Thursday, March 10, 2011

'बांद्रा ते कोकण…सारेच षड्यंत्र!'-राज

खालील लेख म टा च्या सौजन्याने .......



बांद्र्याच्या गरीबनगर झोपडपट्टीत लागलेल्या आगीचं प्रकरण दिसतं तितकं सोपं नाही. हे एक षड्यंत्र आहे. मराठी टक्का कमी करून परप्रांतियांना मुंबई-ठाण्यात घुसवण्याचं कारस्थान सुरू आहे. तिकडे, कोकणातही मराठी माणसाची हजारो एकर जमीन बळकावण्याचं काम चाललंय. त्यातून कोकणी माणसाला काय मिळणार आहे ? हे जे घडतंय, त्यावर बारीक लक्ष ठेवा. एकदा वेळ हातातून गेली की काहीच होणार नाही, असा सावधानतेचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीजनांना दिला.

मनसेच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त राज यांनी आज आपल्या सैनिकांना मार्गदर्शन केलं. त्यांच्या या भाषणात कुठलाही नवा विषय नव्हता. पण, जुन्या विषयांना नव्या संदर्भांची जोड देऊन राज यांनी सत्ताधा-यांवर टीकास्त्र सोडलं आणि मराठी चा गजर केला. तसंच, आपल्याला कुणाच्याही युती-बितीची गरज नाही, सगळ्या निवडणुका आपण एकटेच लढवणार आहोत, असं त्यांनी जाहीर करताच मनसैनिकांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांना दाद दिली.

मी शारुक मांजरसुंभेकर या नाटकाचा दाखला देत राज यांनी आपल्या हक्काचा, मराठीचा मुद्दा उचलला. मुंबईत आलेला एक मराठी मुलगा कसा स्ट्रगल करतो, त्याच्या वाट्याला काय-काय येतं हे या नाटकात दाखवण्यात आलंय. आज महाराष्ट्रात मराठी माणसाची परिस्थिती वेगळी नाही, असं त्यांनी नमूद केलं. बांद्र्याच्या गरीबनगरची झोपडपट्टी जळली... त्यात गरीब किती हा मुद्दा नाही. पण मराठी माणसाला हद्दपार करून परप्रांतियांना मुंबईत घुसवण्याच्या कटाचाच हा एक भाग आहे, याकडे राज यांनी लक्ष वेधलं.

मुंबईत झोपडपट्ट्या बेसुमार वाढताहेत. मराठी माणसाला इथे जागा नाही, पण रिक्लेमेशनजवळ बांगलादेशी मुस्लिमांनी झोपडपट्टी उभी केली. त्यांच्या घरांना आग लागली, त्यात कुणीही जखमी झालं नाही, तरीही सरकारने त्यांना पक्की घरं बांधून दिली. गरीबनगरचंही तेच होईल. हे सगळं कारस्थान आहे, अशी भीती राज यांनी व्यक्त केली. दोन-तीन मजल्याच्या झोपडपट्ट्या उभ्या राहत आहेत, एकेक मजला वाढतच जातोय, घराशेजारी हे सगळं होतंय, पण महापालिकेचं त्याकडे लक्ष नाही, अशी टिप्पणी करत त्यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंना टोमणा मारला.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची तर त्यांनी दिल्लीवाल्यांचे हुजरे , बट नॅचरल, अशा शब्दांत खिल्ली उडवली. ४०-४० वर्षं सरकारी नोकरी करणा-या कर्मचा-यांना तुम्ही नंतर घरातून काढून टाकणार, पोलिसांना काढून टाकणार आणि ज्यांचा काही संबंध नाही त्यांना ३०० स्वे. फुटाची घरं देणार, हा कुठला न्याय ?, असा सवालही त्यांनी केला.

एफएसआय वाढवून देण्याची अधिकृतपणे मागणी करणा-या सचिन तेंडुलकला नकार देणा-या सरकारलाही त्यांनी खडे बोल सुनावले.

जैतापूरला विरोध नाही, पण...

कोकणात उभ्या राहणा-या जैतापूर प्रकल्पाला आमचा विरोध नाही. मनसे प्रगतीच्या आड कधीच येणार नाही. राज्याचा विकास महत्त्वाचा आहे. पण सगळे ऊर्जेचे प्रकल्प निसर्गसंपन्न कोकणातच का ? , बाकीच्या जिल्ह्यात का नाहीत ?, हेही एक षड्यंत्रच आहे, असा आरोप राज यांनी केला. सत्ताधारी पुढा-यांनी कोकणात हजारो एकर जमिनी घेऊन ठेवल्यात... कृपाशंकर सिंह यांची तिथे ३०० एकर जमीन आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. पण या जमिनी विकून कोकणी माणसाला काय मिळणार आहे, हे सगळं कुणाच्या घशात जाणार आहे, कोकणाचा उत्कर्ष कुणासाठी होतोय, असे सूचक प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. कुणालाही आपल्या जमिनी विकू नका, ही सुपीक जमीन गेली की तुमच्या वाट्याला परत काही येणार नाही, अशी विनंतीही त्यांनी कोकणी जनतेला केली.

स्थानिक जनतेवर अन्याय, अत्याचार करून जैतापूरचा विषय सुटणार नाही. सरकार फक्त स्थानिकांच्या जमिनी बळकावतंय, लोकांना प्रकल्पाची माहितीच नाही, असंही त्यांनी नमूद केलं. नारायण राणेंनी हा प्रकल्प होईपर्यंत शांत बसावं, उगाच विषयाला फाटे फोडू नयेत, असं आवाहनही त्यांनी केलं.

महाराष्ट्राचं हित करा !

मनसे कार्यकर्त्यांनी मराठी माणसाच्या, महाराष्ट्राच्या हिताचा विचार करावा, त्यादृष्टीने काम करावं, असा सल्ला राज यांनी दिला. पाच वर्षं झाली, सहा वर्षं झाली अशी बोटं मोजत बसण्यात काहीच अर्थ नाही. मला तिकीट मिळेल का, हा अत्यंत फालतू विचार आहे. गेल्या ४० वर्षांत कोण नगरसेवक निवडून गेले त्यांची नावं तरी आठवतात का तुम्हाला ? त्यापेक्षा असं काहीतरी करा की तुम्ही कायम लक्षात राहाल, असं मार्गदर्शन त्यांनी केली. कुठे काय गैर चाललंय त्याकडे लक्ष ठेवा, पक्षाला पुढे कसं न्यायचं ते मी बघेनच, अशी सूचनाही त्यांनी केली.

No comments:

Post a Comment