शिवसेना आणि राष्ट्रवादी ची युघाडी (युती / आघाडी) अटळ आहे.
शिवसेनेला एकच सांगणे आहे कि आता एकदाचं लग्न लाऊन टाका कि, किती दिवस बी जे पी च्या गळ्यात गळे घालून राष्ट्रवादी ला डोळे मारणार? प्रत्येक ठिकाणी दोघं एक मेकाची मदत घेतात मग विधानं सभेत गोंधळ घालण्याचं नाटक का करता???
वाचा म टा चा संपादकीय लेख .......
शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची युती गेली दोन-अडीच दशके अभेद्य आहे, असा डिंडिम त्या दोन्ही पक्षांचे नेते सतत वाजवत असतात. अधूनमधून कोणी तरी 'शत प्रतिशत' ची घोषणा देतो, मग दोन्ही बाजूचे नेते भुजा सरसावून युतीतल्या आपल्या 'मित्रा'ला त्याची जागा दाखवून देण्याचाही प्रयत्न करतात; नाही असे नाही. तरीही पुन्हा लगोलग या दोन्ही पक्षांचे नेते हातात हात घालून छायाचित्रकारांना 'पोज' देतात आणि युती अभेद्य असल्याच्या तुताऱ्या फुंकू लागतात! असा खेळ महाराष्ट्रात गेली जवळपास २५ वषेर् सुरू आहे. त्यामुळेच विधान परिषदेच्या निवडणुकीत जळगावातच आपल्या मुलाच्या पदरी पराभव आल्याने विरोधी पक्षनेतेपद भूषवणारे भाजपचे नेते एकनाथराव खडसे यांना अतोनात दु:ख झाले असले, तरी राज्यभरातील जनतेला त्यामुळे कवडीचेही आश्चर्य वाटलेले नाही. त्याचे प्रमुख कारण म्हणजे राज्यात आघाडीचे सरकार असले आणि विरोधी बाकांवर युती असली, तरी त्या चारही प्रमुख पक्षांमध्ये स्वत:ची ताकद वाढवण्यासाठी सतत शह-काटशहाचे डावपेच खेळले जात आहेत. तरीही कल्याण-डोंबिवली महापालिकेत पदरी आलेला पराभव आणि त्यास कारणीभूत ठरलेली शिवसेेनेची रणनीती यामुळे भाजपचे महाराष्ट्रातील नेते कमालीचे अस्वस्थ झाले होते. आता त्यापाठोपाठ 'दादागिरी'च्या माध्यमातून शिवसेनेने खडसे यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच त्यांची जागा तर दाखवून दिली आहेच; शिवाय त्यामुळेच राष्ट्रवादी काँगेसचे शिवसेनेशी किती मधुर संबंध आहेत, त्यावरही प्रकाश पडला आहे. याची परिणती युतीतील या दोन पक्षांमध्ये वितुष्ट येण्यात होणार, हे उघड आहे आणि खुद्द खडसे यांनी 'दगाबाज मित्रापेक्षा दिलदार शत्रू परवडला!' असे उद्गार काढून त्याची प्रचीती आणून दिली आहे. भाजपचे राज्यातील नेतेही निखिल खडसे यांच्या या पराभवामुळे कमालीचे नाराज झाले असून आता या मित्रपक्षाला एकही वैधानिकपद मिळू न देण्याचा निर्णयही त्यांनी घेतला असल्याचे वृत्त आहे. अर्थात, शिवसेना आणि भाजप यांच्या 'मैत्री'वर हा घाव घालण्यास राष्ट्रवादीने आखलेले डावपेच कारणीभूत ठरले आहेत, हे उघड आहे. खरे तर या निवडणुकीत जळगावातून राष्ट्रवादीने अनिल चौधरी यांच्या रूपाने अधिकृत उमेदवार उभाही केला होता. पण सरळ लढत झाली असती, तर खडसे यांचे चिरंजीव निवडून येणार हे स्पष्ट होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच तेथे ईश्वरलाल जैन यांच्या चिरंजीवांना बंडखोरी करण्यास नुसते भागच पाडले असे नव्हे तर सुरेशदादा जैन या सध्या शिवसेनेत असलेल्या आपल्या जुन्याच नेत्याच्या सहकार्याने निवडूनही आणले! अर्थात, त्यासाठी पैशांची किती उधळण झाली आणि कोणाकोणाला परदेशवारीचे सौख्य लाभले, त्याच्या कहाण्या आता खानदेशाच्या सीमा पार करून थेट विदर्भातील उपराजधानीत म्हणजे नागपुरात सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात चचिर्ल्या जाऊ लागल्या आहेत. शिवसेना आणि भाजप यांच्यातील रुंदावत चाललेल्या या दरीमुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आनंद होणे साहजिकच आहे; कारण मुंबईतील 'आदर्श' सोसायटीच्या घोटाळ्यानंतर अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी झाली, तेव्हा राज्यात कमालीची बेदिली माजली होती. विलासराव देशमुखांपासून नारायणराव राणे यांच्यापर्यंत अनेक नेते या पदासाठी दावे करत होते आणि काँगेस हायकमांड स्वच्छ चारित्र्याच्या नेत्याच्या शोधात होती. अशा परिस्थितीत पृथ्वीराज यांनी राज्याची धुरा हाती घेतली, तेव्हा त्यांना पुढच्या १५ दिवसांत सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनाला तोंड देणे कठीण होईल, असे चित्र उभे राहिले होते. 'आदर्श' घोटाळ्यावरून विरोधक कमालीचे आक्रमक होते. पण जळगावातील या एका पराभवामुळे सारे चित्र पुरते पालटून गेले आहे. खुद्द खडसे मनात 'दोस्त दोस्त ना रहा...' हे गीत आळवत आहेत आणि त्यामुळे सत्ताधारी आघाडी आनंदित होणे स्वाभाविक आहे. पण त्याचवेळी बहुधा मुख्यमंत्र्यांच्या ओठावरही तेच गीत असेल, तर तो योगायोग म्हणता येणार नाही. कारण गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेनेशी जवळीक वाढत चालली आहे. त्याचे पहिले प्रत्यंतर नव्या मुख्यमंत्र्यांना कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीने ज्या पद्धतीने तटस्थ राहण्याची भूमिका घेऊन शिवसेनेला महापालिका बहाल केली त्यावरून आले असणारच. आता त्यापाठोपाठ जळगावातही शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या 'युती'तूनच मनीष जैन यांच्या विजयाची गुढी उभारली गेली आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनाला सामोरे जाताना पृथ्वीराज चव्हाण यांना या खेळामुळे दिलासा मिळाला असला, तरी वर्षभरात सामोऱ्या येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही सेना-राष्ट्रवादी यांचे प्रेम असेच कायम राहिले, तर ही प्रतिष्ठेची महापालिका काँगेसच्या हाती येणे कठीण आहे, हे लक्षात आल्याने त्यांच्या पोटात गोळा आलेला असू शकतो. हे सारे राजकारण लक्षात घेऊनच आपल्याला पुढे वाटचाल करावयाची आहे, हे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आले असेलच.
No comments:
Post a Comment