Friday, September 24, 2010

राज ठाकरे यांची ग्रंथनिवड आणि सही रे सही.

लोकसत्ता च्या सौजन्याने ..........................


मराठीसाठी कायम आक्रमक पवित्र्यात राहणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे अलीकडेच दादरच्या शिवाजी मंदिर वास्तुतील मॅजेस्टिक ग्रंथदालनात काही काळ शांतपणे ग्रंथ निवडताना तेथे उपस्थित असलेल्या वाचकरसिकांना दिसले आणि भुवया उंचावलेल्या या वाचकांनी त्यांच्या सह्या घेण्याचा, मोबाईलच्या माध्यमातून त्यांचे छायाचित्र टिपण्याचा सपाटा लावला.
कांदिवली पूर्व येथील ठाकूर व्हिलेजमधील प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते २६ सप्टेंबर रोजी होणार आहे. मनसेचे स्थानिक आमदार प्रवीण दरेकर यांच्या पुढाकाराने साकारणाऱ्या या ग्रंथालयासाठी काही पुस्तकांची नावे सुचवावीत, अशी विनंती दरेकर यांनी राज यांना केली होती. मात्र मी पुस्तकांची यादी देण्याऐवजी स्वत: पुस्तके निवडून देईन, असे राज यांनी दरेकर यांना सांगितले आणि त्यांनी दरेकर यांना घेऊन शिवाजी मंदिर वास्तुतील मॅजेस्टिकचे ग्रंथदालन गाठले.
दुपारच्या सुमारास ग्रंथदालनात प्रवेश करणाऱ्या राज यांनी तब्बल दोन तास असंख्य पुस्तके चाळली आणि प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालयासाठी निवडली. श्रीराम लागू यांचे आत्मकथन ‘लमाण’, अरुण टिकेकर यांचे ‘अस्वस्थ महाराष्ट्र’ अशा काही पुस्तकांसह पु. ल. देशपांडे, रणजित देसाई, ग्रेस, अरुण साधू, गो. नि. दांडेकर अशा प्रसिद्ध साहित्यिकांची वाचकप्रिय पुस्तके राज यांनी निवडली. या दरम्यान अनेक वाचकांनी राज यांना सही देण्यासाठी विनंती केली. मात्र अनेकांना सह्या दिल्यानंतर मात्र त्यांनी आपण येथे पुस्तके घेण्यासाठी आलो आहोत, असे स्पष्ट केले. त्यामुळे अनेक जणांनी राज यांची पुस्तक खरेदी होईपर्यंत ग्रंथदालनाबाहेर वाट पाहिली आणि राज यांची सही मिळवली.

    No comments:

    Post a Comment