Monday, November 8, 2010

कडोंमपाःमनसे विरोधी पक्षच राहील!

म टा च्या सौजन्याने


महापौर मनसेचाच होईल अशी निवडणुक पूर्व सभांमध्ये गर्जना करणा-या राज ठाकरे यांनी मतदारांच्या त्रिशंकू प्रतिसादानंतर मात्र विरोधी पक्ष म्हणूनच काम करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे शिवसेनेचा महापौर होण्याची शक्यता वाढली आहे.

बहुचर्चित कल्याण-डोंबिवली महानगर पालिका निवडणुकीत मनसे पूर्ण शक्तीनिशी मैदानात उतरली होती. या निवडणुकीत मनसेने जोरदार मुसंडी मारत २७ जागांवर कब्जा केला. शिवसेनेला सर्वाधिक ३१ जागा मिळाल्या तर भाजपला केवळ ९ जागांवर समाधान मानावं लागलं. काँग्रेसला १५ तर राष्ट्रवादी काँग्रेसला १४ जागा मिळाल्या आहेत.

मतदारांनी दिलेल्या निर्णयाचा मी आदर करतो. महापौर मनसेचा व्हावा असं मला जरूर वाटत होतं पण सध्याच्या समीकरणानुसार ते शक्य नाही. केवळ आमचा महापौर व्हावा यासाठी कोणालाही पाठिंबा देणार नाही. त्याऐवजी आम्ही विरोधी बाकांवर बसणे पसंत करू हे स्पष्ट करताना राज ठाकरे यांनी ,मी सत्तापिपासू नाही असे सांगितले. ही निवडणूक शेवटची नाही असंही त्यांनी पुढे सांगितलं.

मनसेचा महापौर आता होणार नसल्याने तुम्ही कोणाला पाठिंबा देणार का ? या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, तो माझा मुद्दा नाही. आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करणार असल्याने कोणालाही पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आता महापौर कोणत्याही पक्षाचे होऊ दे, असे राज म्हणाले.

मतदारांनी दिलेल्या प्रतिसादानंतर समोर आलेली आकडेवारी कुणी बदलू शकतं का ?असा सवालही त्यांनी केला. पण विरोधी पक्ष म्हणून माझा अंकुश असेल, शहराच्या विकासासाठी मी शहरात येत राहिन, शहराच्या विकासाच्या दृष्टीने मी कायम प्रयत्नशील असेल असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान निवडणुकीत अपक्ष म्हणून विजयी झालेले प्रकाश भोईर मनसेत दाखल झाल्याने, मनसेच्या नगरसेवकांची संख्या २८ झाली आहे.

No comments:

Post a Comment