Tuesday, January 4, 2011

बेशिस्त रिक्षांविरुद्ध मनसेचा एल्गार - कल्याण

खालील लेख म टा च्या सौजन्याने ..........................................



मनमानीपणा करत प्रवाशांना वेठीला धरणाऱ्या मुजोर रिक्षाचालकांविरोधात मनसैनिकांनी सोमवारी संध्याकाळी आंदोलनाचा पवित्रा घेतला. कल्याणमधील रिक्षा प्रवाशांच्या विविध मागण्यांकडे वाहतूक प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एसीपी ऑफिसवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चा काढल्यानंतरही रिक्षाचालकांकडून प्रवाशांना मिळणाऱ्या वर्तणुकीत बदल न झाल्यास आंदोलनाची धार वाढविण्याचा इशारा मनसेचे आमदार प्रकाश भोईर यांनी दिला आहे.

रिक्षाचालकांबाबत कल्याणकरांच्या अनेक तक्रारी सोडविण्यात ट्रॅफिक पोलीस कमालीचे अपयशी ठरले आहेत. त्यामुळे मनसेचे स्थानिक आमदार प्रकाश भोईर यांनी त्याविरोधात सोमवारी संध्याकाळी एसीपी ऑफिसवर मोर्चा काढला. मोहिंदरसिंग काबुलसिंग शाळेपासून मोर्चाला सुरुवात झाली. टॅफिक शाखेचे एसीपी गजानन जुईकर यांना मनसेतफेर् विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. प्रवाशांच्या इच्छित स्थळी वाहतूक करण्याची सक्ती, मीटरसक्ती, दरपत्रक रिक्षा प्रवाशांना दिसेल अशा ठिकाणी लावण्यात यावे, खडकपाडा परिसरात जादा रिक्षा उपलब्ध करून द्याव्यात, कल्याण स्टेशन परिसरात प्रवाशांना रांगेत रिक्षा मिळतील, अशी व्यवस्था उभारा आदी मागण्या प्रकाश भोईर यांनी केल्या. मोर्चात जिल्हाध्यक्ष काका मांडले, सरचिटणीस इरफान शेख आदी सहभागी झाले होते.

एसीपी म्हणतात, कारवाई सुरूच!

टॅफिक पोलीस रिक्षाचालकांवर कारवाई करत नसल्याचा आरोप होत असला तरी एसीपी जुईकर यांनी तो खोडून काढला. मागील वर्षभरात १३ हजारांहून अधिक रिक्षाचालकांवर कारवाई झाली असून त्यांच्याकडून तब्बल १४ लाख रुपयांचा दंड वसूल झाला आहे, अशी आश्चर्यकारक आकडेवारीच त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसमोर ठेवली. तसेच, महापालिकेकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने स्टेशन परिसरात आणखी प्रभावी कारवाई करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. रिक्षाचालकांनी नियमभंग केल्यास प्रवाशांनी त्याविरोधात लेखी तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. विशेष म्हणजे स्टेशन परिसरात सोमवारपासून १ अधिकारी व ६ कर्मचारी सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत दोन शिफ्टमध्ये नेमण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment