Monday, February 7, 2011

राज ठाकरे सक्रिय; शिवसेना अस्वस्थ

खालील लेख म टा च्या सौजन्याने ......................


केडीएमसीची निवडणूक आटोपल्यानंतर उलटलेल्या तीन महिन्यांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आतापर्यंत पाच वेळा कल्याण-डोंबिवलीत आले असून आता त्यांनी कल्याण डोंबिवलीच्या विकासाच्या ब्लू प्रिंटसाठी पुढाकार घेतला आहे. महापालिकेत मनसे सत्तेवर नसली तरी राज यांनी घेतलेल्या या पुढाकाराने पालिकेत सत्तेवर असणा-या शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. निवडणूक जिंकल्यानंतर एकदाही शिवसेनेच्या नेत्यांना कल्याण डोंबिवलीत येण्यासाठी वेळच मिळाला नसून विकासकामांबाबत चर्चादेखील झाली नसल्याने ही अस्वस्थता वाढू लागली आहे.

केडीएमसीच्या निवडणुकीचा निकाल मागील वर्षी १ नोव्हेंबर रोजी लागला. त्यानंतर चारच दिवसांनी दिवाळी पहाटच्या निमित्ताने तरुणांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे डोंबिवलीतील फडके रोडवर आले. महापौरपदाची निवडणूक आठवड्यावर आली असतांना या निवडणुकीत मनसेचे नगरसेवक तटस्थ भूमिका घेतील, हे जाहीर करण्यासाठी ठाकरे पुन्हा डोंबिवलीत आले. त्यानंतर, डोंबिवलीतील सर्वाधिक लोकप्रियउत्सव च्या उद्धाटनासाठीही त्यांनी शहराला भेट दिली. मागील आठवड्यात सोमवारी नगरसेवकांच्या बैठकीसाठी पुन्हा डोंबिवलीत, तर शनिवारी महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी ते कल्याणात आले होते.

वास्तविक निवडणुका आटोपल्यावर राजकीय नेत्यांना तेथील मतदारांचा विसर पडतो असा अनुभव आहे. पण राज ठाकरे यांनी तो खोटा ठरवला असून गेल्या तीन महिन्यात निरनिराळया कारणांसाठी ते डोंबिवली- कल्याणात येत आहेत. तसेच आता त्यांनी या शहरांच्या विकासासाठी ब्ल्यू प्रिंट तयार करण्याची जबाबदारी स्थानिक आर्किटेक्टवर सोपवली आहे. ही ब्ल्यू प्रिंट तयार झाली की ती प्रशासनापुढे ठेवण्यासाठीही आपण येणार असल्याचे ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

मात्र या घटनाक्रमांमुळे सत्ताधारी शिवसेनेत अस्वस्थता वाढू लागली आहे. महापौरपदाची निवडणूक झाल्यानंतर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे सीकेपी संस्थेच्या कार्यक्रमाच्या उद्धाटनाव्यतिरिक्त कल्याण-डोंबिवलीकडे फिरकलेले नाहीत. सत्ता असल्याने येथील विकासकामे मार्गी लावण्यासाठी त्यांनी नगरसेवक किंवा पालिका प्रशासनाची बैठक घेणे अपेक्षित होते. पण अशी बैठक सोडाच, त्यांनी स्वत:च जाहीर केलेल्या कोअर कमिटीचाही अद्याप पत्ता नाही. केडीएमसीचे अनेक प्रश्न एमएमआरडीए आणि रेल्वे विभागाकडे प्रलंबित आहेत. ते सोडवण्याच्या स्थानिक पदाधिकारी व नगरसेवकांच्या प्रयत्नांना उद्धव यांची साथ मिळाली तर ते सहज सुटू शकतात. पण निवडणुकीनंतर नेतृत्वाकडून कल्याण डोंबिवलीकरांना वा-यावर सोडण्यात आल्याने मतदारांच्या प्रश्नांना काय उत्तरे दयावीत, असा प्रश्न सेना नगरसेवकांना पडला आहे.

No comments:

Post a Comment