Friday, May 28, 2010

जिल्हाप्रमुखांचे आढाव्याचे ‘महानाटय़’

सदर लेख हा लोकसत्ता मधील ठाणे वृतांत ह्या पुरवणी तून घेतला आहे

विनोद


लोकसत्ता
२८ मे २०१०
भगवान मंडलिक

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना-भाजपची सत्ता आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळातील अडीच वर्षांच्या काळात काँग्रेस आघाडीच्या सत्तेने पालिकेत प्रचंड अनागोंदी कारभार केला. जनतेला नागरी सुविधा नाहीच पण केवळ जनमताची थट्टा आघाडीने केली. मतांची उलटापालट करून अडीच वर्षांनंतर पालिकेतील सत्ता काबीज करण्यात शिवसेनेने महत्वाची भूमिका बजावली. पण, आता युतीच्या अनागोंदी कारभारामुळे काँग्रेस आघाडीचीच सत्ता बरी होती, असे म्हणण्याची वेळ मतदार नागरिकांवर आली आहे.याचे प्रत्यंतर मतदार जनता विविध विकास कामे, त्याचा उडालेला फज्जा या माध्यमातून घेत आहे.

पालिकेत युतीची सत्ता काबीज केल्यानंतर येथील सत्तेवर अंकुश ठेवण्याचे, मतदार जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करून घेण्याचे काम कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, त्यानंतर जिल्हासंपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांचे होते. पण नंतर युतीच्या सत्तेने जनतेला काय दिले? ज्या तडफेने महापौर रमेश जाधव यांना शिवसेनेने महापौरपद बहाल केले. ते आपल्या पदाला उतराई झाले का? असे एक ना अनेक प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित झाले आहेत. पालिकेत युतीची सत्ता आणण्यासाठी, मतांची बेरीज वजाबाकी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह रात्रीचा दिवस केला. सत्तांतरात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या हुकमी उमेदवारांना भूमीगत ठेवून हॉटेलची लाखो रूपयांची बिले देऊन उधळपट्टी करण्यात शिवसेनेला आनंद वाटला. गेल्या अडीच वर्षांच्या काळात सत्ता आणण्यासाठी जिल्हासंपर्कप्रमुख एकदाच पालिका सभागृहातील ‘व्हीआयपी’ कक्षात बसले होते.

त्यानंतर एखाद्या महासभेला येऊन महासभेत काय चाललेय, पीठासन अधिकारी तथा महापौर सक्षमतेने काम करतात का, की थिल्लरपणा करतात याचे मूल्यमापन करावे, असे एकदाही शिंदे, त्यांचे सहकारी किंवा भाजपच्या नेत्यांना कधी वाटले नाही. फक्त ‘बीओटी’ प्रकल्प, टेंडर टक्केवारी आणि रात्री १२ नंतरच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका एवढ्याच गर्तेत जिल्हाप्रमुख अडकून पडले. माजी जिल्हाप्रमुख स्व. आनंद दिघे हे दर महिन्याला कोणत्याही कारणाने पालिकेत येत असत. आढावा घेत. वर्तमानपत्रातून एखाद्या विषयावर चर्चा चालू असेल तर त्याची गंभीर दखल घेण्यास पालिकेतील पदाधिकाऱ्यांना भाग पडत असत. पण ते चित्र आता दिसत नाही.

शहराचा ‘राजा’ महापौर रमेश जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पालिकेत प्रचंड अनागोंदी कारभार सुरू केला आहे. त्याला ‘प्रधान’ आयुक्त गोविंद राठोड यांचीही साथ लाभल्याने या अनागोंदीत आणखी भर पडली आहे. राजा आणि प्रधान एकाच टेबलावर सगळे ‘गेम’ खेळत असल्याने वरच्या राजापासून ते पालिकेतल्या राजापर्यंत सर्वत्र आनंदीआनंद आहे.

डोंबिवलीतील क्रीडासंकुलाच्या जागेवर सुरू असलेले मॉलचे काम हे अधिकृत आहे. पण पेपरवाले चुकीच्या बातम्या छापत असल्याची माहिती महापौर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना गेले वर्षी दिली होती. पण मुख्यमंत्र्यांनीच हे काम अनधिकृत असल्याचे जाहीर केले आहे. या मॉलला शहरातील सर्व जाणकारांचा विरोध आहे. जनमताचा आदर न करता पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीच्या पदाधिकाऱ्यांनी ठेकेदाराला पाठीशी घालून हा विषय रेटून नेला. याउलट एक दिवस जिल्हासंपर्कप्रमुख शिंदे यांनी संध्याकाळी मॉलच्या ठिकाणी भेट देऊन ‘हे काम जर अधिकृतपणे सुरू असेल तर संबंधित पेपरवाल्यांना खुलासा, नोटीस (ठाणे वृत्तांत)पाठवून द्या’ म्हणून पदाधिकाऱ्यांना सूचित केले होते. भाषाप्रभू कै. पु. भा. भावे यांच्या नावाने ‘भावे स्मारक’ उभारण्याचा निर्णय महापौर जाधव यांनी शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत घेतला होता. उद्धव व रश्मी ठाकरे यांनीही हे स्मारक झालेच पाहिजे म्हणून आग्रह धरला होता. पण महापौर जाधव हे ‘पेपरवाले काहीही छापतात, ते छापतात आणि आपण कशाला ती कामे करायची’ या मताचे असल्याने जिल्हाप्रमुखांनी नेहमीप्रमाणे टंगळमंगळ केल्याने या विषयाकडे दुर्लक्ष केले. अखेर भावे यांची जन्मशताब्दी झाली तरी ‘भावे स्मारकाची’ साधी एक वीटही हलली नाही.

एकनाथ शिंदे यांचा आपल्याच पदाधिकाऱ्यांवर वचक नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या अनागोंदी परिस्थितीचा आता ‘विचका आणि चिखल’ तयार झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या पालिका निवडणुकीत काय करायचे, आताची विकासकामांची परिस्थिती काय याचा आढावा घेण्यासाठी शिंदे यांनी पालिकेत पदाधिकाऱ्यांची अलीकडेच एक आढावा बैठक घेतली. उद्धव ठाकरे परदेशातून आल्यावरच शिंदे यांना आढावा बैठक घेण्याची उपरती का झाली. पेपरमध्ये यासंदर्भात बातम्या प्रसिद्ध व्हाव्यात, असे का वाटले असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.

आतापर्यंत स्वत:च्या मस्तीत दंग असलेल्या शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पालिकेत विकासकामांच्या नावाने आपण जो ‘चिखल’ तयार केला आहे. मतदार जनतेचा आपण अंत पाहिला आहे, ती मतदार जनता आता मनसेला हाताशी धरून त्याच ‘चिखलात’ आपल्याला गाडल्याशिवाय राहणार नाही, याची भीती युतीच्या नेत्यांना आतापासून वाटू लागली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आढाव्याचे केवळ नाटक केले, असे मानले जाते.

No comments:

Post a Comment