Tuesday, February 15, 2011

मनसे 'फॉर्मा'त.. रेल्वेसाठी ट्रकभर अर्ज

खालील बातमी म टा च्या सौजन्याने .......





' रेल्वे इंजिन ' अशी निवडणूक निशाणी असलेल्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रेल्वे भरती मोहिमेत जोरदार मुसंडी मारली असून, आतापर्यंत मनसेकडे १ लाख ३८ हजार फॉर्मस् जमा झाले आहेत. राज्याच्या कानाकोप-यातून आलेल्या मराठी तरूणांच्या फॉर्मसचे गठ्ठे ' राजगडा ' वरून ट्रकमध्ये भरून रेल्वे ऑफिसमध्ये आज पाठवण्यात आले.

मनसेच्या माहीम येथील मुख्यालयात आतापर्यंत १ लाख ३८ हजार ११७ फॉर्मस् जमा झाले आहेत. ट्रकमध्ये भरून हे अर्ज रेल्वे भरती बोर्डाकडे पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती मनसेचे माहीमचे आमदार नितीन सरदेसाई यांनी आज दिली. या मोहीमेतून मनसेला किती फायदा होणार यापेक्षा राज्यातील मराठी तरूणांना किती फायदा होणार, हे जास्त महत्त्वाचे आहे. काही उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज भरले आहेत, अजूनही अर्ज दाखल होत आहेत. साधारणपणे ५ लाखापर्यंत प्रतिसाद मिळेल, असे त्यांनी सांगितले.

यापूर्वी रेल्वेच्या परीक्षा व्हायच्या तेव्हा मराठी तरूणांना कळायचेच नाही. रेल्वे भरतीच्या जाहिराती मराठी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होत नव्हत्या. परंतु यावेळच्या भरतीच्या निमित्ताने मनसेने मोठी जनजागृती केली. योग्यवेळी मराठी तरूणांना कळवले. त्यामुळे आता भरतीमध्येही १०० टक्के मराठी माणसाला स्थान मिळेल, अशी अपेक्षा आ. सरदेसाई यांनी व्यक्त केली. मनसे फक्त आंदोलने न करता, निगेटिव काम न करता, रेल्वे भरतीसाठी मदत करण्याचे काम करत आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसेने राबवलेली ही मोहीम महत्त्वाची मानली जात आहे.

आधी राडा, आता मार्गदर्शन
दोन वर्षांपूर्वी रेल्वे भरतीसाठी उत्तर प्रदेश - बिहारमधून कल्याणमध्ये आलेल्या परीक्षार्थींना फटकावून मोठा ‘राडा’ करणा-या मनसेने आता मराठी तरुणांना रेल्वेत नोकरी लावण्यासाठी जोरदार मोहीम उघडली आहे. येत्या १५ फेब्रुवारीला रेल्वे भरती परीक्षेचा अर्ज भरा, असं आवाहन आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी तरुणांना केलं आणि राज्यभरातील कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचा आदेश दिला. त्यानुसार राज्यभरात मराठी तरूणांना मनसेच्या वतीने फॉर्म वाटप करण्यात आले. रेल्वे भरतीसंबंधी राज्यातील मराठी तरुणांना सविस्तर माहिती व्हावी, अर्ज भरताना त्यांना कुठल्याही अडचणी येऊ नयेत, सर्व निकषांची त्यांनी योग्य पूर्तता करावी, या उद्देशाने मनसेने राज्यव्यापी मोहीम हाती घेतली. होर्डिंग्ज आणि माहितीपुस्तिकेच्या माध्यमातून मनसे कार्यकर्त्यांनी इच्छुक तरुणांना रेल्वे भरतीसंबंधी मार्गदर्शन करणार आहेत.

रेल्वेतील नोक-यांमध्ये मराठी तरुणांना डावललं जातं, हा मुद्दा राज ठाकरे यांनी शिवसेनेत असतानाच उचलला होता. मनसेच्या स्थापनेनंतरही त्यांनी तो लावून धरला आणि त्यासाठी मनसैनिकांनी कल्याण रेल्वे स्टेशनवर ‘ राडा ’ ही केला. त्यावरून बरेच वाद झाले. राज यांची ही पद्धत योग्य नसल्याची टीका झाली आणि विधायक मार्गाने काहीतरी करा, असे टोमणे त्यांना मारण्यात आले. त्याला राज आणि मनसेनं आपल्या या कृतीतून उत्तर दिलं आहे.

No comments:

Post a Comment