Tuesday, May 18, 2010

‘मनसे’ आमदारामुळे फसला बिल्डरचा ‘म्हाडा’चा प्लॉट हडप करण्याचा डाव

लोकसत्ता च्या सौजन्याने

खालील बातमी आजच्या ठाणे वृतांत मधून घेतली आहे आणि ती खालील लिंक वर देखील मिळू शकेल,


विनोद



बिर्ला महाविद्यालय परिसरातील ‘म्हाडा’ कॉलनीमधील एक रिकामा प्लॉट हडप करण्याचा एका बिल्डरचा डाव ‘मनसेचे आमदार प्रकाश भोईर यांच्या प्रयत्नामुळे फसला आहे. ‘म्हाडा’चे स्थानिक अधिकारी आणि बिल्डर यांच्या एकत्रित संगनमताने ‘म्हाडा’चा हा प्लॉट विकसित करण्याचा डाव रचण्यात आला होता, अशी माहिती आमदार प्रकाश भोईर यांनी दिली.
आ. भोईर यांनी सांगितले, ‘म्हाडा’ कॉलनीमधील एका रिकाम्या प्लॉटवर एका बिल्डरने स्वत:च्या नावाचा फलक लावून हा प्लॉट आपण विकसित करणार असल्याचे जाहीर केले होते. ‘म्हाडा’चा हा प्लॉट बिल्डर परस्पर कसा काय विकसित करू शकतो, असे प्रश्न स्थानिक नागरिकांना पडले होते. याविषयी उघडपणे कोणी बोलण्यास तयार नव्हते. गेल्या दहा दिवसापासून आमदार भोईर यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी तक्रारी करून ‘म्हाडा’चा एक प्लॉट बिल्डर विकसित करीत असल्याचे निदर्शनास आणले.
आ. भोईर यांनी ‘म्हाडा’च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना संपर्क करून ‘हा प्लॉट कोणा बिल्डरला विकसित करण्यासाठी दिला आहे का, म्हणून विचारणा केली. त्यावेळी त्यांनी ‘कल्याणमध्ये असा कोणताही प्लॉट विकसित करण्यासाठी दिला नसल्याचे सांगितले. मग एका बिल्डरने ‘म्हाडा’च्या जागेवर प्लॉट विकासाचा फलक लावला असल्याचे आ. भोईर यांनी छायाचित्रासह दाखविल्यानंतर अधिकाऱ्याने स्थानिक अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून तात्काळ तो फलक काढण्याचे आदेश दिले. ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांचे हे रॅकेट असल्याचे लक्षात आल्यानंतर आ. भोईर यांनी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांच्याशी संपर्क साधून या प्लॉटविषयी माहिती विचारली. त्यावेळी अहिर यांनी ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांना तात्काळ त्या प्लॉटवरील फलक काढण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. स्थानिक नागरिकांनी दाखविलेल्या हिमतीमुळे व आमदार प्रकाश भोईर यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे ‘म्हाडा’चा एक प्लॉट बिल्डरच्या घशात जाण्यापासून वाचला असल्याची चर्चा कल्याणमध्ये सुरू आहे.

No comments:

Post a Comment