Wednesday, September 28, 2011

फेसबुक वरील ग्रुप - मी वाचलेलं पुस्तक (झाडाझडती)

खालील लेख फेसबुक वरील मी वाचलेलं पुस्तक ह्या ग्रुप वरून घेतलेलं आहे .....

सदरचा लेख महेंद्र कुलकर्णी चा आहे



झाडाझडती - विश्वास पाटिल

एकूणच ग्रामिण जीवनाचा, गावकीतल्या गुंतागुंतीच्या राजकारणाचा विश्वास पाटलांचा अभ्यास अचाट आहे. वरवर पाहता शांत एकसुरी आयुष्य जगणा-या ह्या एका गावावर धरणाचा नांगर फ़िरतो आणि गावच्या गाव देशोधडीला कसं लागतं त्याचं वर्णन ह्या कादंबरीत वाचायला मिळतं.

आपल्यासारख्या शहरी जीवनाला चटावलेल्या लोकांना धरण = वीज एवढंच गणित कळतं, अधिकाधीक वीज उत्पादनासाठी अधिकाधीक धरणं बांधायला हवीत अशी किमान माझी तरी अपेक्षा असायची. पण अशा धरणांखाली गाडल्या गेलेल्या गावांची, गावक-यांच्या स्वप्नांची मोजदाद करायला आपल्याला वेळ तरी कुठे असतो.

गावातलं वातावरण, तिथलं राजकारण तिथली शासनव्यवस्था आपल्याला आधी अनाकलनीय वाटल्या तरी कादंबरी अर्धी वाचुन होईपर्यंत आपल्या अंगवळणी पडतात. सर्वस्व पणाला लागलेल्या धरण विरोधी लढ्यातही आपलं, आपल्या जातीचं वेगळेपण शाबुत ठेवण्यासाठीची धडपड बघुन कीव करावीशी वाटली तरी त्या गोष्टी टाळता येण्यासारख्या नसतात.

पाटलांनी उभ्या केलेल्या प्रत्येक व्यक्तीरेखेला वेगळं अस्तित्व आहे, प्रत्येक व्यक्तीरेखा आपल्यासमोर वेगवेगळे प्रश्न उभे करते. देशाच्या, राज्याच्या भल्यासाठी शेतक-यांनी घरादाराची होळी करायची आणि राजकारण्यांनी तोंडाला पानं पुसायची हा प्रकार आता नवा राहीलेला नाही.

झाडाझडती जेव्हा पहिल्यांदा वाचलं तेव्हा लिहीलेल्या काही ओळी इथे द्यायचा मोह आवरत नाही

धराण

त्यांचं हुतया धराण
आमचं हुतया मराण

धरनाची ईज म्हनं राज्याला देनार
आमी मातुर घुबडागत अंधारात सडनार

जवा कोसळंल पाउस, धराण भरंल
मोडल्याल गाव पाक भिकेला लागंल

नेमाप्रमानं सरकारन जमीन दीली व्हती
पांढ-या कागदावर काळी शाय वतली व्हाती

आमदार खासदार येत्यात
ईकासाचं गाजार दाखीवत्यात
उर फ़ुटेस्तोवर शेतकरी
नव्या रानातलं दगुड फ़ोडत्यात

पुनर्वसनाच्या नावाखाली
आमास्नी आयुष्यातुन उठीवलं
सोन्यासारखी जमीन बुडवुन,
दगड धोंडं गळ्यात मारलं

गावतली पोरं तालुक्याला भीक मागत्यात
आमच्या आयाभनी लोकाची भांडी घासत्यात

सरकारचं डोळं फ़ुटल्यात आमच दिस फ़ीरल्यात
कुनाला काय बी दिसत न्हाय
ह्या आमच्या वांझोट्या जमीनीत
दगड धोंडयांशीवाय कायबी पीकत न्हाय


1 comment: