Monday, December 20, 2010

डोंबिवलीत मनसेची 'गांधीगिरी'

खालील बातमी म टा च्या सौजन्याने ..................................




कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीआधी आक्रमक आंदोलनांचा धडाका लावणारी मनसे आता गांधीगिरी करू लागली आहे. शनिवारी मनसेच्या नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी फेरीवाल्यांकडून वस्तू विकत न घेण्याचे आवाहन डोंबिवलीकरांना केले. फेरीवाल्यांच्या हैदोसामुळे महापौर वैजयंती गुजर यांनी कारवाईचे आदेश दिल्यापासून स्टेशन परिसरातील फुटपाथ काहीसे मोकळे असल्याचा सुखद अनुभव डोंबिवलीकर घेत आहेत. या कारवाईला पाठिंबा दर्शवत मनसैनिकांनी गांधिगिरी केली.

कल्याण व डोंबिवली स्टेशन परिसरातील फेरीवाले व बेशिस्त रिक्षाचालक या दोन्ही समस्या आता प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर गेल्या आहेत. फेरीवाल्यांविरोधात अनेक तक्रारी डोंबिवलीकरांनी केल्यानंतर महापौरांनी पालिका प्रशासनाला कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सध्या तरी सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत फेरीवाले हटविले जात असल्याने डोंबिवलीकरांना सुखद धक्का बसला आहे.

या पार्श्वभूमीवर पालिकेच्या कारवाईच्या समर्थनासाठी मनसैनिकही रस्त्यावर उतरले. विरोधी पक्षनेत्या वैशाली दरेकर यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी फडके रोडवरून स्टेशनपर्यंत फेरी काढून लोकांना फेरीवाल्यांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले. या आंदोलनात माजी नगरसेवक शरद गंभीरराव, प्रकाश भोईर, नगरसेवक राहुल चितळे आदींनी सहभाग घेतला होता.

काही फेरीवाल्यांनी मनसेच्या आंदोलनानंतर आपल्या उदरनिर्वाहासाठी हा व्यवसाय करणे भाग असल्याचे सांगत मनसैनिकांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शरद गंभीरराव यांनी आक्रमक भूमिका घेत फुटपाथ हे नागरिकांना चालण्यासाठी आहेत, फेरीवाल्यांसाठी नाहीत असे सुनावले. स्थानिक फेरीवाल्यांचा उदरनिर्वाह व्हावा यासाठी त्यांना 'हॉकर्स झोन'मध्ये कोठे जागा देता येईल, याचा पालिका विचार करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.

शहर शाखा पदाधिकारी आंदोलनापासून लांब

एरवी डोंबिवलीतील प्रत्येक आंदोलनात हिरिरीने नेतृत्व करणारे शहर अध्यक्ष राजेश कदम, राहुल कामत व अॅड. सुहास तेलंग मात्र या आंदोलनात दिसले नाहीत. त्यामुळे नगरसेवक व शहर शाखा अशा दोन गटांत मनसे विभागण्यास सुरुवात झाल्याची चर्चा आहे.

मनसैनिकांची दादागिरी

मनसेचे नगरसेवक 'गांधीगिरी' करीत असताना मनसैनिकांनी मात्र फूटपाथवर ठाण मांडलेल्या काही फेरीवाल्यांच्या गाड्या उलथवून लावल्या. या गाड्यांवरील सामानही त्यांनी रस्त्यावर फेकून दिले.

No comments:

Post a Comment