Tuesday, February 9, 2010

महाराष्ट्र माझा...प्रदूषणातही अव्वल !!

सकाळ च्या सौजन्याने ....
ही बातमी खालील लिंक वर देखिल मिळु शकेल
http://epaper.esakal.com/esakal/20100209/4649157733148341462.htm
आणि अहवाल ह्या लिंक वर मिळु शकेल
http://www.cpcb.nic.in/upload/NewItems/NewItem_153_Foreword.pdf
सरकारने आता लोकांच्या प्रश्ना कड़े बघावे ... जर शहरात एवढी लोकसंख्या वाढणार असेल तर अशे प्रश्न उभे राहणारच आणि अशे प्रश्न सोडवणे ही सरकारची प्राथमिकता असली पाहिजे .... नाही तर आपल्या अशोक रावांचे सर्वोच्च प्राधान्य आहे पर प्रन्तियाना सरक्षण



सकाळ वृत्तसेवा
Tuesday, February 09, 2010 AT 11:18 AM (IST)
प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल: राज्यातील ८४ शहरांत जलस्वच्छतेचा प्रश्‍न ऐरणीवर
विलक्षण वेगाने होणाऱ्या नागरीकरणामुळे महाराष्ट्रातील ८४ शहरे आणि निमशहरांमध्ये स्वच्छतेचा आणि पर्यायाने सांडपाण्याचा प्रश्‍न आ वासून उभा राहिला आहे। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने गेल्या पंधरवड्यात प्रसिद्ध केलेल्या तपशीलवार पाहणी अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील तब्बल ७० टक्के सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदी, नाले, तलाव, समुद्रात सोडून देण्यात येत असल्याचा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे!
सर्वाधिक सांडपाणी महाराष्ट्रात
देशात सर्वाधिक शहरीकरण झालेली लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रातील शहरे-निमशहरांना (वर्ग १ - एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्येची शहरे आणि वर्ग २ - पन्नास हजार ते एक लाखापर्यंतच्या लोकसंख्येची निमशहरे) रोज १२,७५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो। पाणीपुरवठ्याचे हे प्रमाणही देशात सर्वाधिक आहे. या पुरवठ्यातून दररोज तयार होणाऱ्या १०,२७२ दशलक्ष लिटर सांडपाण्याची व्यवस्था मात्र महाराष्ट्रात नाही, असे अहवालातून पुढे आले आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र सांडपाणी तयार करण्यातही देशात अव्वल आहे! महाराष्ट्राखालोखाल उत्तर प्रदेश (३८५१ दशलक्ष लिटर), पश्‍चिम बंगाल (२५२५ दशलक्ष लिटर) आणि कर्नाटक (२०२३ दशलक्ष लिटर) या राज्यांत सर्वाधिक सांडपाणी तयार होते. या राज्यांमधील परिस्थितीही महाराष्ट्रापेक्षा वेगळी नाही. या तीनही राज्यांमध्ये मिळून सरासरी ३० टक्के सांडपाण्यावरच प्रक्रिया केली जाते.
किनारपट्टीची स्थिती
महाराष्ट्राच्या किनारपट्टीय प्रदेशातील भिवंडी, मुंबई, पनवेल आणि विरार ही चार शहरे वर्ग १ मध्ये येतात। या शहरांमधून दरडोई १६२ लिटर सांडपाणी दररोज तयार होते. वर्ग २ दर्जाची रत्नागिरी आणि वसई शहरे दरडोई दररोज सरासरी ७२ लिटर सांडपाणी तयार करतात. त्याची विल्हेवाट लावण्याची सक्षम यंत्रणा मात्र या शहरांमध्ये नाही. परिणामी, समुद्रात खोलवर अथवा खाडीत हे सांडपाणी सोडले जाते, असे अहवालातून समोर आले आहे.
पुण्याची मुंबईवर मात
महाराष्ट्रातील वर्ग १ आणि वर्ग २ मधील ८४ शहरे-निमशहरांमध्ये मिळून फक्त चाळीस टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येते। अजिबात प्रक्रिया न केलेले तब्बल साठ टक्के म्हणजे ६०१८ दशलक्ष लिटर सांडपाणी जसेच्या तसे सोडून देण्यात येते. मुंबई आणि पुणे या महानगरांमध्येही तयार होणाऱ्या सर्वच सांडपाण्यावर प्रक्रिया होत नाही. मुंबईत ८० टक्के, पुण्यात ६४, नाशिकमध्ये ४७, तर नागपूरमध्ये २६ टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. त्यातही, बृहन्मुंबईमध्ये पुण्याच्या चौपट पाणीपुरवठा होत असूनही, सांडपाणी तयार करण्यात मात्र पुण्याने मुंबईला मागे टाकले आहे! महाराष्ट्रातील या महानगरांच्या तुलनेत हैदराबाद, अहमदाबाद, बडोदा, लुधियाना, चेन्नई येथे जवळपास 100 टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करून मगच ते पाणी पुढे सोडण्यात येते, असे अहवालात नमूद केले आहे.
अहवालातील काही ठळक निष्कर्ष -
- देशांतील महानगरांमध्ये (दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या) रोज १५,६४४ दशलक्ष लिटर सांडपाणी तयार होते। त्यांपैकी ८०४० दशलक्ष लिटर पाण्यावर (५१ टक्के) प्रक्रिया केली जाते.
- देशांतील तब्बल ९३ टक्के सांडपाणी वर्ग १ दर्जाची शहरे तयार करतात। त्यांपैकी ६८ टक्के सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडून दिले जाते. महाराष्ट्रातील अशा शहरांची संख्या आहे ५०.
- देशांतील वर्ग २ दर्जाच्या शहारांमध्ये तब्बल ९२ टक्के सांडपाणी विनाप्रक्रिया सोडून दिले जाते। महाराष्ट्रात वर्ग २ मध्ये तब्बल ३४ निमशहरे समाविष्ट आहेत.
- वर्ग १ आणि २ दर्जाची महाराष्ट्राहून अधिक शहरे उत्तर प्रदेश (१०७), उत्तर प्रदेश (९९) आणि पश्‍चिम बंगाल (८७) मध्ये आहेत। तथापि, या तीनही राज्यांमधील शहरे-निमशहरे मिळून जेवढे सांडपाणी रोज तयार करतात, तेवढे एकट्या महाराष्ट्रात तयार होते.
शिफारशी:
- सांडपाणी व्यवस्था उभा करण्याकडे महापालिकांनी अत्यंत तातडीने पावले उचलली पाहिजेत।
- अशा व्यवस्थेअभावी जलस्रोत निकामी होत आहेत, याकडे महापालिका व नगरपालिकांनी जबाबदारीने पाहिले पाहिजे।
- सांडपाणी आणि त्यावरील प्रक्रियेची यंत्रणा यातील दरी सातत्याने वाढते आहे। त्यामुळे शहरांमधील प्रदूषण वाढते आहे. ही दरी भरून काढण्यासाठी प्राधान्याने कार्यक्रम हाती घेतले पाहिजेत.
- सांडपाण्याच्या पुनर्वापरावर भर दिला पाहिजे।
- शंभर टक्के सांडपाण्यावर किमान प्रक्रिया करणारी यंत्रणा प्रत्येक शहरे-निमशहरांनी तत्काळ उभी केली पाहिजे।
- प्रमुख जलस्रोत असलेल्या नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी तत्काळ कृती आराखडा तयार केला पाहिजे।

No comments:

Post a Comment