Wednesday, April 13, 2011

'वह्या'रुपी शुभेच्छा

सुंदर कल्पना ...... पुष्पगुच्छ फेकले जातात ... वह्या गरीब विद्यार्थ्यांमध्ये वाटल्या तरी जाऊ शकतात .....

खालील लेख म टा च्या सौजन्याने ................


राजकीय पुढाऱ्यांचा वाढदिवस म्हणजे पुष्पगुच्छ, पुष्पहारांचा ढीग, फटाक्यांची जोरदार आतषबाजी, मिठाई, पेढ्यांच्या बॉक्सचा ढिगारा आणि मतदारसंघामध्ये होर्डिंग्ज आणि फ्लेक्सचा मारा...अशी सर्वच राजकीय पक्षात परिस्थिती असताना गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी मात्र त्यांच्या वाढदिवसादिवशी या सर्व शोबाजीला बगल दिली. पुष्पहार व पुष्पगुच्छ आणण्याऐवजी वह्या आणण्याचे आवाहन केल्याने सुमारे साडेपाच लाखांहून अधिक वह्या जमा झाल्या असून त्या गरीब विद्यार्थ्यांना वाटण्यात येणार आहे.

वाढदिवसाच्या निमित्ताने राजकीय पुढारी गल्लीपासून दिल्लीपर्यंत चमकण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावत असतात. मात्र सतेज पाटील यांनी ही सर्व प्रथा बंद करण्यासाठी २००७ साली त्यांच्या चाहत्यांना तसेच समर्थकांना वाढदिवसानिमित्त कोणीही पुष्पगुच्छ, पुष्पहार वा मिठाई आणू नये, असे सांगतानाच शुभेच्छा द्यायच्याच असतील तर त्या वह्यांच्या माध्यमातून द्या, असे आवाहन केले होते. या आवाहनाला दरवषीर् भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

कोल्हापूरमध्येच आपला वाढदिवस साजरा करणाऱ्या सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या चार वर्षांत १६ लाख २७ हजार ५६० वह्या शुभेच्छारुपात आल्या आहेत. जिल्ह्यातील ३८० महापालिका शाळांमधील ३ लाख ८० हजार ८९१ विद्यार्थ्यांना आतापर्यंत त्यांचे वाटप झाले आहे. यंदाच्या वाढदिवसाला साडेपाच लाख वह्या आल्या असून आतापर्यंत सुमारे एक कोटी रुपयांच्या वह्या जमा झाल्या आहेत. प्रत्येक नेत्याने आपल्या वाढदिवसानिमित्त अशाप्रकारचा एखादा सामाजिक उपक्रम राबविला तर महाराष्ट्राला विधायक वळणावर नेणारी एक मोठी चळवळ उभी राहील, असे मत सतेज पाटील यांनी व्यक्त केले.

1 comment:

  1. वही होता है जो मंजूर-ए-खुदा होता है।

    ReplyDelete