Tuesday, January 12, 2010

रोजगारप्राप्तीसाठी "मनसे'ची पाठशाळा

सकाळ ह्या वृत्तपत्राच्या सौजन्याने .....

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, January 12, 2010 AT 12:15 AM (IST)

मृणालिनी नानिवडेकर मुंबई -
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने परिसरात निर्माण होणारे रोजगार परप्रांतीयांच्या हाती न जाता मराठी माणसाच्या ताब्यातच ठेवण्याची शिकवणी सुरू केली आहे। मात्र, ही शिकवण "मनसे स्टाइल' दणके-राड्यांची नसून नोकरी-रोजगार मिळविण्यासाठी आवश्‍यक कौशल्ये अंगी बाणवण्याबद्दलची आहे.

राज्यातील सर्व जिल्हे आणि तालुक्‍यांत "मनसे'ने रोजगार आणि स्वयंरोजगार विभागाची स्थापना केली आहे। अलीकडेच नाशिकजवळ या विभागातील पदाधिकाऱ्यांचे दोन दिवसांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते। शिवसेनेत असताना राज ठाकरे शिवउद्योग सेना, बेरोजगारांचा विधानसभेवरील मोर्चा अशा तरुणांच्या जिव्हाळ्याच्या विषयांना हात घालतच प्रकाशात आले होते.

मराठी तरुणांच्या हाताला काम हे आमचे प्रमुख उद्दिष्ट असून, त्यासाठी आता "मनसे'चा रोजगार-स्वयंरोजगार विभाग काम करेल, असे पक्षाचे प्रवक्‍ते शिरीष पारकर यांनी स्पष्ट केले। निवडणुकीची दगदग संपल्यानंतर आता या कामाला नियोजनबद्ध प्रारंभ झाला असून, ताज्या शिबिरात भविष्यातील योजनांविषयी चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रात उभ्या राहणाऱ्या प्रत्येक उद्योगात उपलब्ध रोजगारातील 80 टक्‍के नोकऱ्या स्थानिकांना दिल्या पाहिजेत, असा शासनाचा कायदा असून, शासनाचे ते परिपत्रक लागू करणे उद्योजकांना बंधनकारक करण्याचे मार्ग कोणते, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. राज्याच्या विविध भागांत उभ्या राहणाऱ्या प्रकल्पांची यादी "मनसे'कडे असून, ती त्या-त्या विभागातील प्रमुखांना देण्यात आली आहे. भूमिपुत्रांना रोजगार देण्यासाठी सक्‍तीचा बडगा उभारतानाच मराठी माणसाने नव्या स्वरूपातले रोजगार व नोकऱ्या मिळविण्याच्या कौशल्यांचा अभ्यासक्रमही "मनसे'ने तयार केला आहे. रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे प्रमुख सुनील बसाखेत्रे हे स्वत: कामगार कायद्यातले तज्ज्ञ असून, बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सल्लागार म्हणून त्यांचा लौकिक आहे. मराठी मुले सेवाक्षेत्रातील नव्या संधी मिळवायला बिचकतात हे लक्षात घेत "मनसे'च्या माध्यमातून लवकरच ठिकठिकाणी व्यक्तिमत्त्व विकास, इंग्रजी संभाषण, संगणकीय कौशल्य, वेळेचे व्यवस्थापन याविषयीची शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरात होतकरू तरुणांना प्रशिक्षण दिले जाईल.

मुंबईत रिटेल सेवांना आवश्‍यक असणारे तज्ज्ञ मनुष्यबळ तयार करण्यासाठी आवश्‍यक मार्गदर्शन पक्षाने यापूर्वीच सुरू केले असून, चार तासांच्या या शिकवणी वर्गाला हजर राहणाऱ्या तरुणांना नोकऱ्याही मिळाल्या आहेत. आता हा कार्यक्रम राज्याच्या सर्व भागांत मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहे. मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात रोजगार-स्वयंरोजगार विभागाचा संघटक नेमण्यात आला आहे. ठाणे आणि पुणे येथे 15-20 जणांचा चमू सक्रिय आहे. पुणे येथील 80 टक्‍के नियुक्‍त्या पूर्ण झाल्या आहेत. नाशिक या "मनसे'च्या बालेकिल्ल्यातही विभागाचे काम सुरू झाले आहे. अमरावती, अकोला, नगर, जळगाव येथेही काम सुरू झाले असून, युवकांची मते मिळवायची असतील तर त्यांच्या सर्वाधिक जिव्हाळ्याच्या नोकरीधंद्याबाबतच काहीतरी ठोस करणे राज ठाकरे यांना आवश्‍यक वाटत असल्याचे सांगण्यात येते.

No comments:

Post a Comment