Thursday, May 5, 2011

जिगरबाज मुलीवर पुरोहितांचे शिंतोडे

खालील लेख म टा च्या सौजन्याने .........




तांब्यात लघुशंका करणा-या ठाण्यातील पाणीपुरीवाल्याचे शुटिंग करून खळबळ उडवून देणा-या अंकिता राणे या जिगरबाज मुलीचे कौतुक करायचे सोडून, मुंबई भाजपचे अध्यक्ष राज पुरोहित यांनी तिच्या चारित्र्यावरच शिंतोडे उडवले आहेत. हे करताना तिला शरम नाही का वाटली, असा सवाल करून फेरीवाल्यांच्या टाळ्या मिळवणा-या पुरोहित यांच्या बेतालपणावर मनसेने जोरदार हल्ला चढवला आहे.

मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या फेरीवाल्यांच्या सभेत राज पुरोहित यांनी अकलेचे तारे तोडले. ठाण्यातील पाणीपुरीवाल्याच्या घटनेचा संदर्भ देत ते म्हणाले, की' चांगली मुलगी एवढ्या मोठ्या माणसाला लघुशंका करताना पाहिल का ? या मुलीने नुसते पाहिले नाही, तर त्याचे शुटिंगही केले. हे करताना तिला शरम नाही का वाटली? यावरूनच तिच्या चारित्र्याची कल्पना येते. हे शुटिंग म्हणजे मुंबईत मेहनत करणा-यांविरुद्धचा डाव आहे. '

ठाण्यातील पाणीपुरीवाल्या भय्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर केवळ शहरातच नव्हे, तर देशभर पाणीपुरीवाल्यांविरोधात वातावरण तयार झाले. त्यांच्या स्वच्छतेविषयी चर्चा होऊ लागली. मनसेसारख्या राजकीय पक्षांनी तर त्याविरोधात आंदोलनही उभारले. पण मुंबईत असलेले बहुसंख्य पाणीपुरीवाले हे उत्तर भारतीय असल्याने, त्याचा राजकीय फायदा घेण्यासाठीही प्रयत्न सुरू झाला.

काँग्रेसचे खासदार संजय निरुपम यांनी तर पाणीपुरीवाल्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली. त्यांनी असे केल्यानंतर भाजपने आपली पोळी भाजून घेण्यासाठी पुढले पाऊल उचलले आणि थेट अंकिता राणेच्या चारित्र्यावरच हल्ला केला. भर सभेत राज पुरोहित यांनी केलेल्या या हल्ल्यामुळे पाणीपुरीवाल्यांच्या टाळ्या पडल्या असल्या तरी मनसेने मात्र अंकिताची बाजू उचलून धरत, पुरोहित यांच्याविरूद्ध लाखोल्या व्हायला सुरुवात केली आहे.

अंकिता राणे हिनेही पुरोहित यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला असून, त्याविरोधात तक्रारही नोंदवली आहे. भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाच्या मुंबई अध्यक्षाने असे बोलावे हा प्रकार निंदनीय असून, त्याबद्दल पुरोहित यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणीही तिने केली आहे.

मनसेच्या महिला विभागाच्या अध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी तर पुरोहित यांना तात्काळ अटक करा अशी मागणी केली आहे. त्या म्हणाल्या, की आज एकीकडे या देशात स्त्रियांना राजकीय आरक्षण दिलं जात आहे , तर दुसरीकडे राज पुरोहित यांच्यासारखे राजकीय नेते स्त्रियांच्या अब्रूचे धिंडवडे काढत आहेत. पुरोहित यांची वक्तव्ये सर्वच महिलांना संतापजनक वाटत असून त्यांना त्यांच्या या गुन्ह्यासाठी तत्काळ अटक व्हायलाच हवी.

1 comment:

  1. जिगरबाज मुलीवर पुरोहितांचे शिंतोडे. पाणीपुरीच्या प्रकरणावरून हे प्रकरण वाटते तेव्हडे सोप्पे नाही. यात हातगाडीवरील छोट्या भारतीय उद्योगाचे खच्चीकरण करण्याचा बर्गर,पिझ्झा विकणाऱ्या साखळी उद्योगाचा हात आहे असू शकतो. या गाड्यावर खाल्ल्याने कोणी दगावल्याचे आजारी पडल्याचे उदाहरण नाही. हा स्वच्छतेचे नियम आपण कडक करू शकतो. ज्या विभागात गाडा उभा असतो तेथील रहिवाश्यांचे गाडी मालकाने सहकार्य घेवून त्यांना स्वच्छतेची हमी द्यावी. कारण सामान्य माणसास एव्हढ्या कमी किमतीत कोणी बहुराष्ट्रीय कंपनी खाऊ घालणार नाही.
    भारतीय लहान उद्योगांना नेस्तनामूद करण्याचे कारस्थान नेहमीच चालू असते. आणि दुर्देवाने आपण ही परकीय ते चांगल आपल ते वाईट खराब असाच विचार करून या कटास बळी पडतो. भारतीय खाद्य पदार्थाचे वैशिष्ट्य म्हणजे हाताची चव वेगळी . परकीय खाद्य पदार्था प्रमाणे निव्वळ एकाच चवीचे मशीन मधून काढलेल्या पदार्था प्रमाणे ते बेचव नसतात.

    ReplyDelete