Monday, May 24, 2010

दिलमजाई ची दोन पत्र ... लोकप्रभा

सदर लेख हा लोकप्रभा ह्या अंकातून घेतला आहे ....
खालील लेख ह्या लिंक वर देखील मिळू शकतो ....


हा लेख काल्पनिक आहे ......ह्याची नोंद घ्यावी ....

विनोद

वाचक हो, आजचा दिवस आमच्या आयुष्यातील आत्यंतिक रोमांचक आणि थरारक आणि ‘क’ प्रत्ययांकित काहीतरी असा दिवस आहे. आमचे जानेमाने सन्मित्र राजसाहेब ठाकरे आणि आमचे सज्जन शिवसैनिक आणि कार्यप्रमुख उध्दोजी बाळाजी यांच्या दिलजमाईची स्वप्ने महाराष्ट्रातील डोंगरदऱ्यांना, झाडावेलींना, गाईगुरांना, आणि तमाम मराठी मनांना पडू लागलेली असतानाच आम्हास हा पत्रव्यवहार गवसला. या आत्यंतिक गोपनीय आणि वैयक्तिक पत्रांमध्ये या दिलजमाईचे गुपित साठवले आहे. ते मुळातून वाचलेले बरे! ही पत्रे खोटी आहेत, असे नंतर म्हणायचे ठरल्यामुळे ती खोटी आहेत हे आम्हीच सर्वात आधी म्हणतो आहोत! याउप्पर ती वाचावयाची की नाही याची मर्जी तुमची!!


प्रिय राजा,
खूप दीवसांनी तूला पत्र लिहत आहे. सवय नाही, तरीही लिहत आहे. आजकाल कोणीही पत्र लिहत नाही, हे मला माहीत आहे. मोबाइलवर मेसेज पाठवतात किंवा इमेलवर मेल पाठवतात. पण मेसेज आणि मेल दोन्हीही कोणीही वाचू शकतो,

असे मला सांगीतले गेले. पत्र सेफ असते. जिभ लावून एकदा बंद केले की बास. वाचून झाल्यावर फाडुन टाकावे किंवा सुरनळी करून कानातला मळ काढावा! या पत्राचा वीशय खुप गंभीर आणि सिक्रेट असल्याने मी हे पत्र गपचूप पाठवत आहे. वाचल्यावर इमिजिएट फाडुन टाक. भलत्या कुणाच्या हाति गेले तर चॅनलवाले किमान आठ दीवसाचा पगार खातील! असो.
गेल्या आठवडय़ात तु माझ्या फोटोग्राफीचे जाहीर कौतुक केलेस. अंबरनाथ पालिकेत शिवसेनेला पाठिंबाही दीलास. तूझ्यामुळे आमचा नगराध्यक्ष निवडुन आला. हे तु काय चालवले आहेस? सुरवातीला मला वेगळाच वास आला. यामधे काही तरी गेम (पुर्वीच्या काळी मराठीत ‘गोम’ म्हटले जात होते, असे साहेबांनी सांगितले!) आहे, असे आम्हा सर्वानाच वाटले. चार वर्षे एखाद्या सासूरवाशीणिला यथास्थित मारझोड करून अचानक वाढदीवसाला तीला कोल्हापुरी साज आणुन दीला तर कसे वाटेल? तसे डिट्टो वाटले. अंबरनाथला तर जाम गोची होणार असेच वाटले होते. तीढा सुटणे मुश्किल आहे, असे वाटत अस्तानाच मनसेने पाठिंबा दील्याचा फोन आला. मी तेव्हा तूला एसएमएसवरून मेसेज पाठवला होता. मिळाला का? मी मीलींद नार्वेकरकडून तूझा नवा नंबर घेतला होता. पण तो डॅम्बीस आहे. मागल्या वेळेला छगन भुजबळांचा नंबर मी त्याला वीचारला तेव्हा त्याने मुद्दाम दहा डीजिटचा मोबाइल नंबर सांगण्याऐवजी नऊच आकडे सांगीतले होते. मी शेवटी मनानेच झिरो लावून दहा आकडी नंबर लावून त्यांना मेसेज पाठवला! आश्चर्य म्हंजे माझा आकडा.. आपले सॉरी नंबर करेक्ट लागला!! चार वर्षांपूर्वी तु शिवसेना सोडलीस तेव्हाचा तूझा नंबर अजूनही माझ्या फोनबुकमध्ये आहे. पण सध्या तो नंबर माहीमच्या एका फर्निचरवाल्याकडे आहे. एकदा मध्यरात्री मी सहज तूझी चेष्टा करावी म्हणून त्या नंबरवर फोन केला होता. फारच घाणरडे काही तरी बोलला तो. तुझाच आवाज काढून बोलत होता. मी त्याला दमात घेतला थोडाफार, तर हसायलाच लागला!! मग मी फोन कटच केला!! जाऊ दे फर्निचरवाल्याचे एवढे काही नाही. मुद्दा आपल्या संभाव्यदिलजमाईचा आहे. कारण आपण दोघे ’दोन’ असलो, तरी आपली मने एकच आहेत. आपण एकत्र येणार या कल्पनेने राजा, माझी झोपच उडाली आहे रे!

राजा, लहानपणीच्या आपल्या कितीतरी आठवणी एकत्र आहेत. दादरच्या घरापासुन ते जुन्या मातोश्री बंगल्यापर्यंत. कीतीतरी ठीकाणी आपण इकत्र धमाल केली. लहानपणी आपण बिल्डिंगच्या जिन्यात घसरगुंडी खेळायचो. म्हंजे जिन्याच्या लाकडी कठडय़ावरून घसरत घसरत यायचे आणि जिना सुरू होतो, तेथल्या लाकडी नक्षीदार खांबाशी ब्रेक मारायचा. फार चपळाईने ब्रेक मारावा लागे. पण एकदा तु त्या कठडय़ाला तेल लावून ठेवलेस. पुढे तीनेक महीने मी पत्त्यांचा बैठा खेळ खेळत होतो. पुढे मोठेपणी मला फोटोग्राफीचा नाद लागला. तु आणि बाबा म्हणजे साहेब व्यंगचित्रे काढत बसायचात. मी कॅमेरा गळय़ात घालुन हिंडायचो. मी छान फोटो काढतो, असे सांगुन तु स्वत:चे खुप फोटो साहेबांबरोबर काढून घेतलेस. सुरवातीला नाही, पण नंतर नंतर माझी टय़ूब पेटायला लागली. क्यामेरामनचा कधीही फोटो निघत नसतो. आम्ही आपले येडय़ासारखे फ्लॅश मारतोय, आणि चमकतात, तुमच्यासारखे तिसरेच! हे फोटोग्राफरचे प्राक्तन आहे. माझ्या गळयात क्यामेरा अडकवुन तु पक्षात सटासट प्रगती करतो आहेस, हे मला उशीरा कळले. पण कळले तेव्हा मी तुझ्या गमज्या बंद केल्या.
तु तर साहेबांची सगळीच्या सगळी नक्कल करायचास. (अजुनही करतोस! कबूल कर!!) ते व्यंगचित्रे काढतात, म्हणून तुही काढणार. ते पाइप ओढायचे म्हणून तुही ते पाइपचे झुरके चोरून मारायचास. एकदा असाच पाइप ओढताना रेडहॅण्ड पकडला गेला होतास. आठवते आहे? पाइप भरून तो पेटवून तु थेट साहेबांसारखा खुर्चीत बसून डायलॉग मारत होतास. मी काही कारणाने खोलीबाहेर गेलो, आणि थोडय़ावेळाने साहेब, म्हणजे तुझे काकाच आले!! मग काय!! नंतर चड्डी बदलून तु काही घडलेच नाही, अशा आविर्भावात खेळायला बाहेर आलास! हे जे तुला जमते ना, ते मला अजुनही जमत नाही. तुझ्या मनात काय चालले आहे, याचा थांग लागत नाही. माझ्या पोटात गुरगुरत असले, तरी बाहेर ऐकू येते! तु माझ्या फोटोठााफीचे कौतुक केलेस, खुप बरे वाटले. ‘महाराष्ट्र देशा..’ हा चित्रग्रंथ तयार करताना मी खुप कष्ट घेतले होते. यात एरियल फोटोग्राफीचे नमुने आहेत. एरियल, म्हंजे हवाई फोटोग्राफी फार अवघड असते. विमानात किंवा हेलिकॉप्टरमध्ये जायचे. आडवे व्हायचे. खाली किल्ला दिसत असतो. त्याचे फोटो घ्यायचे. हेलिकॉप्टरमध्ये खरे तर मला मळमळते. पण तरीही मी फोटो घेतले. आडवे झोपुन, बेल्ट लावून फोटो काढावे लागतात. बेल्ट मस्ट आहे. जरा हेलिकॉप्टर तिरके झाले की माणूस घसरतो! दरवाजा उघडा असला की झालेच. बेल्ट बांधलेला असला तर मग काही प्रॉब्लेम नाही. एकदा मी चक्क बेल्ट बांधायला विसरलो! तो पायलट घाबरून ओरडायला लागला. मी जाम हसलो त्याला! पुढे मला इरियल फोटोग्राफीचा चस्का लागला. मी हवेत उंच उडी मारून वाघांचे फोटो काढले. त्यालाही एकाअर्थी एरियल फोटोग्राफीच म्हणावे लागणार! माझ्या आगामी चित्रग्रंथात मी हरीण, वाघ, सिंह यांची एरियल फोटोग्राफी संकलित करतो आहे. चित्रग्रंथाचे नाव मी अ‍ॅक्चुअली, ‘महाराष्ट्र देशी..’ असे ठेवले होते. पण ‘देशी’ फार वाईट दिसते असे सुभाष देसाईंनी तोंडाकडे अंगठा नेत सांगीतले. मग ’देशी’ची वेलांटी खोडून ‘देशा’ केले. दुष्काळावरही मी तिसरा चित्रग्रंथ सिद्ध करत आणला आहे. शेतकऱ्यांची हलाखी दाखवणाऱ्या या पुस्तकासाठी ‘देशा’मधली मात्रा काढुन टाकणार आहे, आणि ‘महाराष्ट्र दशा’ असे नाव ठेवतो आहे. आहे की नाही मी कल्पक? देशी, देशा, अािण दशा!!

राजा, मी तुझ्या प्रत्येक प्लस पाईण्टला मायनस करत चाललो आहे, हे पाहातो आहेस ना? तु भाषण सॉलिड करतोस, (आता) मीही मस्त बोलतो असे संजय राऊत आणि भारतकुमार राऊत हे दोन्ही खासदार संपादक म्हणत असतात. तु इव्हेण्टवाला म्हणून प्रसिध्द झालास, मी तर साक्षात लता मंगेशकरांचा इव्हेट करून दाखवला. तु फोटोबायोग्राफी काढलीस,मी गडकिल्ल्यांचे सरस पुस्तक काढले. तु गर्दी जमवतोस, आता मीही जमवतो. तु मीत्रांच्या टोळक्यात असतोस, आता मीही ठरवून ग्रुप जमवला आहे. आहे की नाही?
पण राजा, असे असले तरी काही गोष्टी बदलणार नाहीत. मी चांगला फोटोग्राफर आहे असे जरी तु म्हणालास तरी मी तुला चांगला व्यंगचित्रकार म्हणणार नाही! कारण तु आजकाल काही काढतच नाहीस. मी मात्र खुप फोटो काढत असतो. पण या सगळया भानगडीत आपण दोघांनी एकत्र येण्याची हालचाल सुरू झाली आहे. कालच दिल्लीहून शरदकाका पवारांचा फोन येऊन गेला. बातम्यांनी चपापले होते. सुशीलकुमार शिद्यांनी फोन करून चौकशी केली. एकंदर लोक हादरले आहेत. इतकेच काय खुद्द आमच्या पक्षात अनेकांचे धाबे दणाणले आहेत. त्यात मीही एक गंमत केली. नारायण राणेंचा फोन येऊन गेल्याची पुडी मी आमच्या लोकात सोडून दिली आहे! म्हंजे तू, मी आणि राणे तिघेही परत एकत्र! भुजबळांचीही तशी तयारी आहेच. आपण सगळे पुन्हा एकत्र आलो, तर गणेश नाईक मागे राहणार नाहीत. अशा परिस्थितीत काँग्रेसवाल्यांना आणि राष्ट्रवादीवाल्यांना गावाकडे जाऊन शेती करण्यावाचून पर्याय राहणार नाही. खरे की नाही? आपण मात्र मुंबई महापालिका ताब्यात ठेवू शकू. तू परत आलास, तर मी तुला शिवाजी पार्क शाखेचा प्रमुख करीन! चालेल ना? सर्वाना आपल्या दिलजमाईची स्वप्ने पडत आहेत. पण आपण सावध पावले टाकली पाहिजेत.
बघ, वीचार कर, आणि मला सांग. पत्रच पाठव. फोन किंवा मेल नको. या पत्रात तुला असंख्य चुका शुध्दलेखनाच्या दीसतील. साहजिकच आहे. हे पत्र मी संजय राऊतांना डिक्टेट केले आहे! तुझाच,
- उ. ठा.
ता. क. : तू चांगला नव्हे, उत्कृष्ट व्यंगचित्रकार आहेस! थँक्यू!!

प्रिय दादू,
पत्र मिळाले, फाडून टाकले. बरं का.. किती अशुद्ध भाषा. शी!! अशाने मराठी भाषा लौकरच रसातळाला जाईल. राऊतांना सांगा, लौकरात लौकर म्हणजे पंधरा दिवसांत शुद्धलेखनाचा प्रश्न सोडवला नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते तो आपल्या पद्धतीने सोडवतील!! आणि त्याची जबाबदारी महाराष्ट्र सांस्कृतिक महामंडळ, मराठी भाषा सुधार समिती आणि प्रेस कौन्सिल यांच्यावर असेल!! असो. तुझे पत्र वाचून खूप बरे वाटले. अक्षर तुझे नाही हे मी ओळखलेच. पण ते राऊतांचे आहे, हेदेखील ओळखले. लहानपणीच्या काही आठवणी तू काढल्यास. या पत्रात अनेक गोंधळाचे मुद्दे आहेत. त्याबद्दल काही खुलासे याप्रमाणे :

१. माझा फोन नंबर तोच आहे. तू फर्निचरवाल्याला नव्हे, मलाच फोन केला होतास! असो!!
२. कठडय़ाला मी तेल लावले नव्हते. टाल्कम पावडर लावली होती!
३. मी आतल्या खोलीत पाइप ओढतो आहे, याची चुगली तूच काकांकडे केली होतीस. मी तेव्हा चड्डी बदलली कारण बाहेर खेळायचे माझे कपडे (अजूनही) वेगळे असतात!
४. मी कधीही काकांची नक्कल केली नाही. माझे नाव जॉनी लीव्हर नाही! काय आहे, ते तमाम महाराष्ट्राला ठाऊक आहे!!
५. मराठी माणसाला कायम गद्दारीचा साप चावतो. मराठी संस्कृतीच्या गंडस्थळावर दंशांवर दंश करणाऱ्या या गद्दारांवरती तुझं चौथं पुस्तक येऊ दे. त्याचं नाव आपण ‘महाराष्ट्र दंशा..’ असं ठेवू! (याला म्हंटात मेरी भी उप्पर एक र्दुी!) पण तुझं पुस्तक खरंच बरंच बरं आहे! असो!
६. तू पुस्तकं आणि फोटोच काढणार आहेस की राजकारण करणार आहेस?
७. क्रमांक पाचच्या मुद्दयात उपस्थित झालेल्या प्रश्नाच्या उत्तरात तू फक्त पुस्तकंच काढणार असशील, तर एकत्र यायला माझी हरकत नाही!
८. नुसतेच फोटो काढणार असशील, तरीही एकत्र यायला माझी हरकत नाही!
९. लता मंगेशकर आणि आशा भोसले या दोन्ही सख्ख्या बहिणी शेजारी शेजारी राहतात. पण गाणी वेगवेगळी म्हणतात! एकच गाणं दोघी म्हणत नाहीत. यावरून काय तो बोध घ्यावा!
१०. शरदकाकांचा मलाही फोन आला होता. बोलणे झाले नाही. सकाळी साडेआठला मिस्ड कॉल आलेला दिसतो आहे!
सारांश, मला तू काढलेले फोटो आवडतात, एवढेच खरे आहे. बाकी सगळा चॅनलवाल्यांचा भंपकपणा आहे. त्यांना मी चांगला ओळखून आहे. सध्या राजकारणात काहीही घडत नव्हते, म्हणून मी संधी साधून जरा टीआरपी मिळवला इतकेच. एवढया भांडवलावर दिलजमाईची भाषा करणे गाढवपणाचे आहे. योग्यवेळी ते मी बोलीनच.
बाकी ठीक. महापालिका निवडणुकीत भेटूच. घोडामैदान दूर नाही!

तुझाच,
राजा




4 comments:

  1. जबरदस्त!! हसून हसून पुरेवाट झाली !!

    ReplyDelete
  2. खरोखर फार मस्त लिहिलंय .......मजा आली वाचून

    ReplyDelete
  3. विनोदजी

    मीही परवाच हा लेख वाचला. पोट धरधरून हसलो. काही मित्रांनादेखील पाठवला. सगळ्यांनाच आवडलाय.

    तुम्हालाही आवडला आणि तुम्ही इथं उल्लेख केला हे विशेष वाटलं.

    ReplyDelete