Wednesday, October 27, 2010

‘ठाकरे वॉर’ नाही, लक्ष ‘कल्याण’वरः राज ठाकरे

म टा च्या सौजन्याने .............................



मी बाळासाहेबांच्या अंगाखांद्यांवर खेळलो हे मी अमान्य करीत नाही. परंतु, उद्धव ठाकरे यांच्या निवडीला आता ८-९ वर्षे झाली आहेत. त्यामुळे तोच विषय पुन्हा पुन्हा उगळून काही मिळणार नाही. माझे लक्ष कोणावर टीका करणं नसून कल्याण डोंबिवलीत झालेल्या बजबजपुरीवर केंद्रीत असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज स्पष्ट केले.

बाळासाहेबांबद्दल मला आदर आहे, माझ्या काय भावना आहे त्या मी वेळोवेळी सांगितल्या आहेत. त्यामुळे पुन्हा पुन्हा सांगण्याची मला गरज वाटत नाही. डोंबिवलीच्या सभेत बाळासाहेबांच्या विषयावर १५ मिनिटे बोललो आणि कल्याण डोंबिवलीच्या विकासासंदर्भात अधिक बोललो. परंतु, प्रसारमाध्यामांनी दुस-या दिवशी ठाकरे विरुध्द ठाकरे, ठाकरे वॉर असे चित्र रंगविले. मला त्यात रस नाही. कल्याण डोंबिवलीत झालेली बजबजपुरी दूर करायची, असल्याने त्यावरच मी लक्ष केंद्रीत केले आहे, असल्याचे त्यांनी आपल्या पक्षाचा वचकनामा प्रकाशित करताना सांगितले.

डोंबिवलीत झालेल्या सभेत मी शिवसेनेतील काही व्यक्तींनाच करवंटे आणि वरवंटे म्हटलो होतो. सर्व शिवसैनिकांना उद्देशून बोललो नव्हतो. शिवसैनिकांबद्दल एवढचे वाटत होते तर माय नेम इज खान प्रकरणात शिवसैनिकांना बडवल्यानंतर बाळासाहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी जाहिरात का घेतली. कारण ती जाहिरात आली नव्हती मागितली होती. जाहिरात आली असल्यास ती नाकारण्याचा अधिकार तुम्हाला नाही, असे म्हणून आपल्या ठाकरे शैली त्यांनी शिवसेनेच्या धोरणांचा पुन्हा एकदा समाचार घेतला.

विधानसभा निवडणुकीत मराठी माणसाने पाठीत खंजीर खुपसला असे म्हणत होता तुम्ही, तर पुन्हा मराठी माणसाकडे मत मागायला का आलात, असा सवालही राज ठाकरे यांनी यावेळी केला.

महाबळेश्वर येथे झालेल्या शिवसेनेच्या अधिवेशनाची चित्रफित दाखवून काय होणार आहे. ती काय अॅडल्ट फिल्म आहे का ? जे झालं ते झालं. मी बोललो तर बोललो. त्यात वेगळे काय दाखवणार आहेत, ते. समजा मी हा निर्णय घेतला. तर तो योग्य की अयोग्य हे ठरविण्याचे अधिकार पक्षाचे मालक म्हणून तुम्हांला आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कल्याण-डोंबिवलीकरांनी माझ्याकडे सत्ता द्यायची असल्यास ती पूर्ण द्यावी, अर्धवट सत्ता देऊ नये.,अशा सत्तेला काही अर्थही नसतो. काही चुकलं तर त्याला सर्वस्वी मला जबाबदार धरा, असेही त्यांनी सांगितले.

कल्याण डोंबिवलीत जर मनसेची सत्ता आली तर १५ दिवसातून ३-४ दिवस येथे थांबून विकास कसा केला जातो हे दाखवून देईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

मनसेचा 'वचकनामा' आज

म टा च्या सौजन्याने


म. टा. प्रतिनिधी ठाणे

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना -भाजप युतीचा वचननामा आणि काँगेस - राष्ट्रवादी काँगेस आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर आता बुधवारी राज ठाकरे मनसेचा वचकनामा प्रसिद्ध करणार आहेत. उमेदवारांच्या मुलाखती आणि त्यांची यादी डोंबिवलीत स्वत: येऊन जाहीर करणारे राज ठाकरे पक्षाचा वचकनामादेखील डोंबिवलीतच प्रसिद्ध करतील असे समजते.

कल्याण-डोंबिवली महापालिकेत निवडून जाणाऱ्या मनसेच्या नगरसेवकांवर स्वत: राज ठाकरे अंकुश ठेवणार आहेत. त्यांच्या कामकाजावर आपला वचक राहील व जनतेच्या नगरसेवकांकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण होतील, असा राज ठाकरे यांचा दावा आहे. सोमवारी डोंबिवलीत झालेल्या जाहीर सभेतच पालिकेच्या निवडणुकीसाठी पक्षाचा वचकनामा बुधवारी जाहीर करण्याची घोषणा त्यांनी केली होती. राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांच्या पूर्ततेबाबत कल्याण- डोंबिवलीकरांचा अनुभव फारसा चांगला नाही. युती व आघाडीने आतापर्यंत जाहीरनाम्यातील निम्म्याही कलमांची पूर्तता केली नसल्याने जाहीरनामे केवळ फार्स म्हणून जाहीर होतात की काय, असा सवाल कल्याण-डोंबिवलीकरांकडून केला जात आहे. त्यामुळे मनसेच्या वचकनाम्यात नेमक्या कोणत्या आश्वासनांचा समावेश ठाकरे करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्वीमिंग पूल कोरडाच!

म टा च्या सौजन्याने

वाचा कल्याण डोंबिवलीतील रखडलेली कामं ......................................


आशिष पाठक

कल्याण-डोंबिवलीकरांचा विचार करून पालिकेने कल्याणमध्ये हाती घेतलेल्या स्वीमिंग पूलचे काम गेल्या १४ वर्षांपासून रखडले असून दुसरा पूलही अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे अर्धवट स्वीमिंग पूलसाठी लोकप्रतिनिधींना महापालिकेत पाठवले होते का, असा सवाल रहिवासी करीत आहेत.

पायाभूत सुविधा देत असताना पालिकेने रहिवाशांच्या मनोरंजनाची साधनेही उभारली पाहिजेत, अशी दूरदृष्टी असणारे टी. चंदशेखर प्रशासक असताना त्यांनी आधारवाडी येथे एक सुसज्ज पार्क उभारण्याचा निर्णय घेतला. यामध्ये स्वीमिंग पूल, वॉटर पार्क आणि गोल्फ क्लबचा समावेश होता. त्या दरम्यान पालिकेची निवडणूक जाहीर झाली होती. प्रकल्पाचे श्रेय राजकीय नेत्यांना मिळावे यासाठी चंदशेखर यांनी प्रकल्पाच्या मंजुरीचा विषय एक महिन्यासाठी प्रलंबित ठेवला.

लोकप्रतिनिधींची राजवट आल्यावर पहिल्याच सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी हे श्रीमंतांचे खेळ कोणाला परवडणार?, असा सवाल करत हा प्रस्ताव फेटाळून लावला. हा प्रकल्प झाला असता तर १९९६ मध्येच मुंबईच्या तोडीस तोड पार्क कल्याणमध्ये उभे राहिले असते. परंतु व्हिजन नसलेल्या लोकप्रतिनिधींमुळे हा प्रकल्प बारगळला. सन १९९९ मध्ये पालिकेने डावजे तलावाचे सुशोभिकरण व स्वीमिंग पूलचा प्रकल्प खासगीकरणातून हाती घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते वाजतगाजत या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. पण आजदेखील स्वीमिंग पूल व तलाव सुशोभिकरण निम्मेदेखील झालेले नाही. आश्चर्य म्हणजे महापालिका सहकार्य करत नसल्याने प्रकल्पाच्या कॉण्ट्रॅक्टरने पालिकेविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली. पण तरीसुध्दा हा प्रकल्प मागीर् लागावा म्हणून एकाही नगरसेवकाने गेल्या १५ वर्षांत प्रयत्न केला नाही.

दुसरा स्वीमिंग पूल पालिकेने आधारवाडी येथील कल्याण स्पोर्ट्स क्लब येथे हाती घेतला. ४ वर्षांपूवीर् टेण्डर झाल्यावर कॉण्ट्रॅक्टरला 'वर्क ऑर्डर' देण्यात आली. पण प्रकल्पाचा आराखडा मंजूर करण्यास पालिकेने साडेतीन वषेर् घालविली. इतकी वर्ष प्रकल्पाचा आराखडा मंजूर का होत नाही याकडे एकाही पालिका पदाधिकाऱ्याने लक्ष दिले नाही. कामाला प्रारंभ होण्याआधीच कॉण्ट्रॅक्टरला प्रकल्प २० ऐवजी ६० वर्षांसाठी देण्याचा ठराव करून नगरसेवक मोकळे झाले. या मेहेरनजरीचे कारण सर्वसामान्य मतदार आता समजून चुकले आहेत.

नार्कत्या सत्ताधाऱ्यांमुळे कल्याण-डोंबिवलीचा विकास खुंटल्याचे दिसून येते. जी महापालिका रस्ते, पाणी आणि स्वच्छता देऊ शकत नाही, ती स्वबळावर स्वीमिंग पूल उभारेल यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. पण हा समज खोटा ठरवत पालिकेने स्वत:च्या निधीतून डोंबिवलीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा पूल उभारला. पण कल्याणमध्ये खासगीकरणातून तसे करणे पालिकेला जमले नाही. यासाठी प्रशासनासह निष्क्रीय लोकप्रतिनिधीदेखील तितकेच जबाबदार आहेत.

शिमगा !!!

माननीय मोठे साहेब, तुम्ही शिमगा कराच .... अर्ध्या चड्डीतल्या पोरानां देखील माहित आहे खरं काय नि खोटं काय.


Monday, October 25, 2010

मतदार मागताहेत पेव्हरचा 'फेव्हर'

म टा च्या सौजन्याने .....

काय चाललाय काय कल्याण डोम्बिवली मध्ये? आता तर सुशिक्षित लोकं देखील मत देण्याकरिता अश्या मागण्या करत असतील (माझ्या माहिती प्रमाणे करतात ) तर आपल्या शहराच दिवाळं निघणार नाही तर काय होणार?


25 Oct 2010, 0339 hrs IST
विश्वास पुरोहित

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वसामान्य मतदारांना आकषिर्त करण्यासाठी मोबाइल, पैसे आदींचे वाटप चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये चोरीछुपे सुरू आहे. मात्र, शहरातील सुशिक्षित मतदाराचा कल पैसे घेण्याकडे नसला तरी उमेदवारांकडून सोसायट्यांमध्ये 'पेव्हर ब्लॉक' किंवा लाद्या बसविण्याची मागणी करताना हे मतदार दिसत आहेत.

'सोसायटीच्या आवारात पेव्हर ब्लॉक बसवून द्या, नाही तर लाद्या तरी लावा', अशी मागणी डोंबिवली पश्चिमेच्या एका सोसायटीतील रहिवाशांनी उमेदवारांना केली होती. या सोसायटीचा परिसर मोठा असल्याने त्या उमेवाराने पेव्हर ब्लॉक बसविण्यास असमर्थता दर्शवली. मात्र दुसऱ्या उमेदवाराने ही अट मान्य केली. त्यामुळे आम्ही आता तुम्हालाच मत देणार असे आश्वासन या सोसायटीतल्या मतदारांनी या उमेदवाराला दिल्याचे समजते.

नगरसेवकाचा निधी हा खासगी कामांमध्ये वापरता येत नाही, असा नियम आहे. समोरचा उमेदवाराचा खिसा जड असेल तर तो अशा अटी मान्य करतो. पण सर्वसामान्य उमेदवाराची अशा प्रकारात कुचंबणा होत आहे. सुशिक्षित म्हणवणाऱ्या सोसायट्यांमधून अशा मागण्या वाढल्याचे उमेवारही खासगीत मान्य करतात. तर एरवी जनतेला लुबाडणारे लोकप्रतिनिधी पुन्हा आमच्या दारात कधीही येणार नाही. त्यामुळे त्यांच्याकडून आता कामे करून घेतली तर त्यात गैर काय, असा सवालही अनेक जण उपस्थित करत आहेत.

कल्याण-डोंबिवलीत खड्डेमय रस्तेे, आरोग्य सुविधांचा अभाव, अपुरी मैदाने, प्रदूषण अशा समस्यांच्या विळखात मतदार सापडला आहे. अद्याप एकाही उमेवाराने अशा समस्यांवर तोंड उघडले नाही आणि मतदारही या समस्यांऐवजी खासगी सागण्या मान्य करून घेत आहेत. शहराची दुरवस्था झाली तरी चालेल पण सोसायटी मात्र चांगली व्हायला हवी, असा मतदारांचा दृष्टिकोन झाला आहे.

वर्षभराची केबल मोफत

उमेदवार केबल चालक असेल तर त्याच्याकडून सहा महिन्याचे किंवा वर्षभरचे प्रक्षेपण मोफत घेऊन त्याला पाठिंबा देण्याची तयारी मतदार करीत आहेत. काही सोसायट्यांनी तर त्यांचे रखडलेले 'कन्व्हेअन्स डीड' देखील उमेवारांच्या पैशांतून करून घेण्याचे ठरविले आहे.

कल्याणचे शिवस्मारक कागदावरच!

म टा च्या सौजन्याने ..................................


25 Oct 2010, 0635 hrs IST
म.टा. प्रतिनिधी


छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांना कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्ता उपभोगण्याची संधी मिळाली. मात्र सत्तेची फळे चाखण्यातच दंग राहिलेल्या या आधुनिक मावळ्यांना मागील ५ वर्षांत छत्रपतींच्या आरमाराचे स्मारक उभारण्याची एकदाही आठवण झाली नाही. उगवत्या पिढीला महाराजांची दूरदृष्टी आणि मुत्सद्देगिरीपासून प्रेरणा मिळावी यासाठी आरमाराचे स्मारक होणे आवश्यक होते. पण ज्यांना महाराजांचा विसर पडला त्यांना शहरातील भावी पिढीचा विचार असेल, अशी अपेक्षाच बाळगणे चुकीचे.

कल्याण शहराला प्राचीन वारसा आहे. स्वराज्याच्या स्थापनेच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य काही काळ कल्याणमध्ये झाले होते. दुर्गाडी किल्ल्याची बांधणी करताना महाराजांना तिथे अमाप धन मिळाले, अशी वदंता आहे. मराठा सैन्याला मैदानी लढाईत शत्रू पराभूत करू शकत नाहीत, हे महाराजांना ठाऊक होते. मात्र स्वराज्याला खरा धोका होता समुदमागेर् येणाऱ्या शत्रूंचा. स्वराज्याचे रक्षण करायचे असेल तर सागरी आरमार आवश्यक आहे, हे शिवाजी महाराजांनी त्याकाळी ओळखले व कल्याणच्या खाडीत स्वराज्याचे आरमार उभारले.

हा देदीप्यमान इतिहास कल्याणकरांच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. त्यामुळे पालिकेने ७ ते ८ वर्षांपूवीर् कल्याण खाडीकिनारी आरमाराचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला. मात्र या स्मारकाच्या आराखड्यावरून शिवसेना व भाजपमध्ये टोकाचे मतभेद झाले. वर्षभराचा वेळ या वादात घालविल्यावर अखेर शिवसेनेने ठरवलेल्या आराखड्याला मान्यता मिळाली.

पालिका निवडणुकीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी अनपेक्षितपणे सत्तेवर आली. या आघाडीच्या राजवटीत पालिकेत बिल्डरांचे राज्य होते. राष्ट्रवादी काँगेसच्या एका पदाधिकाऱ्याने बिल्डरांसाठी 'रेड कापेर्ट' अंथरले तर काँग्रेस नगरसेवक हे स्थायी समितीच्या निवडणुकांना व पालिकेच्या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांची स्थगिती मिळवण्यात व्यस्त राहिले. मात्र त्यांना एकदाही शिवस्मारक का रखडत आहे, याचा विचार करण्यास स्वारस्य वाटले नाही.

अडीच वर्षांनंतर शिवशाही अवतरली तेव्हा एनयूआरएमअंतर्गत कोट्यवधी रुपयांचा ओघ पालिकेत आला व युतीचे नगरसेवक टेण्डरमध्ये अधिक रस घेऊ लागले. पालिकेतील काही अधिकारी याच काळात भ्रष्टाचाराच्या पकडले गेले. शिवशाहीत महापौर कोणालाच जुमानत नव्हते. तर अडीच वषेर् उघड्या डोळ्याने भ्रष्टाचार पाहणारे व महासभांमध्ये त्याविरोधात तोंडही न उघडणारे उपमहापौर राजवटीच्या शेवटच्या टप्प्यात हायकोर्टात गेले. पण शिवस्मारकासाठी कोर्टाची पायरी चढण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही.

शिवस्मारक हा केवळ प्रकल्प नाही. ते कल्याणच्या इतिहासाचे प्रतीक आहे. पण त्याची जाणीव शिवसेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मावळ्यांना नाही. ज्यांनी ५ वषेर् शिवस्मारक व्हावे यासाठी काडीचे प्रयत्न केले नाहीत तेच आता निवडणुकीत शिवरायांची महती कल्याणकरांना सांगतील व पुन्हा मतांचा जोगवा मागतील. त्यांना शिवस्मारकाकडे केलेल्या दुर्लक्षाचा जाब विचारण्याची जबाबदारी मतदारांवर आहे.

Monday, October 18, 2010

घराणेशाहीचा विजय असो !!

खालील लेख हा सुहास फडकेंच्या म टा मधील ब्लॉग वरून घेतला आहे

हा लेख खालील लिंक वर देखील मिळू शकतो ....




सुहास फडके Monday October 18, 2010

गेली काही वर्षे, बाळासाहेब सतत, आमच्या पक्षात घराणेशाही नाही असे सांगत असतात. यावर कोणाचा विश्वास बसणार नाही हेही ते लक्षात घेत नाहीत. खुद्द आदित्य ठाकरे यांचा उदय हा घराणेशाहीचाच एक भाग मानला जाईल.


-शिवसेनेचा हुकुमाचा पत्ता बाळासाहेब ठाकरे हेच आहेत, हे विजयादशमीच्या मेळाव्यात पुन्हा सिद्ध झाले. बाळासाहेब येणार नव्हते तेव्हा त्यांच्या भाषणचा व्हिडिओ दाखवण्यात आणि ऐकवण्यात आला होता. अर्थात लाइव्ह बाळासाहेबांची सर त्याला नव्हती हेही खरे. बाळासाहेब नेहमीप्रमाणे बोलले. त्यांचे काही आवडते विषय असतात. त्यांच्यावर तोंडसुख घेतल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. गेली चार वर्षे यात राज ठाकरे यांची भर पडली आहे. आमच्या पक्षात घराणेशाही नाही असे सांगताना, कार्याध्यक्षपदासाठी उद्धव यांचे नाव राज ठाकरे यांनीच सुचवले होते, याकडे बाळासाहेबांनी लक्ष वेधले. महाबळेश्वरच्या ज्या अधिवेशनात राज यांनी हे नाव सुचवले तेव्हाच त्यांचे भवितव्य निश्चित झाले होते आणि राज यांनाही आपला भावी प्रवास कोणत्या दिशेने होणार हे कळून चुकले होते. ज्यांना राजकारणाची थोडीफार समज आहे त्यांना राज यांच्यावर नाव सुचवण्याची जबाबदारी टाकण्यामागची गोम बरोब्बर कळली होती.

गेली काही वर्षे, बाळासाहेब सतत, आमच्या पक्षात घराणेशाही नाही असे सांगत असतात. यावर कोणाचा विश्वास बसणार नाही हेही ते लक्षात घेत नाहीत. मुळात भारतात जवळपास सर्वच पक्षात मुलगा, सून, पत्नी वगैरेंची वर्णी लावली जाते. खुद्द शिवसेनेत, एकाच घरातील पती आणि पत्नी यांना निवडणुकीचे तिकीट मिळाल्याची उदाहरणे आहेत. वॉर्ड महिलांसाठी राखीव झाला म्हणून नगरसेवक पत्नीचे नाव घुसवतो. तेथे अनेक वर्षे काम करणा-या कार्यकर्त्यावर अन्याय होतो हे पक्षनेते लक्षातच घेत नाहीत. खुद्द आदित्य ठाकरे यांचा उदय हा घराणेशाहीचाच एक भाग मानला जाईल. त्यांचे नेतृत्व शिवसेनेतील अगदी ज्येष्ठ नेत्यांना मान्य आहे. म्हणून तर राज्यातील आणि केंद्रातील ज्येष्ठ पदे भूषवलेले नेते ते मुंबईच्या पहिल्या नागरिकांपर्यंत सर्व जण आदित्यच्या नावाचा आवर्जून उल्लेख करूनच भाषण सुरू करतात. घराणेशाही आहे म्हणून कोणत्या पक्षात बंड झाल्याचे ऐकिवात नाही. कारण बाकीचे नेते आणि कार्यकर्ते सर्वोच्च पद सोडून बाकीची पदे आपल्याला कशी मिळतील याच्या खटपटीत असतात. खरे म्हणजे शिवसेनेपुढे तातडीचे आव्हान आहे ते, संघटनेत वर्षानुवर्षे पदे अडवून बसलेल्यांना दूर करून तेथे नवीन रक्ताला कसे आणायचे हे!

गेली विधानसभा निवडणूक ही त्या दृष्टीने संधी होती, पण हायकमांडने ती गमावली. दादरमध्ये सदा सरवणकर यांनी बंड केल्यावर पक्षाचे काही वर्षे निष्ठेने काम करणा-या कार्यकर्त्याला पुढे आणता आले असते. पण तेथे आदेश बांदेकर या टीव्ही स्टारच्या ग्लॅमरला नेतृत्व भूलले आणि बांदेकर तिस-या सथानावर फेकले गेले. आणखी जेमतेम दोन आठवड्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक आहे. तेथेही तिकीट वाटपात काही कुटुंबांची मक्तेदारी दिसते. त्याऐवजी पंचविशीतील कार्यकर्ते निवडले असते तर तथाकथित धेंडांनी बंड केले असते पण तरुण पिढी मनसेकडून काही प्रमाणात आपल्याकडे वळवण्यात हायकमांडला यश आले असते.

आदित्य हे युवासेनेचे बॉस बनले आहेत. आता विद्यार्थी सेनेचे काय करणार? ती पण आदित्यच सांभाळणार काय? मुळात आदित्य हे शांत स्वभावाचे वाटतात. शिवसेनेचे आजपर्यंतचे जे स्वरूप जपले गेले आहे ते राखणे हेच त्यांना आव्हान आहे. मुळात महाराष्ट्रातील, मुंबईतील विद्यार्थ्यांपुढे इतक्या मोठ्या समस्या आहेत की त्यांना हात घालण्याचे धाडस आदित्य दाखवेल का? आदित्यने तो ज्या कॉलेजमध्ये शिकतो त्या सेंट झेवियर्समध्ये विद्यार्थ्यांचे नेतृत्व केले नाही. तेथील मराठी वाङ्मय मंडळाशी तो फटकून वागला. आपण मराठी मुलांत वावरतो हे कदाचित त्याला दाखवायचे नसेल. बाळासाहेबांनीच खुद्द आदित्यचा धाकटा भाऊ तेजस याचे शिवतीर्थावर तोंड भरुन कौतुक केले. तो माझ्यासारखा आहे, या त्यांच्या उद्गारातच सारे काही भरलेले आहे. तेव्हा शिवसेनेत घराणेशाही नाही असे म्हणत तेजसचे स्वागत करण्यास तयार व्हा, हाच या मेळाव्याचा संदेश आहे.


Thursday, October 14, 2010

कल्याण-डोंबिवलीत 'बंड' गार्डन!

खालील बातमी म टा मधून घेतली आहे .....................



कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सर्वपक्षीय बंडाळीला ऊत आला आणि अधिकृत उमेदवारांच्या तुलनेत बंडखोरांची संख्या जास्त झाली. शिवसेनेत बंडखोरी अधिक असून या बंडोबांना शांत करण्याचे आव्हान सेना नेतृत्वासमोर उभे ठाकले आहे. मनसेने कल्याणमध्ये अधिकृत उमेदवाराचे तिकीट कापून दुसऱ्याच इच्छुकाला उमेदवारी दिली तर राष्ट्रवादी काँगेसतफेर् काळा तलाव येथून दोन जणांनी आपणच अधिकृत उमेदवार असल्याचा दावा केल्याने नेमके अधिकृत कोण, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

शिवसेनेतफेर् डोंबिवलीतील महाराष्ट्र नगर येथून स्थायी समितीचे अध्यक्ष वामन म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात डोंबिवली पश्चिमेला दबदबा असणारे नगरसेवक प्रकाश भोईर यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज भरला. तसेच त्यांच्या पत्नी सरोज भोईर यांनीही सेनेच्या अधिकृत उमेदवाराविरोधात अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. तानाजी मालुसरे व संतोष चव्हाण आदी शिवसैनिकांनीही बंडाचा झेंडा फडकावत येथूनच उमेदवारी भरली.

पेंडसेनगर वॉर्डात भाजपचे उमेदवार राहुल दामले यांच्याविरोधात शिवसेनेचे उपविभागप्रमुख राजीव अंधारी यांनी बंड पुकारले आहे. तसेच काँग्रेस नगरसेविका छाया राऊळ यांना डावलण्यात आल्याने त्यांनी जुनी डोंबिवली येथून बंडखोरी केली. शिवसेनेच्या नगरसेविका मनिषा धुरी यांनी तिकीट न मिळाल्याने सेना उमेदवाराचा प्रचार न करण्याचा निर्णय जाहीर केला. त्या अपक्ष म्हणून मैदानात उतरल्या आहेत. प्रसाद सोसायटी वॉर्डात शिवसेनेच्या निलिमा भोईर यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवार कविता म्हात्रे यांच्याविरोधात अर्ज भरला.

कल्याणमध्ये शिवसेनेचे शाखाप्रमुख बाळा परब यांनी सुभाष चौकात अपक्ष अर्ज भरला. तर काळा तलाव येथे प्रतिभा ठोके या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार असल्या तरी वैशाली पाटील यांनी आपणही पक्षाच्या अधिकृत उमेदवार असल्याचा दावा केल्याने गोंधळ निर्माण झाला. पारनाका येथून सुचिता करमरकर यांनी रिंगण गाठले असून त्यांनी बुधवारी समर्थकांसह उमेदवारी भरली. मनसेच्या यादीत कोकण वसाहत येथे अमित वाघमारे यांचे नाव राज ठाकरे यांनी जाहीर केले होते. मात्र आता त्यांचा पत्ता कापून तिथे पवन भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मोहोने येथे उपशहरसंघटक उल्हास जामदार आणि अनिल गोवळकर यांनी अपक्ष म्हणून दंड थोपटले आहेत. तेथून माजी परिवहन अध्यक्ष विजय काटकर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. कल्याणमधील कोळसेवाडी येथून काँग्रेसतफेर् सचिन पालशेतकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु आयत्या वेळी त्यांचा पत्ता कापून उदय रसाळ यांना मैदानात उतरवण्यात आले.

संगीता भोईर यांचा राजकारणाला रामराम

नवागाव आनंदनगर वॉर्डाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका संगीता भोईर यांचे नाव जाहीर झाले होते. मात्र त्यांना मोठागाव ठाकुलीर् वॉर्डाचा एबी फॉर्म देण्यात आला. साहजिकच त्यांनी तो नाकारला व राजकारणातूनच निवृत्ती जाहीर करत समाजसेवा करणार असल्याचे जाहीर केले. मात्र पक्षाने आपल्यावर अन्याय केल्याचा आरोप त्यांनी केला.
..................

मनसेचे ७ उमेदवार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुधवारी उर्वरित ७ उमेदवार जाहीर केले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी १०० उमेदवार घोषित केले होते. पक्षातफेर् रघुवीरनगरातून शीतल लोके, कोपर रोड येथून पल्लवी कोट, मोठागाव ठाकुलीर् येथून सुप्रिया पालांडे, ठाणकरपाडा येथून अनिल कपेर्, कणिर्क रोड वॉर्डात संदेश देसाई, आनंदवाडीत संजीवनी नागरे आणि मंगल राघोनगर येथून संगीता गायकवाड यांना उमेदवारी मिळाली आहे. डोंबिवलीतील शाखाध्यक्ष राजेश अरुण कदम यांनी आथिर्क कारणामुळे कान्होजी जेधे मैदानातून निवडणूक लढण्यास नकार दिला होता. त्यामुळे तेथून डॉ. दिनेश ठक्कर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालण्यात आली आहे.
...................

अभूतपूर्व उमेदवारी

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत १०७ वॉर्डांसाठी ८२७ उमेदवार रिंगणात उतरले असून त्यांनी ९४३ अर्ज दाखल झाल्याची माहिती पालिका आयुक्त रामनाथ सोनावणे यांनी दिली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी तब्बल ५७३ उमेदवारांनी ६४८ अर्ज भरले. त्यामुळे प्रत्येक वॉर्डात सरासरी ९ उमेदवार नगरसेवकपदासाठी मतदारांना कौल लावतील.



डोंबिवलीत शिवसेनेला हादरा!

खालील बातमी म टा च्या सौजन्याने ...........................


इच्छुक उमेदवारांकडून तिकिटासाठी होणारे ब्लॅकमेलिंग आणि नगरसेविका मधुमती शिसोदे यांच्या मनमानीपणाला कंटाळल्याचा आरोप करीत शिवसेनेचे नगरसेवक व डोंबिवलीचे शहरप्रमुख सदानंद थरवळ यांनी बुधवारी पदाचा राजीनामा दिला. त्यांच्यापाठोपाठ उपशहरप्रमुख तसेच, अनेक विभागप्रमुख व शाखाप्रमुख अशा १०० जणांनी पदाचे राजीनामे 'मातोश्री'वर पाठविल्याने पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला जोरदार हादरा बसला आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. आरक्षणात डोंबिवलीतील जिमखाना हा वॉर्ड खुला राहिला तर पाथलीर्, गोग्रासवाडी व अंबिका नगर हे सलग तीन वॉर्ड महिलांसाठी आरक्षित झाले. त्यामुळे जिमखान्याच्या नगरसेविका मधुमती शिसोदे यांना गोग्रासवाडीतून उमेदवारी द्यावी व एखाद्या कार्यक्षम कार्यर्कत्याला जिमखाना येथून तिकीट द्यावे, अशी शिफारस शहरप्रमुख व नगरसेवक सदानंद थरवळ यांनी केली होती. ही शिफारस नेत्यांना मान्य झाल्याने जिमखाना येथून उपशहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांना तयारी करण्यास सांगण्यात आले. मात्र नगरसेविका शिसोदे यांनी जिमाखान्यातूनच लढण्याचा आग्रह धरला व त्यामुळे मंगळवारी मध्यरात्रीनंतर चौधरी यांचे तिकीट कापून उमेदवारीची माळ शिसोदे यांच्या गळ्यात घालण्यात आली. तसेच, काही वॉर्डांत विद्यमान नगरसेवकांनी दोन तिकिटांचा हट्ट धरला. दोेघांना तिकीट मिळाले नाही तर अपक्ष म्हणून बंडखोरी करण्याची धमकी या इच्छुकांनी दिली. या हट्टापुढे सेना नेतृत्वाने गुडघे टेकले. या मनमानीपणाला कंटाळून अखेर पदाचा राजीनामा 'मातोश्री' वर पाठविल्याचे सदानंद थरवळ यांनी सांगितले. त्यांच्यापाठोपाठ उपशहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी व विभागप्रमुख तसेच शाखाप्रमुख अशा १०० पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिले.

निवडणूक तोंडावर आली असताना झालेल्या या राजीनामा सत्राने शिवसेनेला जोरदार हादरा बसला असून थरवळ यांची समजूत काढण्याचे प्रयत्न जिल्हा संपर्कप्रमुख आमदार एकनाथ शिंदे व जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी केले. गेल्या वेळी विधानसभा निवडणूक आठ दिवसांवर आली असताना शिवसेनेत मिळणाऱ्या अपमानास्पद वर्तणुकीमुळे तत्कालीन शहरप्रमुख शरद गंभीरराव यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केला होता. त्यांनी मनसेत प्रवेश केल्याचा मोठा फटका सेनेला बसला व एकहाती विजयाची अपेक्षा असलेल्या कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता.

Wednesday, October 13, 2010

'मनसे' कथांनी राज ठाकरे चकित

म टा च्या सौजन्याने ...................................



* इच्छुक उमेदवारांचे भन्नाट अनुभवकथन
संजय व्हनमाने

' साहेब तुम्हाला अटक करून कल्याणला आणले होते. तेव्हा तुम्हाला बघायला गदीर्त शिरलो तर मागून एसआरपीवाल्यांनी पाठीत काठ्या घातल्या. तेव्हाच मला हा पक्ष आवडला आणि डायरेक्ट पक्षात इंट्री मारली'... कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीतील तिकिटासाठी इच्छुक उमेदवारांची पक्षप्रवेशाची कहाणी राज ठाकरे ऐकत होते. इच्छुकांच्या या भाऊगदीर्त आठ जण तर केवळ राजदर्शनासाठी उमेदवारीचा बहाणा करून आले होते. 'साहेब, आम्हाला उमेदवारी नको. तुम्हाला पाहायचे म्हणून केवळ अर्ज केला', असा खुलासा करून त्यांनी राज यांच्यासह सर्वांना चकित केले. हे सारे पाहून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर 'अंजाम ये है तो आगाझ क्या होगा' असे म्हणण्याची वेळ आली.

कल्याण-डोंबिवली पालिकेतील उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी गेल्या आठवड्यात राज ठाकरे यांनी तेथे तीन दिवस मुक्काम ठोकला होता. इच्छुकांना थेट मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले होते. राज यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या मुलाखतींची जबाबदारी आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, प्रवीण दरेकर, प्रकाश भोईर, रमेश पाटील तसेच शालिनी ठाकरे आणि मनोज चव्हाण यांच्या समितीवर होती. यावेळी राज केवळ 'सायलेंट ऑर्ब्झव्हर' असायचे. ते ना बोलायचे ना प्रश्न करायचे.

प्रत्येकालाच आपण पक्षात का आलात, असा प्रश्न विचारला जायचा. राज ठाकरे यांना अटक करून त्यांची रवानगी मानपाडा पोलीस ठाण्याच्या कोठडीत केली तेव्हा कल्याणमध्ये मनसेच्या कार्यर्कत्यांनी बराच गोंधळ माजवला होता. यावेळी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. यात एका उमेदवारने एसआरपीच्या पोलिसांचा बराच मार खाल्ला आणि पक्षातच प्रवेश केल्याचे सांगितले.

आठ उमेदवारांनी आपल्याला निवडणूक लढवायची नाही हे आधीच सांगितले. आम्हाला केवळ राज ठाकरे यांच्याशी बोलण्याची संधी मिळेल म्हणूनच आल्याचे सांगितले. एका महिला उमेदवाराने तर हॉलमध्ये येताच 'दहा-पंधरा लाख रुपये इलेक्शान खर्च करू, तुमी पैशाची काळजी कराची नाय, मिस्टरांचा केबलचा धंदा हाय ना', असे सांगताच सर्वांनाच हसू फुटले.

...................

स्थानिक आणि बाहेरचे!

तिकीटवाटप निश्चित करण्याआधी पक्षातील इच्छुक उमेदवारांचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. बहुसंख्य उमेदवारांनी स्थानिकांनाच संधी दिली पाहिजे, असा आग्रह धरला आणि घोषणाही दिल्या. त्यावर राज यांनी 'निवडणूक लढविण्यासाठी स्थानिकांना प्राधान्य आणि प्रचारासाठी मात्र बाहेरून मला बोलावणार का', अशा शब्दांत उमेदवारांची फिरकी घेतली.

Monday, October 11, 2010

मनसेचे १०० शिलेदार जाहीर!

म टा च्या सौजन्याने ........................................




कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व १०७ जागा लढविणार असल्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी केली. मनसेच्या १०० उमेदवारांची यादी जाहीर झाली असून उर्वरित सात जागांचा फैसला दोन दिवसांत होणार आहे.

या यादीत ३५ महिलांचा समावेश असून फैजल जलाल, उदय समेळ, वैशाली दरेकर, प्रकाश दळवी आणि सुदेश चुडनाईक या केवळ पाच आजी-माजी नगरसेवकांना पुन्हा संधी मिळाली आहे. उर्वरित ९५ उमेदवार आजवर कधीही महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले नाहीत. विशेष म्हणजे, पक्षस्थापनेपासून सक्रिय असलेले शहरअध्यक्ष राजेश कदम यांच्यासह अॅड. सुहास तेलंग, राहुल कामत व संदेश प्रभुदेसाई यांनी तिकीट न मागितल्याने त्यांचा विचार झालेला नाही.

पक्षाने उमेदवारनिवडीत जातीला महत्त्व दिलेले नाही. कमी शिकलेल्या उमेदवारामध्ये जर विकासकामे करण्याची क्षमता असेल, तर त्याला उमेदवारी दिल्याचे राज यांनी स्पष्ट केले. यादीतील ९५ टक्के उमेदवार पक्षाचे कार्यकतेर् असल्याचा दावा करण्यात आला.

निवडणुकीसाठी जाहीरनाम्याऐवजी मनसेेचा 'वचकनामा' असेल व तो लवकरच प्रसिद्ध होईल, असे राज यांनी स्पष्ट केले. यावेळी आ. बाळा नांदगांवकर, नितीन सरदेसाई, रमेश पाटील उपस्थित होते. दरम्यान, कोल्हापूरमध्ये पक्षाची बांधणी समाधानकारकरित्या न झाल्याने तिथे निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतल्याचे राज ठाकरे म्हणाले.

अतिक्रमणांवरील कारवाईला विरोध

एकीकडे झोपड्यांत राहणाऱ्या परप्रांतीयांना सरकार मोफत घरे देते तर दुसरीकडे कर्ज काढून घर घेतलेल्यांच्या घरावर बुलडोझर फिरवते. सगळेच निर्णय कोर्ट घेणार असेल तर सरकार चालवायचे कसे? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. अनधिकृत घरे बांधून लोकांना फसवणाऱ्या बिल्डर्सना जाब कोण विचारणार, असा सवाल त्यांनी केला.

यापुढे कल्याण-डोंबिवलीत रस्त्यांच्या कामाच्या टेण्डरमध्ये, खड्डे पडले तर ते बुजविण्याची जबाबदारी कॉण्ट्रॅक्टरचीच असेल, अशी अट राहील, असे त्यांनी सांगितले.

Thursday, October 7, 2010

मनसेचे इंजिन ३२ वॉर्डांत?

म टा च्या सौजन्याने ................................


म. टा. प्रतिनिधी

कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेचा महापौर निवडून आणायचाच, या इराद्याने राज ठाकरे यांनी बुधवारी डोंबिवलीत येऊन उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. या वेळी सर्वच्या सर्व जागा लढविण्याची शक्यता व्यक्त करतानाच १० ऑक्टोबरला मनसेच्या उमेदवारांची यादी जाहीर होईल, असे राज ठाकरे यांनी सांगितले. मात्र मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या अहवालात कल्याणमधील १५ तर डोंबिवलीतील १७ जागांवर पक्षाचे उमेदवार विजयी ठरू शकतात, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास राज ठाकरे यांचे डोंबिवलीत आगमन झाले. वाटेत शिळफाटा रोडवर ठिकठिकाणी मनसैनिकांनी फटाक्यांच्या आतषबाजीत व जल्लोषात त्यांचे स्वागत केले. नियोजित कार्यक्रमापेक्षा उशीर झाल्याने ठाकरे यांनी थेट ठाकुर हॉल गाठला व मुलाखतींना सुरुवात झाली.

अडीच वाजेपर्यंत चाललेल्या पहिल्या सत्रात कल्याण-डोंबिवलीतील १६ तर साडेचार वाजता सुरू झालेल्या दुपारच्या सत्रात आणखी १७ वॉर्डातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. निवडणूक लढण्याची संधी कमीच असली तरी ठाकरे यांना मुलाखतीच्या निमित्ताने प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाल्याने इच्छुकांमध्ये उत्साह संचारल्याचे दिसून आले.

तीन दिवसांच्या दौऱ्यात राज ठाकरे कल्याण-डोंबिवलीतील मान्यवरांच्या भेटी घेणार असल्याचे समजल्याने काही नागरिकांनी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलाखतींमध्ये व्यस्त असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. परंतु सत्तरी उलटलेल्या तीन महिलांनी ठाकरे यांची भेट मिळवलीच. डोंबिवलीतील रस्त्यांना पडलेले खड्डे, फेरीवाल्यांचा हैदोस व वाहतूककोंडीबाबत त्यांनी ठाकरे यांच्याकडे तक्रार केल्याचे समजते.

.................

' राज'प्रश्नांनी इच्छुकांची भंबेरी

पक्षातल्या अन्य एखाद्या कार्यर्कत्याला उमेदवारी मिळाली तर तुमची भूमिका काय राहील? असा अनपेक्षित आणि टोकदार प्रश्न ठाकरे यांनी काही इच्छुकांना विचारला. मनसेला असलेली अनुकूल परिस्थिती आणि निवडणुकीत तिकीट मिळवण्यासाठी जोरदार चुरस असताना या प्रश्नाने इच्छुक उमेदवारांची भंबेरी उडवली. पक्षात कधीपासून सक्रिय तसेच, पक्षवाढीसाठी दिलेले योगदान असे महत्त्वाचे प्रश्न मुलाखतीत विचारण्यात आल्याचे समजते.

................

विजयाची संधी असलेले वॉर्ड
कल्याण
गांधारे
बारावे
मांडा
टिटवाळा
एनआरसी कॉलनी
मोहोने
राममंदिर
बेतुरकर पाडा
ठाणकरपाडा
आधारवाडी
काळा तलाव
चिखलेबाग
चिकणघर
कणिर्क रोड
कचोरे
डोंबिवली
बावनचाळ
राजू नगर
देवीचा पाडा
मोठागाव ठाकुलीर्
कोपरगाव
नवागांव
म्हात्रे नगर
आयरे
मढवी शाळा
डोंबिवली जिमखाना
पाथलीर्
गोग्रासवाडी
अंबिका नगर
आनंदनगर
एकतानगर
संगीतावाडी
सुनीलनगर

Monday, October 4, 2010

राज ठाकरेंकडून मराठीसाठी मुख्यमंत्र्यांची 'शाळा'

म टा च्या सौजन्याने ..........................................





गेल्या तीन वर्षात एकाही मराठी शाळेला परवानगी का दिली नाही? नव्या मराठी शाळांना मान्यता न देण्याचे हे धोरण बदलावे. तसेच नव्याने मिळणारे टॅक्सीचे परवानी मराठी बेरोजगारांना द्यावे. अशा मागण्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांना भेटून केल्या.

राज यांनी सोमवारी सकाळी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या' वर्षा ' निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला राजकीय वर्तुळात महत्त्व प्राप्त झाले होते. पण ही भेट मराठी शाळा आणि टॅक्सीचे परवाने या संदर्भात होती, असे राज यांनी भेटींनतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

राज्य सरकारने १९ जून रोजी नवीन मराठी शाळांना मान्यता न देण्याबाबत परिपत्रक काढले आहे. राज्यात मराठी शाळांची संख्या पुरेशी आहे ; त्यामुळे बृहत आराखडा तयार करूनच नव्या मराठी शाळांना परवानगी देण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. ही भूमिका मराठी शाळांना मारक असून सरकारने ही भूमिका बदलावी, अशी मागणी राज यांनी केली.

इंग्रजी शाळांना सरकार अनुदान देत नाही. त्यामुळे त्यांना परवानग्या मिळतात. पण ज्या मराठी शाळा अनुदान नको म्हणत आहेत, त्यांना मात्र परवागी मिळत नाही. सरकारचे हे धोरण तातडीने बदलायला हवे यासाठी राज्यभरातल्या मराठी शाळा एकत्र येत आहेत. त्यांच्या आंदोलनाला समर्थन देत, अशा मराठी शाळांची यादीच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केली.

राज्यात नव्याने टॅक्सी परवाने वितरीत केले जाणार आहेत. हे टॅक्सी परवाने राज्यातील मराठी बेरोजगार तरुणांना कसे मिळतील यासाठी सरकारने विशेष धोरण आखावे अशी मागणीही यावेळी राज यांनी केली.

तसेच ' आम्ही आमच्या पद्धतीनुसार पहिल्यांना निवेदन देतो. तसे निवेदन दिले आहे. आता बॉल त्यांच्या कोर्टात आहे. काही झाले नाही तर काय करायचे ते आम्ही आमच्या पद्धतीने पाहू ' अशा इशाराही राज यांनी यावेळी दिला.

Friday, October 1, 2010

जय श्रीराम .... भारतात खरं राम राज्य येऊ दे

काल लखनौ खंडपीठाने अयोध्येतील राम जन्मभूमिबद्दल निर्णय दिला व गेल्या ६० वर्षापासून भिजत पडलेला हा प्रश्न तूर्तास तरी निकाली निघाला (तूर्तास ह्या करिता कि हिंदू महासभेने व वक्फ बोर्डाने सुप्रीम कोर्टात जाण्याचा मानस जाहीर केला आहे). काल निर्णय जाहीर झाल्यानंतर कुठलाही अनुचित प्रकार न झाल्याने सरकार / पोलिस व सामान्य जनतेने सुटकेचा निश्वास टाकला असेल. संघाकडून व बी जे पी कडून अतिशय संयमित प्रतिक्रियेने वातावरणातील तणाव निवळण्यास मदतच झाली आणि आम्ही सामान्य जन त्याचे स्वागतच करतो. हा प्रश्न निकाली निघाल्याने भारत देशात सलोख्याचे वातावरण निर्माण होईल अशी आशा करुया. शांततेच वातावरण असेल तरच खरं "राम राज्य" निर्माण होईल, यात काही शंका नाही. आता हा प्रश्न संपल्याने राज्यकर्ते / विरोधी पक्ष / सामान्य जन विकासाच्या मुद्द्यांकडे लक्ष देतील अशी आपण श्री रामाकडे आशा करुया ....

आपला

विनोद