Monday, November 15, 2010

विकासाच्या त्रिशंकूवरील पारदर्शक चेहरे!

खालील लेख लोकसत्ताच्या ठाणे वृतांत मधून घेतला आहे ......



भगवान मंडलिक - रविवार, १४ नोव्हेंबर २०१०
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त रामनाथ सोनवणे, नवनिर्वाचित महापौर वैजयंती घोलप-गुजर आणि मनसेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, या तिन्हींचे चेहरे सरळमार्गी, प्रामाणिक, जनतेचा विश्वास असलेले आहेत. आयुक्त सोनवणे हे पालिकेत उपायुक्त असताना त्यांनी एक प्रशासक म्हणून बजावलेली भूमिका अद्याप कल्याण- डोंबिवलीतील जनतेच्या स्मरणात आहे.
त्यावेळच्या पांढऱ्याशुभ्र सफारीप्रमाणे आयुक्त सोनवणे यांचे वागणे, बोलणे असे आणि आताही ते त्याच धर्तीचे आहे. त्यामुळे विकासाची किरणे जनतेला गेले दोन महिन्यांपासून दिसू लागली आहेत. आतापर्यंत शासनाकडून येणारा कोणताही प्रशासक हा तीन वर्षांंनंतर आपल्याला येथून बाजारबिस्तार गुंडाळून जायचे आहे, अशा विचाराने येऊन कारभार करीत असे. तशाच पद्धतीचा कारभार यू. पी. एस. मदान, टी. चंद्रशेखर, श्रीकांत सिंग वगळले तर आतापर्यंत कल्याण-डोंबिवली पालिकेच्या प्रशासनात झाला. शहराशी घट्ट नाळ असलेला, या शहराचे काही भले करावे असा विचार करून फार थोडय़ा आयुक्तांनी येथे कारभार केला, त्यामुळे पालिकेत आयुक्त कोणीही येवो, आमचे काय भले होणार आहे, अशीची भूमिका येथील १२ लाख जनतेने आतापर्यंत ठेवली.
पण, रामनाथ सोनवणे यांनी पालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार गेले दोन महिन्यांपूर्वी हाती घेतल्यानंतर मी प्रथम या शहराचा एक नागरिक आहे. नंतर आयुक्त अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे शहरातील प्रत्येक नागरिक आपल्या घरातला, गावातला माणूस आयुक्तपदी आला आहे म्हणून सोनवणे यांच्या कार्यपद्धतीकडे पाहू लागला आहे. आतापर्यंत डॉक्टर, वकील, ज्येष्ठ पत्रकार, शहरातील विविध स्तरांतील जाणकार शक्यतो आयुक्तांना भेटण्याच्या फंदात कधी पडत नसत. सोनवणे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या व्यवसायातला वेळ काढून अनेक जाणकारांनी आयुक्तांच्या भेटी घेऊन तुमच्याकडून आम्हाला विकासाच्या अपेक्षा आहेत, असे सांगून त्यांना पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या, ही सोनवणे यांच्या उज्ज्वल कारकीर्दीची एक चमकती झालर आहे. पालिकेत आल्यानंतर ज्या नेटक्या पद्धतीने, तंत्रशुद्ध पद्धतीचा अवलंब करून सोनवणे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने पालिका निवडणूक शांततेत पार पाडली, त्याचेही कौतुक जनता तोंडभरून करीत आहे. निवडणूक आयोगाने सोनवणे यांना शाब्बासकीचे प्रमाणपत्रच दिलेच आहे.
आतापर्यंत जनतेच्या मनात आयुक्तांना कसे भेटायचे, हा एक प्रश्न असायचा. कारण मधले चमचे या मार्गात अडथळे आणण्यात पटाईत असतात. साहेब मीटिंगमध्ये, साहेब मंत्रालयात गेले आहेत, असे सांगण्याची त्यांची खासियत असते. अर्थात आयुक्तांनी आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांना काय आदेश दिले आहेत, त्यावर त्या कार्यालयाची कामाची पद्धत ठरलेली असते. सोनवणे यांनी पदभार स्वीकारल्यापासून ते शहरातील प्रत्येक नागरिकाला भेट देत आहेत. मग ती नागरी समस्येची तक्रार असेल, प्रशासनाविषयी असेल, पण त्याचे निराकरण करण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. मोबाइल चोवीस तास सुरू असतो, केव्हाही मोबाइल करा, त्याला ते प्रतिसाद देतात, हा सकारात्मक विचार शहर विकासातील एक मैलाचा दगड आहे.
अर्थात सोनवणे हे प्रशासनाची आर्थिक बाजू पाहूनच शहर विकासासाठी प्रयत्नशील असणार आहेत. त्यांच्या मार्गात ज्या ‘काही’ नगरसेवकरूपी धोंड होत्या, त्या आता राजकारणातून कायमच्या बाद झाल्या आहेत. त्यामुळे तोही प्रश्न सुटला आहे. सोनवणे यांची ‘अ‍ॅलर्जी’ असलेली काही मंडळी आहेत ते येनकेनप्रकारेण त्यांना उपद्रव देण्याचा प्रयत्न करतील. या सर्व परिस्थितीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आपल्या शहराच्या विकासासाठी गावातल्या माणसाला कसे सहकार्य करायचे, हा विचार करून सोनवणे यांना सहकार्याचा हात दिला तर नक्कीच आतापर्यंत शहराची जी घाण यापूर्वीच्या काळात झाली, ती व्यवस्थित करून पुढील विकासाची कामे करण्यात सोनवणे नक्कीच यशस्वी होतील. फक्त त्यांना मिळणाऱ्या सहकार्याच्या हातावर हे सर्व अवलंबून आहे.
नवनिर्वाचित महापौर वैजयंती घोलप-गुजर या शहराच्या प्रथम नागरिक झाल्या आहेत. सुसंस्कारित, शिस्तप्रिय, सरळमार्गी, प्रामाणिक, प्रसंगी आक्रमक-एक घाव दोन तुकडे. भावनिक वातावरणात वावरल्याने वैजयंती घोलप या नक्कीच आपल्या पदाला न्याय देतील, अशी १२ लाख जनतेची भावना झाली आहे. विशेष म्हणजे घरचे जेवण, घरचेच उकळलेले पाणी. बाहेरच्या सर्व खानपानावर बहिष्कार. त्यामुळे बाई कायद्याबाहेर जाऊन वागतील असे होणे शक्य नाही. आतापर्यंत झालेल्या महिला महापौरांमधील एक जाण असलेल्या नगरसेविका म्हणून वैजयंती यांची ओळख आहे. त्यांनी पालिकेत मानाची पदे उपभोगली आहेत, पण कधी त्यांनी मिळालेल्या पदाशी प्रतारणा केलेली नाही. स्थायी समिती संपली की सदस्यांचा ओढा स्थायी समितीच्या अ‍ॅन्टी चेंबरकडे असतो. वैजयंती या एकमेव सदस्या आहेत की आपली पर्स आणि पिशवी सावरत लिफ्ट असूनही पायऱ्या उतरत त्या घरचा रस्ता धरत. स्थायी समितीतील अ‍ॅन्टी चेंबरमधील बजबजाटात त्यांनी स्वत:ला कधी गोवले नाही. त्यामुळे त्यांची एक स्वच्छ प्रतिमेच्या म्हणून ख्याती आहे. महासभेत नागरी समस्या, विरोधकांना नामोहरम करण्यासाठी त्या एकटय़ा सगळ्यांना पुरून उरत असत. त्यांचे तोंडाचे तोफगोळे सुरू झाले की घंटय़ा वाजून महापौर हैराण होत, सर्व विरोधकांचे घसे कोरडे पडले तरी चालतील, पण त्या एकटय़ा समोरच्या व्यक्तीला खिंडीत गाठून सुपडासाफ करीत असत. पक्षीय गटातटाचा चांगल्या नगरसेवकांना नेहमीच त्रास होतो, तसा तो वैजयंती यांनाही झाला. पण स्वत:ची प्रतिमा स्वच्छ असल्याने त्या आलेल्या परिस्थितीवर मात करू शकल्या. स्वत:च्या प्रभागाला त्यांनी आदर्श केलेच आहे. नागरी विकासाची अनेक कामे त्यांनी केली आहेत. शहर विकासाच्या विषयावर त्या नेहमीच आक्रमक असत. पालिकेत विकासकामांची कोणी, कशी ऐशी की तैशी केली याची जाणीव महापौरांना आहे. त्यामुळे ठेकेदार, बिल्डर, आर्किटेक्ट लॉबीतील गैरकामे करण्यात अग्रेसर असलेल्यांना त्या पालिकेत किती थारा देतात, हाही प्रश्नच आहे. उद्धव ठाकरे यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे, असे सांगून त्यांनी आपली विकासाची पायवाट मोकळी करून ठेवली आहे. या वाटेवर आता कोण किती काटे पेरतंय आणि त्या मार्गावरून वैजयंतीताई कशा माग काढत पुढे जातात ते पाहायचे आहे.
पालिकेत प्रथमच आलेला एक नवखा चेहरा म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे २७ नगरसेवक. मिसरूट पण न फुटलेले, कोवळे, सुशिक्षित नवखे चेहरे मनसेतून निवडून आलेले आहेत. ही सगळी मंडळी उच्चशिक्षित आहेत. त्यामुळे शहर विकासाचा एक नवा दृष्टिकोन या मंडळींच्यासमोर आहे. आतापर्यंत सर्वपक्षीयांमधील रिकाम्या डोक्याचे तेच तेच आडदांड निवडून येत, त्यामुळे विकासापेक्षा तिजोरी ओरपणे हा एकमेव दृष्टिकोन या मंडळींसमोर असे. मनसेच्या पदार्पणामुळे या ओरपण्याला आवर बसण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांची प्रतिमा, शहर विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून जनतेने मनसेला भरभरून मतदान केले आहे, याची जाणीव मनसेच्या नेत्यांना आहे. त्यामुळे त्यांचे नगरसेवक पालिकेतील कोणत्याही चिरीमिरीत सहभागी होणार नाहीत, अशी अपेक्षा जनतेला आहे. पालिकेतील आतापर्यंत चाललेल्या गैरप्रकारांची नरडी येथेच आवळली जाणार असल्याने विकासाची खरी गंगा येथून वाहण्यास सुरुवात होणार आहे. प्रबळ विरोधी पक्ष म्हणून आतापर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने युतीचा मित्र म्हणण्यापेक्षा पोटातला पक्ष म्हणून भूमिका निभावली. विकासकामांची पुरती वाट लावली. या खाबूगिरीला मनसेच्या आगमनाने नक्कीच वेसण लागणार आहे. जोडतोड करून सत्तेत जाऊन बसण्यापेक्षा विरोधी बाकावर बसून सत्ताधाऱ्यांच्या उरावर बसून विकासकामे करून दाखवू, हा मनसेचा आता तरी बाणा आहे. त्यामुळे एक दूरदृष्टी घेऊन मनसे पालिकेत सक्रीय झाला आहे. पाहूया त्यांची विकासाची दूरदृष्टी जनतेला काय आणि किती देते.
आयुक्त, महापौर आणि मनसे असे हे विकासाचे तीन मानबिंदू, पारदर्शक चेहरे जनतेसमोर आहेत. अर्थात या तिन्हींचे केंद्रबिंदू तीन ठिकाणी आहेत. शहर विकासासाठी हे तिन्ही केंद्रबिंदू एकमेकांना कोणत्या परीघ रेषेतून जोडले जातात ते आता पाहात बसायचे.

No comments:

Post a Comment