शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याला ‘नको त्या पिचवरून खेळू नकोस’, असा सल्लावजा इशारा दिला आहे. माणसाने आपली पट्टी आणि धावपट्टी (पिच) दोन्हीही सोडू नये. तेव्हा ठाकरे यांचे म्हणणे बरोबरच आहे. त्यावर सचिन जे काही म्हणायचे ते म्हणेल, पण या निमित्ताने ठाकरे यांनाही ‘तुमचे पिच नक्की कोणते’, असा प्रश्न विचारण्यास हरकत नाही. १९९० च्या दशकापर्यंत ठाकरे हे मराठीच्या पिचवर खेळले. तुफान बॅटिंग केली त्यांनी. दोनचार घरांच्या काचा आणि काहींची डोकी फुटली, पण मराठीची प्रगती काही झाली नाही. सेनानेत्यांची मात्र झाली. मराठी उलट घसरणीला लागली. त्यांच्या सेनेचे मुख्यालय ज्या शिवाजी पार्क येथे आहे, खुद्द तेथेही मराठी शाळा बंद पडण्याची नामुष्की आलेली आहे. मुंबईच्या महानगर पालिकेत गेली जवळपास दोन दशके सेनेचीच सत्ता आहे आणि बंद पडणाऱ्या शाळाही नगरपालिकेच्याच आहेत. त्या वाचाव्यात यासाठी सेनेने काही केल्याचे ऐकिवात नाही. मुंबईतले खराब रस्ते पेवर ब्लॉकच्या साहय़ाने बुजवण्याचे अनोखे तंत्रज्ञान मुंबई महापालिकेने शोधून काढले आहे. मराठी शाळा वाचविण्यासाठीही असे एखादे पेव्हर ब्लॉक तंत्रज्ञान सेनेने बाळासाहेबांच्या आदेशानुसार शोधून काढले असते, तर बरे झाले असते, पण तसे झाले नाही. कदाचित भाषेच्या पेवर ब्लॉकमध्ये परतावा जास्त नसल्याने त्यांच्या पक्षाने यात लक्ष घातले नसावे. असो. मुद्दा अर्थातच तो नाही, तर सेनेच्या पिचचा आहे. रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाला रंग चढेपर्यंत सेना मराठीच्याच पिचवर खेळली. त्यावर अजूनही त्यांचीच मालकी आहे, असा त्यांचा दावा आहे, पण स्वत: बाळासाहेबांनी मुलाखत दिली ती मात्र इंग्रजी वाहिनीला, तीसुद्धा इंग्रजीत. ही मुलाखतही त्यांनी मराठी दूरचित्रवाणी वाहिनीला दिली असती, तर आपल्या पिचशी इमान राखले, असे म्हणता आले असते; पण आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांत घालून मराठी टिकवण्याचे आव्हान केले जाण्याच्या काळात, अशी अपेक्षाही करणे चूक आहे. ठाकरे यांचे नातू कविता करतात, त्याही इंग्रजीत. तेव्हा त्यालाही त्या मराठीत कर, असे ठाकरे आजोबांनी सांगायला हवे होते. कदाचित मराठीप्रेमी सेनानेत्याला- पत्रकाराला त्या कवितांचा अनुवाद करून मातोo्रीप्रति निष्ठा व्यक्त करण्याची संधी मिळावी, या उदात्त हेतूने त्या कविता इंग्रजीत लिहिल्या गेल्या असतील, पण मुद्दा अर्थातच तो नाही, तर खुद्द सेनेनेच पिच कसे सोडले, हा आहे. रामजन्मभूमी वादाला तोंड फुटल्यानंतर सेना हिंदुत्वाच्या पिचवरून खेळू लागली, त्या वेळी मराठीचे पिच सुटल्याची आठवण सेनाप्रमुखांनी कार्याध्यक्षांना करून द्यायला हवी होती. दरम्यान सेनेकडून सुटलेले मराठीचे पिच सेनाप्रमुखांच्या पुतण्यानेच बळकावले. ते लक्षात आल्यावर सेनेने पुन्हा मराठीच्या पिचवर यायचा प्रयत्न सुरू केला आहे, पण या गडबडीत सेना धावचीतच होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा पक्षप्रमुख म्हणून बाळासाहेबांनाच पुन्हा बॅट हाती धरून मैदानात यावे लागले. आता हे पिच नक्की कोणाचे? बाळासाहेबांच्या सेनेचे की त्यांच्या पुतण्याच्या मनसेचे, यावर सुरू असलेली धाव अद्याप पूर्ण झालेली नाही. तेव्हा तो निर्णय लागायचाय. दरम्यान सेना ‘मराठी’ आणि ‘हिंदुत्व’ या दोन्ही पिचेसवर खेळू लागली आहे. त्यामुळे गोची झाली आहे ती सेनेचा भिडू असलेल्या भाजपची. मुळात भाजपचे अध्यक्ष नितीनभाऊ गडकरी यांना धावपळ तशी कमीच जमते. गडी बैठकीचा. दोन घास खावे-खिलवावेत या वृत्तीचा. त्यामुळे सेनेची ही दोन पिचवरची कसरत त्यांना काही झेपणारी नाही. या मराठीच्या पिचवर खेळणाऱ्याला जवळ करावे तर हिंदी भाषक दूर जातात. त्यांना जवळ आणायचा प्रयत्न करावा तर ही कथित मराठीप्रेमी सेना आड येते, अशी त्यांची अडचण. त्यामुळे सेनेने एकाच कोणत्या तरी पिचवर खेळावे, असे भाजपलाही वाटू लागले आहे. सेनेनेच आपला हात सोडला तर बरे, असे भाजपवाले खासगीत बोलतात. घटस्फोटाचे पातक त्यांना आपल्या माथी नको असावे, पण त्यांना हेही माहीत आहे की, घटस्फोट व्हायचाच असेल तर तो आता होणार नाही. पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालावर आपला संसार अवलंबून आहे, याची जाणीव त्यांना आहेच. त्यामुळे ते काही स्वत:हून दुसऱ्या पिचवर जाण्याच्या मन:स्थितीत नाहीत.याच मुलाखतीत सेनाप्रमुखांनी राजकारणात कोणीही कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो, असे चिरंतन सत्य नमूद केले. वास्तविक त्याची गरज नव्हती. सेनेचे आतापर्यंतचे राजकारण पाहिले तरी याची जाणीव होईल. विश्वनाथ प्रताप सिंग, जॉर्ज फर्नाडिस, शरद जोशी अशा अनेकांच्या वेगवेगळय़ा पिचेसवर सेना आतापर्यंत खेळून गेली आहे. वसंतराव नाईक मुख्यमंत्री असतानाच्या काळात तर या पक्षाचे ‘वसंतसेना’ असे टोपणनावच पडले होते. त्यामुळे राजकारणातल्या घरोब्यांना काळाची, विचारांची मर्यादा नसते, याची मराठीजनांना जाणीव आहेच. सेनाप्रमुखांनी ती नव्याने करून दिल्यामुळे झालीच तर भाजपचीच पंचाईत होईल. त्याही पक्षात गोंधळलेल्या सेनेबरोबरचा संग चालू ठेवायचा का, असा प्रश्न एकमेकांतच विचारला जात आहे. त्याचे उत्तर नागपूरहून अद्याप आले नसल्याने भाजप नेत्यांचीही पंचाईत होत असावी बहुधा. तसे ते आले नाही तर या जुन्याजाणत्या भिडूला घेऊनच त्यांना पुढच्या वर्षांच्या महानगरपालिकांच्या निवडणुका लढवण्याची वेळ येणार आहे. यामुळेही भाजपच्या पोटात गोळा आला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भाजपलाही नवा भिडू नको आहे, असे नाही. मध्यंतरी काही भाजप नेत्यांनी मातोo्रीच्याच पिचवर तयार झालेले राज ठाकरे यांच्याकडे पाहून नेत्रपल्लवी केली, पण त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही. दुसरीकडे सेनाही नवनव्या भिडूच्या शोधात होतीच. आता त्यांना रामदास आठवले हेही भिडू म्हणून हवे आहेत. इतके दिवस राष्ट्रवादीच्या पिचवर उभे राहून मंत्रीपदाची बॅटिंग वगैरे करायला मिळेल, या आशेवर असलेल्या रामदास आठवले यांना शरद पवार यांनी हिंग लावून विचारले नाही. राष्ट्रवादीच्या संघातून खेळताना त्यांच्या वाटय़ाला ‘राखीव’ खेळाडूचीच भूमिका आली. बॅटिंग करायला काही मिळाली नाही. शेवटी ते तरी किती दिवस मैदानात पाणी घेऊन जाणार? त्यामुळे दलितांवर राष्ट्रवादीने अन्याय केल्याचे तुणतुणे वाजवत तेही दुसऱ्या कोणत्या तरी पिचच्या शोधातच होते. त्यांना नव्या भिडूच्या शोधात असलेले सेनावाले दिसले. रामदासजींनी लगेच उडी मारून पिचवर धाव घेतली. साडेतीन टक्केवाल्यांची उपमा द्यायची तर एकादशीकडे महाशिवरात्र जावी तसेच हे झाले म्हणायचे. नवे पिच सापडल्याच्या आनंदात सगळेच असताना या प्रश्नावरही सेनेने किती कोलांटउडय़ा मारल्या होत्या तेही सगळे विसरले. दशकभरापूर्वीच कोणत्याही परिस्थितीत नामांतर होऊ देणार नाही, असे म्हणणारे सेनाप्रमुख अचानक रामदासप्रेमी कसे झाले? हे पिच कसे काय बदलले गेले? याचेही उत्तर सेनेने दिले असते तर बरे झाले असते. या मुलाखतीत ठाकरे असेही म्हणाले की, सचिन खिशातले काढून काही देत नाही. आपल्या बॅटचा, टी-शर्टचा लिलाव करून तो पैसे मिळवतो आणि ते तो दान करतो, असे त्यांचे म्हणणे आहे. सचिनने कसे पैसे द्यावेत आणि द्यावेत की नाही, हा त्याचा प्रश्न झाला, पण सेनाप्रमुखांना जवळच्या असणाऱ्या लतादीदी मंगेशकर तरी काय आपल्या पदरचे पैसे देतात काय? आपल्या वडिलांच्या नावे रुग्णालय उभारण्यासाठी त्यांनी गाणे म्हणूनच पैसे कमावले. तेव्हा त्यांची कृती ही दानशूरतेची आहे, असे म्हणावे काय? इतरांना पिच सोडू नये, असा सल्ला दिल्यामुळे हे मुद्दे उपस्थित झाले, इतकेच.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment