Thursday, February 11, 2010

'माय नेम..' च्या वादात मनसे नाही

सकाळ च्या सौजन्याने


सकाळ वृत्तसेवा
Thursday, February 11, 2010 AT 12:33 PM (IST)

मुंबई - 'माय नेम इज खान' या चित्रपटावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करणार नाही किंवा चालू असलेल्या आंदोलनाच्या आगीत तेल ओतण्याचाही प्रयत्न करणार नाही। तथापि, हा शाहरुख खानचा स्टंट असेल, तर त्याच्या चित्रपटाला विरोध करून आंदोलन करणा-या पक्षाचाही स्टंट असू शकेल, असे 'मनसे'चे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी आज (गुरूवार) शिवसेनेचे नाव न घेता त्या पक्षावर शरसंधान केले. 'मनसे'ची भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांनी आज खास पत्रकार परिषद आयोजित केली होती.

राज ठाकरे म्हणाले, की अमिताभ बच्चन यांचेही काही पाकिस्तानी कलाकारांशी जवळचे संबंध आहेत। 'टाइम्स ऑफ इंडिया' या दैनिकातर्फे चालू असलेल्या 'अमन की आशा' या कार्यक्रमात, बच्चन यांनी एक कविताही सादर केली होती. या प्रसंगी व्यासपीठावर पाकिस्तानचे कलाकार झियासुद्दिन हे देखिल उपस्थित होते. जर बच्चन चालतात मग पाकिस्तानी खेळाडूंबद्दल केवळ एकच विधान करणा-या अभिनेता शाहरुख खान याच्याविरुद्ध आगपाखड का केली जात आहे? अमिताभ बच्चन यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेले संबंध जगजाहीर आहेत. जर शाहरुखवर माफी मागण्याबाबत दडपण आणण्यात येत असेल, तर बच्चन यांनाही माफी मागायला लावली पाहिजे.

ऑस्ट्रेलियातील भारतीयांवर हल्ले होत असल्यामुळे, अमिताभ बच्चन यांनी त्या देशाचा एक पुरस्कार नाकारला होता, याचाही आवर्जून उल्लेख करताना, राज ठाकरे यांनी या श्रेष्ठ कलाकाराचा गौरवही केला।

1 comment:

  1. माय मराठीचे श्लोक...!!
    ( वृत्त - भुजंगप्रयात )

    नमो मायभाषा! नमो मा मराठी!
    तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी
    सदा शब्द वाणीत व्यासंग ओठी
    घडो हे समस्ता! नमो मा मराठी..!!

    तुझे गीत लालित्य सूरास मोही
    तसा नाद ब्रम्हांस आनंद होई
    सदा गोडवा सर्व संसार दाटी
    घडो हे समस्ता! नमो मा मराठी..!!

    जरी वेगळी बोलती बोलभाषा
    अनेकात एकत्व ही प्राणभाषा
    असे भाग्य आम्हां मिळाली मराठी
    घडो हे समस्ता! नमो मा मराठी..!!

    असा मावळा गर्जला तो रणाला
    तसा घोष "हर हर महादेव" झाला
    जगूया मराठी लढूया मराठी
    घडो हे समस्ता! नमो मा मराठी..!!

    "अभय" एक निश्चय मनासी करावा
    ध्वजा शीव ओलांडुनी फ़डकवावा
    जडो ध्यास छंदे शिकावे मराठी
    घडो हे समस्ता! नमो मा मराठी..!!

    गंगाघर मुटे "अभय"
    http://gangadharmute.wordpress.com

    ReplyDelete