Wednesday, June 1, 2011

ठाकरेकाकांच्या बचावासाठी राजची उडी

खालील लेख म टा च्या सौजन्याने ........



उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वय पाहता त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करण्याचे काही कारणच नव्हते. परंतु आपल्या हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणातून लोकांचे लक्ष वळवण्यासाठीच त्यांनी बाळासाहेबांवर टीका केली... अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपले काका बाळासाहेब ठाकरे यांचा बचाव केला.

बाळासाहेब ठाकरे यांनी समाजासाठी काय केले ? असा सवाल उपस्थित करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर शिवसेनेतून प्रतिहल्ला चढवण्यात आला आहे. परंतु या आघाडीवर शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तोंड उघडण्याआधीच, पुतणे राज ठाकरे आपल्या काकांच्या बचावासाठी धावून आले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे राज पुन्हा शिवसेनेत आला तरी मी त्याला घेणार नाही, असे वक्तव्य अलिकडेच बाळासाहेब ठाकरे यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले होते. त्याबाबत मात्र आपण काहीही बोलणार नाही, असे सांगत राज ठाकरे यांनी तोंडावर बोट ठेवले.

शिवसेनाप्रमुखांवर टीका करणा-या अजितदादांवर हल्ला चढवताना राज ठाकरे म्हणाले की, खरे तर त्यांनी बाळासाहेबांवर टीका करण्याचे काही कारणच नव्हते. परंतु पवार परिवाराची रोज एक नवी भानगड बाहेर पडतेय. बँकांतील घोटाळे काय, कोट्यवधी रूपयांचे जमिनी लाटण्याचे व्यवहार काय, स्पेक्ट्रम घोटाळ्यात अडकलेल्या शाहीद बलवाशी संबंध काय, बेकायदेशीर बांधलेले फार्म हाऊस काय... हजारो कोटी रूपयांची भ्रष्टाचाराची प्रकरणी बाहेर पडतायत. त्यातून लक्ष वळवण्यासाठीच अजित पवारांचा हा खटाटोप आहे. अजित पवारांच्या वक्तव्यातून दुसरा कोणताच अर्थ काढता येत नाही.

राज ठाकरेंनी वेगळा पक्ष काढून बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, या रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांच्या टीकेचाही राजने यावेळी खरपूस समाचार घेतला. आठवलेंकडे खंजिराची फॅक्टरी आहे काय, असा सवाल करून ते पुढे म्हणाले की, हा माणूस काय बोलतो काही खळत नाही. आता मातोश्रीच्या बाजूला चार मजली बंगला बांधला म्हणून शिवसेनेचा प्रवक्ता असल्यासारखा फिरत असावा. आता हा बंगला कसा बांधला, मला माहित नाही. की आरक्षणातून मिळवलाय ? आठवलेंनी कधी नोकरी वा व्यवसाय केल्याचे मला आठवत नाही. मग ही जागा त्यांना कशी मिळाली ? आता मिळाली शेजारी जागा, तर सुचत राहिते काहीच्या काही. आठवलेंच्या बोलण्याला महत्त्व द्यावे, असे मला वाटत नाही. कारण ते स्वतःच स्वतःचे महत्त्व शोधतायत. दादरच्या नामांतरात व्यक्तीला विरोध नाही, तर प्रवृत्तीला विरोध आहे. एवढं सोप्पं समजावूनही कळत नसेल तर प्राथमिक शिक्षणापासून सुरूवात करावी लागेल... आणि निळा झेंडा म्हणजे आठवलेंची खासगी प्रॉपर्टी नाही.

नामांतराबाबत इतरांनी काही बोलण्याचे कारण नाही, या अजित पवार यांच्या विधानाकडे लक्ष वेधले असता, इतरांनी म्हणजे ? मी काय मिझोरामला राहतो का ?महाराष्ट्रातच राहतो ना... असा उलट सवाल राज यांनी केला. दादरच्या नामांतराशी बाबासाहेबांचा संबंध नाही, तर यामागे घाणेरडे राजकारण आहे. कुरघोडी करण्याचे राजकारण. असे राजकारण मला कळत नसेल तर चांगलेच आहे, असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment