Monday, March 7, 2011

सेनेचा ‘वालेकुम सलाम!’

खालील लेख लोकसत्ता च्या सौजन्याने ........................



वर्ल्ड कपच्या भारतीय संघातील गोलंदाज कमी पडत असल्याचे दिसत असल्यामुळे फलंदाजांची जबाबदारी वाढलेली आहे. शिवसेनेच्या बाबतही सध्या असेच काहीसे झालेले दिसते. शिवसेनाप्रमुखांची ठाकरी भाषेतील ‘गोलंदाजी’ प्रकृती अस्वास्थ्यामुळे यापुढे फारशी चालणार नसल्यामुळे संघटना बांधणीची ‘फलंदाजी’ भक्कम करण्यावर शिवसेना कार्याध्यक्ष भर देताना दिसत आहेत. मात्र हे करत असताना ‘मराठी’ आणि ‘हिंदुत्व’ या प्रमुख खेळाडूंना धक्का बसेल अशी भूमिका घेत ठाण्यात त्यांनी ‘शिवसेना-मुस्लिम महासंघा’ची स्थापना करून टाकली. या स्थापनेसाठी मुहूर्त निवडला तोही महाशिवरात्रीचा. आधी मराठीच्या मुद्यावर महापालिका काबीज करणाऱ्या बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या वारूवर स्वार होत महाराष्ट्राची सत्ता हस्तगत केली होती. आता ‘छोटे सरकारनी’ मुस्लिम मतांचे गणित जुळवायचे ठरवलेले दिसते. यापूर्वी त्यांनी ‘मी मुंबईकर’चा स्टांस घेऊन बॅटिंग करून पाहिली होती. मात्र त्यात ते धावचित झाले आणि ‘मी मुंबईकरां’ना डावाने पराभूत व्हावे लागले होते. आता ठाण्यातील ‘शिंदेशाही’ला हाताशी धरून मुस्लिम मतांसाठी ‘सेना-मुस्लिम संघा’ची स्थापना केली. सेना-मुस्लिम ऐक्य करायचे होते तर निदान ‘शिवसेना-मुस्लिम सेना’ असे ‘नवनिर्माण’ तरी करायचे होते, अशी भावना ठाण्यातील शिवसैनिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे आता यापुढे ‘जय महाराष्ट्र’प्रमाणे ‘वालेकुम सलाम’ही करायचा का, असा सवाल शिवसैनिकांकडूनच उपस्थित केला जाताना दिसतो. ठाण्यात पुढील वर्षी होणाऱ्या पालिका निवडणुकीत शिवसेनेचा विजय निश्चित मानला जात होता. ‘शिवसेना-मुस्लिम संघ’ स्थापन करून ‘मनसे’च्या ‘फतेह’चा मार्ग तर मोकळा केला, असे दबल्या आवाजात बोलले जात आहे.

No comments:

Post a Comment