताचा आदर करून निलंबित आमदारांचे निलंबन रद्द करून घेणे याला राज ठाकरे यानी प्राथमिकता देणे योग्यच आहे.

  ReplyDelete