Monday, February 22, 2010

राज ठाकरे यांना जामीन मंजूर

म टा च्या सौजन्याने

मटा ऑनलाइन वृत्त । चोपडा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना चोपडा कोर्टाने जामीन मंजूर केला। उत्तर भारतीयांविरोधातील आंदोलनात चोपड्यात राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचा मनसे कार्यकर्त्यांनी पुतळा जाळल्या प्रकरणी हा जामीन मंजूर झाला आहे.

चोपड्यातील शिवाजी चौकात २३ ऑक्टोबर रोजी लालू प्रसाद यादव यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला होता। त्यावेळी राज ठाकरे यांच्यासह १३ जणांविरोधात चोपड्यातील पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात प्रमुख आरोपी म्हणून राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. इतर कार्यकर्ते कोर्टात हजर झाले होते. परंतु राज ठाकरे कोर्टात हजर न झाल्याने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी झाले होते. आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास राज ठाकरे हेलिकॉप्टरने चोपड्याला आले. ते ११च्या सुमारास कोर्टासमोर हजर झाले. त्यावेळी राजाराम भावलाल पाटील यांनी साडे ७ हजार रुपयांचा जातमुचलका भरून राज ठाकरे यांना जामीन मंजूर करून घेतला.

प्रथम सत्र न्यायदंडाधिकारी न्या। उबाळे यांनी हा जामीन मंजूर केला. दरम्यान, राज ठाकरे चोपडा शहरात येणार म्हणून रस्त्याच्या दुतर्फा कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. तसेच त्यांच्या स्वागताचे फलकही ठिकठिकाणी लागले होते. राज ठाकरे यांची एक झलक पाहण्यासाठी तरुणांनी राज ठाकरे यांचे वास्तव असलेल्या ठिकाणी एकच गर्दी केली होती. या गर्दीत चेंगराचेंगरी होवून दोन विद्यार्थी जखमी झाले.

No comments:

Post a Comment