Thursday, November 24, 2011

राजकीय ‘परीक्षानीती’ची प्रचारतंत्रात सरशी!

खालील बातमी लोकसत्ता च्या सौजन्याने ............

मुंबई, २३ नोव्हेंबर/ विशेष प्रतिनिधी
altमहापालिका निवडणुकीच्या उमेदवारीसाठी लेखी परीक्षा घेण्याच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेचे सर्व थरातून स्वागत होत असून सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष मनसेच्या परीक्षेकडे लागल्याने निवडणूक प्रचारतंत्राच्या पहिल्या परीक्षेत राज ठाकरे उत्तीर्ण झाले आहेत. मनसे उमेदवारांना परीक्षेसाठी देण्यात आलेल्या संदर्भ पुस्तकात महाराष्ट्र, महापालिका, पालिकेची कर्तव्ये, कामकाजाची पद्धत, आयुक्तांचे अधिकार, नगरसेवकांचे अधिकार यासह नागरी कामांसदर्भात उपयुक्त माहिती असल्याने ते संग्राह्य़ ठरणार आहे. मनसेच्या उमेदवारीसाठी इच्छुकांना पालिका कार्यपद्धतीची माहिती असावी या उद्देश्याने येत्या चार डिसेंबर रोजी पन्नास गुणांची ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
यासाठी तयार केलेल्या संदर्भ पुस्तिकेत महाराष्ट्राच्या स्थापनेपासून राज्यातील जिल्हे, तालुके व खेडय़ांची माहिती, लोकसंख्या, मुंबई महापालिकेची माहिती यात पालिका कोणत्या कायद्यानुसार काम करते,महापालिकेचे प्रभाग, पालिकेतील वैधानिक समित्या, विशेष समित्या, पालिकेची अत्यावश्यक कर्तव्ये व स्वेच्छाधीन कर्तव्ये, वैधानिक समित्यांचे कामकाज, विविध समित्यांची रचना व कामे, महापौर,नगरसेवक व आयुक्ताचे अधिकार, पाणी पुरवठा, स्वच्छता, घनकचरा, अग्निशमन दल, आरोग्य, उद्याने व मैदाने, बाजार खाते आदी पालिकेच्या विविध विभागांची थोडक्यात माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे. मुंबईचा पाणीपुरवठा व त्यासाठी पालिकेकडून आकारण्यात येणारे दर, मुंबईमध्ये दररोज निर्माण होणारा कचरा व त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिका नेमके काय करते, विविध योजनांची माहिती, आरोग्य व्यवस्था व रुग्णालयांची माहिती, पाणी टंचाई असल्यास, नळदुरुस्ती आदी कामांसाठी कशाप्रकारे व कोणाला पत्र लिहायचे याची माहिती देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या मदतीने मुंबईत कोणत्या योजना चालू आहेत तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा उहापोह करण्यात आला आहे.
मनसेच्या या पुस्तिकेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे नगरसेवक अथवा लोकप्रतिनिधींनी आपल्या विभागातील प्रश्नांसदर्भात संवाद कसा साधायचा व तो साधताना कोण कोणत्या घटकांचा विचार करायचा याचे विस्तृत विवेचन. थोडक्यात एखाद्या समस्येची चिकिस्ता करण्यापासून त्यामागची प्रशासनाची भूमिका, नागरिकांना येणाऱ्या अडचणी व समस्येचे समाधान करताना विचारात घ्यायच्या गोष्टी यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींनी नेमके कसे वागावे याचेही मार्गदर्शन करण्यात आले आहे. आदर्श नगरसेवक बनण्यासाठी पालिका कायदा १८८८ समजून घ्या, विभागात अनधिकृत झोपडय़ा उभ्या राहत असतील तर तात्काळ त्याची तक्रार संबधित अधिकाऱ्यांकडे करा, पालिकेशी संबंधित तसेच अन्य महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचे पत्ते व दूरध्वनी जवळ बाळगण्याचा आग्रह या पुस्तिकेत करण्यात आला आहे.
मनसेच्या स्थापनेपासून परप्रांतीचे लोंढे रोखण्याची भूमिका राज ठाकरे यांनी सातत्याने मांडली असून मुंबईत येणारे लोंढे रोखण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याची विशेष माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ७४ व्या घटनादुरुस्तीसह पालिकेच्या प्रत्येक प्रभागातील नागरी कामांची माहितीही देण्यात आली असून ही पुस्तिका सर्वसामान्य नागरिकांसाठीही उपयुक्त ठरणारी आहे.

सगेसोयरे अस्वस्थ
मनसेच्या उमेदवारीसाठी नात्यागोत्यांचे राजकारण चालणार नाही, असे राज ठाकरे यांनी पक्षस्थापनेच्या वेळीच जाहीर केल्याने, आगामी महापालिका निवडणुकासाठी नातेवाईकांची मोर्चेबांधणी करणाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आमदार शिशिर शिंदे यांची पत्नी निवडणूक लढविणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाल्याने, स्वत शिशिर शिंदे यांनी त्याचा इन्कार केला आहे. आपली पत्नी निवडणूक लढविणार नाही, असे त्यांनी लोकसत्ताशी बोलताना स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment