खालील लेख म टा च्या सौजन्याने .......
भाजपची हूल!
महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रदेश कार्यालयात पाचारण करून चहा पाजण्याची भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची शक्कल भलतीच परिणामकारक ठरली! चहापान राज आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी केले, पण भान मात्र शिवसेनेच्या सवोर्च्च नेतृत्वाचे हरपले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे संतापले, उद्धव यांनी तर थेट माजी उपपंतप्रधान व रामभक्त लालकृष्ण अडवाणी यांना फोन लावला. 'राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर तुम्ही झुणकाभाकर खाता, तेव्हा आम्ही फोन करून तुम्हाला त्रास देतो का', असा सवाल अडवाणी यांनी विचारला की नाही, हे उघड झालेले नाही. मात्र राज ठाकरे यांची पायधूळ भाजपच्या कार्यालयाला लागली तरी पोटात गोळा येण्याइतकी महाराष्ट्रात शिवसेना दुर्बळ झाली आहे काय, असा प्रश्ान् उद्धव यांच्या या अकांडतांडवी प्रतिक्रियेमुळे मतदारांच्या मनात निर्माण करण्याचा हेतू भाजपने साध्य केला आहे. राजकारणात आजचे राजकीय शत्रू उद्याचे मित्र होऊ शकतात हे वास्तव असले, तरी पंचायती वा पालिकांच्या स्तरांवरील सोयरिकींच्या शक्यतांच्या तुलनेत, राज्य वा केंदाच्या स्तरावरील सत्तेच्या समीकरणांत अशा शक्यतांची संख्या मर्यादित असते. तत्त्व म्हणून नाही, तरी राजकीय अपरिहार्यता म्हणून राष्ट्रीय पातळीवरील पक्षांना कोणाशीही आघाडी करता येत नाही. शिवसेनेशी भाजपने युती केली, मात्र त्यासाठी शिवसेनेला मराठी हिताबाबत अधिक उदार भूमिका घ्यावी लागली आणि 'हिंदुत्व' या व्यापक छत्रीचा आश्ाय घ्यावा लागला. आज जैतापूरच्या प्रकल्पाला स्थानिक जनतेच्या हिताच्या नावाने विरोध करणाऱ्या शिवसेनेने गुजरातेतील सरदार सरोवर प्रकल्पाला विरोध करणाऱ्या महाराष्ट्रातील आदिवासींच्या मागे बळ उभे करण्याऐवजी, मुंबईतील गुजराती भाषिक मतदारांच्या अनुनयाला प्राधान्य दिले होते! मुंबई, ठाणे महापालिका व नंतर राज्यात शिवसेनाप्रणीत युती सत्तेवर असताना, साठ व सत्तरीच्या दशकात परप्रांतीयांना वाटणारे शिवसेनेचे भय हळूहळू कमी झाले. सत्तेची अपरिहार्यता म्हणून का होईना, शिवसेनेला व्यापक राजकारणाचा अंगीकार करावा लागला. त्याचमुळे उत्तरेकडील राज्यांत प्रभाव असलेल्या भाजपला शिवसेनेबरोबरील सोयरिकीतून अन्य राज्यांत नुकसान होण्याची भीती वाटली नाही. राज ठाकरे यांच्या सध्याच्या भूमिकेबाबत तशी परिस्थिती नाही. मुंबई महापालिकेतही उघडपणे राज यांच्याबरोबर युती करण्यास भाजपचे केंदीय नेतृत्व तयार होईल, अशी शक्यता कमी आहे. त्यामुळे या घटनेचा वापर भाजपच्याच मताधारात अस्वस्थता निर्माण करण्यासाठी इतरांकडून केला जाऊ शकतो, याची आठवण शिवसेना नेतृत्वाने करून दिली असती, तर भाजपचे हे दबावतंत्र त्यांच्यावरच उलटवता आले असते.
No comments:
Post a Comment