Thursday, May 20, 2010

'टिंग्या'ला मिळाले हक्काचे घर

म टा च्या सौजन्याने

खालील बातमी महाराष्ट्र टाइम्स मधून घेतली आहे

विनोद

आपल्या उत्कट अभियनाच्या जोरावर थेट राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार टिंग्या अर्थात शरद गोयेकेरने पटकावला खरा, पण त्यामुळे त्याच्या आयुष्यातल्या अडचणी संपल्या नव्हत्या. जेमतेम २ माणसे राहू शकतील असे तंबूवजा घर आणि साध्या जेवणाचीही भ्रांत असणाऱ्या टिंग्याच्या कुटुंबाची ही व्यथा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर आली आणि त्यांनी पुढाकार घेत शरदला तब्बल ८०० चौरस फुटांचा बंगलाच बांधून दिला आहे. त्यामुळे घराविना होणारे या कुटुंबाचे हाल संपुष्टात आले असून, शनिवारी शमिर्ला ठाकरे यांच्या उपस्थितीत गोयेकर कुटुंबाचा गृहप्रवेशाचा सोहळा होत आहे.

मंगेश हाडवळे यांनी दिग्दशिर्त केलेला टिंग्या २००८ मध्ये मराठी चित्रपट रसिकांच्या मनाला स्पर्श करुन गेलाच शिवाय त्याने देश परदेशात अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले. खुद्द राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते दिल्लीत ५५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट बालकलाकारासाठीचा पुरस्कार देऊन शरदला गौरवण्यात आले. या सोहळ्याचे वृत्तांकन करतांना काही टीव्ही चॅनेल्सवर शरदचे जुन्नर तालुक्यातल्या राजुरी या खेड्यातले तंबूवजा घर दाखवले जात होते. आपल्या मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेणाऱ्या एका मराठी कलावंताची ही दूरवस्था राज ठाकरे यांनी पाहिली आणि त्यांनी स्वखर्चातून शरदला प्रशस्त घर बांधून देण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयाच्या अंमलबजावणीची जबाबदारी आमदार शिशिर शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली. शिंदे यांनी तडक राजुरी येथे धाव घेऊन ऐसपैस घराचा आराखडा तयार केला. आपल्या गावातील कर्तबगार मुलासाठी घर बांधायचे आहे हे समजल्यावर स्थानिक बांधकाम व्यावसायिक अशोक आवटी यांनीही नफ्यावर पाणी सोडत तब्बल ८०० चौरस फुटांचे प्रशस्त घर बांधले आहे. साडे सहा लाख रुपये खर्चून बांधलेल्या या घरात २ बेडरुम, हॉल व किचन आहे. घरात जीवनावश्यक वस्तूदेखील पुरवण्यात आल्या असून, शनिवारी शमिर्ला ठाकरे व आमदार शिशिर शिंदे यांच्या उपस्थितीत गृहप्रवेशाचा सोहळा होत आहे. शरदचे वडील यशवंत व आई यमुनाबाई यांचे उत्पन्न फारसे नाही. त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह सुरळीतपणे व्हावा यासाठी राज ठाकरे यांनी यशवंत गोयेकर यांच्या नावावर दीड लाख रुपये बँकेत फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवल्याचे आ. शिशिर शिंदे यांनी सांगितले.

टिंग्याला आथिर्क मदतीच्या घोषणा अनेकांनी केल्या. पण प्रत्यक्षात मदतीचा हात मात्र राज ठाकरे यांनीच दिला. त्यांच्या मदतीमुळे हक्काचे घर मिळाल्याचा आनंद व्यक्त करतानाच यशवंत गोयेकर यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू ओघळले.


No comments:

Post a Comment