Friday, January 14, 2011

नव्या 'राज'कारणाची मांडणी

खालील लेख म टा च्या सौजन्याने .............


संजीव उन्हाळे


मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर तरुणाईच्या उदंड प्रतिसादात झालेल्या रेकॉर्डबेक सभेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फिल्मीस्टाइलीत 'सत्या'मधील 'मौका सभीं को मिलता है' हा डायलॉग गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या कानी घालून एका नवीन राजकीय मोहिमेची सुरुवात केली आहे. ही सभा घेणे ठाकरे यांची राजकीय गरज होती, पण त्यांनी या सभेद्वारे आगामी राजकारणात मनसेचे पाऊल कसे पडेल, हे स्पष्टपणे सूचित केले. नवीन राजकीय समीकरणात मनसेचा थेट विरोध राट्रवादी काँग्रेसला असणार इतक्या कडवटपणे आमदार हर्षवर्धन जाधव यांना झालेल्या मारहाणीचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.

औरंगाबाद शहरातूनच नवीन राजकारणाची सुरुवात होते हा आजवरचा इतिहास आहे. १९८४मध्ये शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेसचे विलिनीकरण औरंगाबादला झाले आणि पवारांच्या सर्व राजकारणाला बळ देण्याचे काम या विभागाने केले. १९८८मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पहिली सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर झाली आणि त्यानंतर मुंबई शहरापुरती मर्यादित असलेली शिवसेना महाराष्ट्रभर पसरून राज्यात सत्तारुढ झाली.

राज ठाकरे यांच्या सभेमध्ये तरुण मोठ्या संख्येने होते. म्हणायला गेले तर ती राज्य पातळीवरची सभा होती. राज यांनी मात्र या सभेचे गांभीर्य मनापासून जपले होते. पांढऱ्या पडद्यावर काळ्या अक्षरात अगदी साधेपणाने 'निषेध सभा' असे लिहिले होते. शहरामध्ये लावण्यात आलेल्या अनेक डिजिटल बॅनर्सवर कोठेही राज ठाकरे यांचा फोटो नव्हता. प्रत्येक ठिकाणी काळे टीशर्ट घालून मनसेचे स्वयंसेवक गदीर्ला आवर घालण्याचा प्रयत्न करीत होते. राजही अगदी साध्या पेहरावात आले. त्यांनी पुण्यापासून कोठेही हारतुरे घेतले नाहीत, व्यासपीठावर सत्कार समारंभ झाले नाहीत आणि हर्षवर्धनच्या मातोश्री तेजस्विनी जाधव यांनी छोटेखानी भाषण केल्यानंतर राज यांनी नेहमीचा कोणताही सोपस्कार न करता भाषणाला सुरुवात केली.

राज ठाकरे यांचे भाषण राजकीय भूमिका स्पष्ट करणारे होते. या भाषणात नेहमीची 'ठाकरी' भाषा नव्हती. काही तरी चिथावणीखोर घोषणाबाजी होईल म्हणून या सभेसाठी आलेल्या अनेकांचा अपेक्षाभंग झाला. पण या निमित्ताने नवीन राजकारणाची मांडणी त्यांनी केल्यामुळे अपेक्षाही वाढल्या. आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पोलिसांवर हात उचलल्याचे आपण समर्थन करणार नाही हे वारंवार स्पष्ट केले. दुसऱ्या बाजूला अनपेक्षितपणे ठाकरे पोलिसांबद्दल अत्यंत कळवळीने बोलले. यामध्ये पोलिसांचा दोष नाही, तर दोष त्या मारवित्या धन्याचा आहे, असे सांगून त्यांनी पोलिसांच्या घराच्या प्रश्नापासून त्यांच्यावर पडणाऱ्या कामाच्या ताणापर्यंत सर्व गोष्टींचा उल्लेख केला. जणू काही पोलीस खाते ही सुद्धा आपली एक मतपेढी आहे, असा त्यांच्या भाषणाचा नूर होता. अगदी शेवटीही पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा, एवढी वाजवी मागणी करून पोलिसांविरोधात प्रतिक्रिया देऊ नका, असे त्यांनी कार्यर्कत्यांना सांगितले.

दादा-आबांवर थेट आरोपखुलताबाद पोलीस ठाण्यात आमदार हर्षवर्धन जाधव यांना पाऊण तास बसवून ठेवण्यात आल्याचा उल्लेख केला. या कालावधीतच आबा आणि दादा यांचे फर्मान सुटले, असे भन्नाट विश्लेषण करून सत्तेतील राष्ट्रवादीच्या नेत्याच्या आदेशाशिवाय अशी मारहाण होऊच शकत नाही, असे सांगितले. अप्रत्यक्षपणे मराठा आमदार सुरक्षित नाही, सरदार असलेल्या एका आमदाराला व्यक्तिगतरित्या मारहाण करण्यात आली हे शल्य त्यांनी लोकांसमोर नेले आणि एखाद्या संशोधकाच्या थाटात शिवनेरी किल्ल्यावर हेलिकॉप्टरवर झालेल्या हल्ल्यापासून अगदी अलीकडच्या दादोजी कोंडदेव पुतळा हटाव प्रकरणापर्यंत संभाजी ब्रिगेडने केलेल्या कारवायांचे दाखले त्यांनी दिले. राष्ट्रवादीनेच या संघटना पोसल्या आहेत असा थेट आरोप त्यांनी केला. आबा आणि अजितदादा यांच्यावर अशा प्रकारचा थेट आरोप करणारी ही पहिलीच सभा आहे. कोण शिक्षक आहे, हे बघून कोणी शिक्षण घेत नाहीत हे साधे तत्त्व मांडताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षक ब्राह्माण होते असा दाखला दिला आणि राज्यामध्ये केवळ जातीपातीचे राजकारण करून दादोजींची नव्हे तर महाराजांची विटंबना आपण करीत आहोत, असे खडे बोल त्यांनी सुनावले. मुख्यमंत्र्यावरील एखाद्या खुसखुशीत विनोदापलीकडे त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले नाही. लोकमनातील राष्ट्रवादी-मनसे हे राजकीय समीकरण ठाकरे यांनी यानिमित्ताने पूर्णपणे पुसून टाकले. पण दुसऱ्या बाजूला काँग्रेसला टीकेचे लक्ष्य बनविले नाही ही गोष्टही राजकीयदृृष्ट्या महत्त्वाची आहे. आतापर्यंतच्या ठाकरे यांच्या भाषणापैकी त्यांचे हे अत्यंत प्रगल्भ भाषण वाटले.

शिवसेनेला हादरा

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये विरोधी पक्ष दुबळा आहे, हे मात्र या निमित्ताने लक्षात आणून दिले. जातीयवादी राजकारण करणारी राष्ट्रवादी आणि दुबळी भाजप-शिवसेना यांची राजकीय पोकळी मनसे भरून काढू शकते, हे दाखवून देण्यासाठी त्यांनी 'मौका सभी कों मिलता हैं' असे सांगून महाराष्ट्राच्या राजकीय अजेंड्यावर मनसेचे स्थान महत्त्वाचे आहे हे दाखवून दिले आहे. आपल्या भाषणामध्ये राज ठाकरे यांनी कोठेही शिवसेनेचा उल्लेख केला नाही. पण त्याच वेळी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या शिवसेनेच्या रेकॉर्डब्रेक सभा झालेल्या ठिकाणी एक रेकॉर्डब्रेक सभा घेऊन शिवसेनेला हादरा दिला आहे. तरुण वर्ग शिवसेनेकडे येत आहे, अशी हाकाटी पिटणाऱ्या शिवसेनेला औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यातील तरुण मोठ्या प्रमाणावर सभेत आणून मनसेने शक्तिप्रदर्शन केले.

अतुल सरपोतदार यांनी या अगोदर संपर्कप्रमुख म्हणून काम केले होते त्या अनुभवाचा फायदा घेऊन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही सभा आयोजित करण्यात आली होती. या अगोदर मुंबई दंगलीनंतर माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी औरंगाबादला येऊनच शरद पवार यांच्या नेतृृत्वावर उघड प्रहार केला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्यपद्घतीवर उघड हल्ला केला. हे साम्य जरी लक्षात घेतले तरी या तरुणाईच्या गदीर्चे मतपेढीमध्ये रुपांतर होईल का हा प्रश्न खरा कळीचा प्रश्न आहे. नेहमीच्या ठाकरी शैलीतील घाणाघाती भाषणापेक्षा प्रगल्भ राजकीय विश्लेषण करणा-या या भाषणामुळे राज ठाकरे यांच्या चाहत्यांचा अपेक्षाभंग तर झाला नाही ना, याचाही शोध घेण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment